Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : इंग्रजी अनिवार्य- निबंधलेखन

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : इंग्रजी अनिवार्य- निबंधलेखन

अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,बुधवार, ४ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
dixitaparna@gmail.com
sushrut.ravish@gmail.com
इंग्रजी अनिवार्य हा पेपर समजून घेताना आपण पाहिले, की विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी आपल्या विषयाबद्दलचा अभ्यास मांडण्यासाठी उपलब्ध असणारी एक जागा म्हणजे- इंग्रजी अनिवार्यचा पेपर! या पेपरमधील निबंधलेखन हा घटक या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. साधारण ३०० शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित आहे. निबंधाचे विषय हे विद्यार्थी आपल्या परिसराविषयी आणि एकूणच देशपातळीवरील किंवा जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटनांविषयी किती जागरूक आहे हे तपासणारे असतात. वरवर पाहता सोप्या वाटणाऱ्या विषयांबद्दल विद्यार्थ्यांच्या स्वत:चे, विचारांची खोली असणारे मत आहे का? तसेच ते त्याला प्रभावीपणे मांडता येते का? हे सर्व परीक्षकाला यामधून पडताळून पाहता येते.
निबंधाचे एकूण ४ प्रकार असतात
(१) वर्णनात्मक-  India and Its Natural Diversity, History of Indian Hockey..
(२) कल्पनाविस्तार- If I Were to Become Prime Minister, One day in Wonderland.
(३) विश्लेषणात्मक- Indian Economic Crisis, Television-Good or Bad, Tradition V/s Modenrnity.
(४) व्यक्तिगत अनुभव वर्णन- My Favourite Movie, My School. 
यामधील कुठल्या प्रकारचा निबंध आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो हे विद्यार्थ्यांनी विचारपूर्वक ठरवावे. त्याचबरोबर कुठल्या विषयातून आपण आपले विचार, व्यक्तिमत्त्व, सभोवतालविषयचे ज्ञान परीक्षकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचवू शकतो याचाही विचार करावा.
कुठलाही निबंध लिहिताना विद्यार्थ्यांनी एक सूत्र लक्षात ठेवायला हवे. ते म्हणजे चांगला निबंध हा तीन टप्प्यांत विभागलेला असतो. 
(१) आपण निबंधात काय सांगणार आहोत याची ओळख करून देणे - (परिच्छेद  १)
(२) जे मुद्दे आपल्याला सांगायचे आहेत त्यांचे सविस्तरपणे विवेचन करणे - (परिच्छेद  २ - ३)
(३) ज्या मुद्यांची मांडणी आपण केली आहे त्याविषयी समारोपात्मक आशय लिहिणे - (परिच्छेद  ३ - ४)
निबंध लिखाणाचे हे सूत्र मनात ठेवून निबंधाची रचना करणे कधीही फायद्याचे ठरते. यामुळे निबंधलिखाण करताना विचारांची स्पष्टता वाढते. मुद्यांचा तोचतोपणा किंवा मुद्दे लिहायचे राहून जाणे हे सुद्धा यातून टाळता येते. अशा प्रकारे निबंध लिहिण्याचा अजून एक फायदा म्हणजे वाचणाऱ्यास एक प्रकारची दिशा मिळते व लिखाण स्पष्ट, मुद्देसूद आणि अर्थवाही होते. प्रत्येक विषयाला अनुसरून काही माहिती पुरवल्यास लिखाण अधिक समतोल राहते. केवळ स्वत:ची मते लिहिल्याने काही वेळा विद्यार्थ्यांचे पूर्वग्रह अधिक ठळक होतात. योग्य माहितीची जोड दिल्याने ही मते अधिक प्रभावी आणि चटकन पटणारी अशी होतात. या सगळय़ाचा विचार करून नंतरच निबंधलिखाणाचा सराव करावा. हे झाले निबंधलिखाणातून स्वत: व्यक्त होण्याबद्दल! आता आपण इंग्रजी भाषेतून लिहिण्याविषयीचे बारकावे पाहू.
सर्वात प्रथम लक्षात ठेवायची बाब म्हणजे विषयाशी निगडित शब्दसंपदा आपल्या जवळ असणे. प्रत्येक विषयाचा स्वत:चा असा एक शब्दांचा साठा असतो व तो माहिती असणे व वापरता येणे इंग्रजी निबंध लिखाणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जसे की 
Indian Economic Crisis   असा विषय असल्यास Fiscal Benefits, Fiscal Deficit, Inflation, Recession, Trade Deficit, Repo Rates, Cash Reserve Ratio (CRR) अशा आणि यांसारख्या शब्दांचा वापर विद्यार्थ्यांला योग्य रीतीने करता आला पाहिजे किंवा निबंधासाठी दिलेला विषय जर 
Global Warming  असेल तर Carbon Footprint, Carbon Credit, Ozone Layer, Kyoto Protocal, Greenhouse Effect  या संज्ञाचा नुसता अर्थ माहीत असून उपयोग नाही तर त्याचा आपल्या लिखाणात सहज वापर करण्याची सवय हवी. अशा प्रकारचा शब्दसाठा असण्यासाठी इंग्रजी वर्तमानपत्रांचे आणि नियतकालिकांचे नियमित वाचन असायला हवे.
इंग्रजीमध्ये निबंध लिहीत असताना वाक्ये लहान लहान बनवावीत. खूप स्वल्पविरामांचा वापर, एकाच मोठय़ा वाक्यात किचकट संकल्पना समजावून सांगणे हे जाणीवपूर्वक टाळावे. छोटय़ा-छोटय़ा वाक्यांमधून आणि योग्य शब्दांची निवड करून निबंध लिहावा. तसेच ज्या शब्दांचा अर्थ आपल्याला निश्चित माहीत नाही अशा शब्दांचा वापर करणे टाळावे. यामधून विषयाला/अर्थाला वेगळेच वळण मिळण्याची शक्यता असते. एकूण लिखाणात सुटसुटीतपणा आणि सहजता आणण्यासाठी या दोन बाबी लक्षात ठेवायला हव्यात त्या म्हणजे - (१) छोटी वाक्ये आणि (२) योग्य शब्दांचा वापर.
इंग्रजीत चांगले लिखाण करण्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, संपूर्ण निबंधामध्ये समान काळ (Tense) वापरणे. जसे की, कल्पनाविस्तारांमध्ये भविष्यकाळाचा वापर करणे. किंवा व्यक्तिगत अनुभवाविषयी लिहिताना भूतकाळ वापरणे. मध्येच कुठेतरी (भविष्यकाळ किंवा भूतकाळ) वापरण्याने सलगपणा कमी होतो. तसेच वाचणाऱ्याला अर्थ समजून घेण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे प्रत्येक काळाचा आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या ठराविक शब्दांचा वापर करून निबंध लेखनाचा सराव करावा.
कल्पनाविस्तार, विश्लेषणात्मक आणि वर्णनात्मक निबंध लिहीत असताना, व्यक्तिगत अनुभव लिहिण्याचे शक्यतो टाळावे. याचे कारण म्हणजे अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अनेक शब्द खर्ची पडतात व त्यातून जो मुद्दा आपल्याला पटवून द्यायचा आहे त्यावर लक्ष केंद्रित न होता ते त्या अनुभवावरच केंद्रित होते. अनुभव लिहिणे अतिशय गरजेचे वाटल्यास, तो अनुभव दिलेल्या विषयास व मुद्यास सयुक्तिक आहे ना हे जरूर पडताळून पाहावे. अशा प्रकारच्या लिखाणात जाणीवपूर्वक घ्यायची काळजी म्हणजे, संपूर्ण निबंध आपल्या स्वत:च्या अनुभवांवर केंद्रित आणि अवलंबून नसावा. लिखाणामध्ये एक प्रकारचे गांभीर्य टिकवण्यासाठी हे खूपच महत्त्वाचे आहे.
अशा प्रकारे इंग्रजी निबंध लिखाणासाठी तयारी करताना इंग्रजीतील निबंध जरूर वाचावेत. दर्जेदार वर्तमानपत्रे वाचणे, जसे की, The Indian Express  मधील अग्रलेख व त्यांच्याशेजारील लेख यांचे नियमित वाचन करावे. इंटरनेटचा वापरही यासाठी करता येईल. शक्य तितके चांगले इंग्रजी-मराठी लिखाण वाचणे, त्यामधून स्वत:चे स्वतंत्र असे मत बनविणे आणि ते सोप्या सुटसुटीत इंग्रजी भाषेत मांडणे ही यशस्वी इंग्रजी निबंधलेखनासाठीची अत्यावश्यक पूर्वतयारी आहे

No comments: