Tuesday, November 29, 2011

हळद



हळदीचे माहेरघर असलेले एक गाव
गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०११

हळद ही सर्वगुणसंपन्न अशी वनस्पती असून, हळदीचा विविध समारंभासाठी व आपल्या दररोजच्या आहारामध्ये नियमित वापर केला जातो. लग्न असो, हळदीकुंकु कार्यक्रम असो, हळदीचा वापर हा ठरलेला असतो. हे पीक जिल्ह्यात मोजक्याच गावांमध्ये घेतले जाते. विशेषत: वाशिम तालुक्यातील काटा या गावी हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेताना शेतकरी आढळून येतात. यंदा काटा या गावी ५० एकर शेतामध्ये हळदीची लागवड केलेली आहे.

हळदीच्या पिकाची लागवड ही शक्यतो जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पूर्ण करुन घेणे आवश्यक असते. हे पीक लवकर केल्यास झाडांच्या वाढीस जास्त कालावधी मिळतो व त्यामुळे हळदीच्या उत्पादनात बरीचशी वाढ होते. या पिकासाठी जास्त सेंद्रिय पदार्थ असलेली किंवा नरम जमिनीची निवड योग्य ठरत असल्याचे येथील शेतकरी विठ्ठलराव रामराव देशमुख यांचे म्हणणे आहे. हळदीच्या लागवडीसाठी कंदाचा वापर केला जातो. हळद लागवडीसाठी गोल बेण्याचे बियाणे वापरणे कधीही चांगले असते. ही लागवड करताना चार ते सहा इंच एवढे अंतर दोन हळदीच्या कंदांमध्ये ठेवावे लागते. या लागवडीसाठी साधारणपणे प्रतिहेक्टरी २४ ते २५ क्विंटल बियाणे पुरेसे असते.

सदर बियाणे सरासरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. हळदी पिकाच्या अनेक सुधारित जाती लागवडीसाठी वापरल्या जातात. शक्यतो, वाशिम जिल्ह्यामध्ये शेलम जातीच्या हळदीचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. ही लागवड यशस्वी करण्यासाठी विविध खतांबरोबरच चांगल्या बियाण्याचा वापरही तितकाच महत्वाचा आहे. हळद पिकासाठी खताच्या मात्रा देताना जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन द्याव्या लागतात. या पिकासाठी पालाशयुक्त खते व सेंद्रिय खते जास्त वापरल्यास उत्पादनही त्याच पटीत मिळू शकते. हळदीची लागवड केल्यानंतर हळद पक्व होण्यास ८ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो. पक्व होण्याच्या कालावधित पानांचा रंग पिवळ्या रंगाचा दिसून येतो.

या पिकाच्या क्षेत्रामध्ये व पिकामध्ये दिवसेंदिवस वाढच होत असलेली दिसून येते. काटा परिसरामध्ये हळदीचे उत्पादन सरासरी एकरी १० ते २० क्विंटल या प्रमाणात होताना दिसत आहे. हळदीचा बाजारभाव सात ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मिळतो. परिणामी, शेतकऱ्यांना एकरी एक ते दीड लाख रुपयाचे उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यामध्ये दरवर्षी जास्तीत जास्त शेतकरी सोयाबीनच्याच पिकाला महत्व देतात. मात्र, दरवर्षी तेच ते पीक शेतामध्ये घेत असल्यामुळे अळ्यांचा प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी एक वर्ष हळद व दुसऱ्या वर्षी सोयाबीन पीक घेतल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडू शकते.

'

No comments: