Monday, September 3, 2012

इंग्रजी अनिवार्य - व्याकरण

इंग्रजी अनिवार्य - व्याकरण


अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,सोमवार, ९ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

dixitaparna1@gmail.com
sushruth.ravish@gmail.com
आतापर्यंत आपण इंग्रजी अनिवार्य या पेपरमधील व्याकरण सोडून इतर सर्व घटकांबद्दल चर्चा केली आहे. आजच्या इंग्रजी अनिवार्यच्या शेवटच्या सदरात आपण व्याकरण या घटकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. राज्यसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे व्याकरण या घटकामध्ये एकूण ६ प्रश्नप्रकारांचा अंतर्भाव आहे.
हे प्रश्नप्रकार खालीलप्रमाणे आहेत.
(१) वाक्य रूपांतरित करणे (Transformation of Sentences) : या प्रश्नप्रकारामध्ये विविध प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसे की, वाक्य Active-Passive Voic  मध्ये बदलणे. किंवा Direct speech- Indirect speech यांची अदलाबदल करणे. दोन सुटी वाक्ये दिलेली असल्यास योग्य शब्द किंवा शब्दसमूह वापरून वाक्ये जोडणे. याचबरोबर  Simple Sentence- Complex Sentence यांचे एकमेकांत रूपांतर करणे.
अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक प्रश्नप्रकाराचा भरपूर सराव विद्यार्थ्यांनी करायला हवा. प्रत्येक भाषेची स्वत:ची एक धाटणी असते. वाक्यांचे रूपांतर करताना लक्षात ठेवायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्त्यांनुसार क्रियापदाचा वापर करणे. याला इंग्रजीमध्ये Subject Verb Agreement असे म्हणतात. उदा.
Q. Ram eats mangoes.
Ans. Mangoes are eaten by Ram किंवा Q. When I asked Shantala, she said, ‘‘I do not want to come for shopping.’’
Ans.When I asked Shantala, she said that she did not want to come for . अशा प्रकारे वाक्यांचे रूपांतर करताना वाक्याचा अर्थ बदलला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
(२) वाक्यातील चुका ओळखून वाक्य सुधारणे (Correction of Sentences) : यामध्येदेखील Subject Verb Agreement नुसार वाक्यात योग्य ते बदल करणे अपेक्षित आहे. उदा.Child plays, Children play याचबरोबर कोणते अव्यय कसे वापरावे याचे ज्ञान असणे अपेक्षित आहे. (of, at, in   वगरे) (३) योग्य काळाचा वापर (Use of Tense) : यामध्ये विचारांमधील स्पष्टता भाषेच्या माध्यमातून व्यक्त करता येते का, हे तपासले जाते; काळानुसार क्रियापदामध्ये योग्य तो बदल करता येणे अशा गोष्टींमधून इंग्रजी वाक्यरचनेशी निगडित मूलभूत बाबींचा उपयोग विद्यार्थ्यांस करता येतो का हे बघितले जाते. व्याकरणाबद्दलच्या भीतीचे एक महत्त्वाचे कारण काळांच्या वापराबद्दल स्पष्टता नसणे हे आहे. यात देखील प्रश्नप्रकाराचा भरपूर सराव करणे आवश्यक आहे. जे दर्जेदार इंग्रजी लिखाण उपलब्ध असेल, त्याचाही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार करणे महत्त्वाचे असते.
(४) योग्य विरामचिन्हांचा वापर (Punctuation) : सर्वच भाषांमध्ये विरामचिन्हांचा वापर होतो. संवाद साधताना बोलणारी व्यक्ती किंवा वाचणारी व्यक्ती कुठे थांबते, किती काळाकरिता थांबते तसेच वाक्याचा शेवट प्रश्नार्थक असतो का उद्गारवाचक यावरून कोणती विरामचिन्हे वापरावीत हे ठरते.  MPSC मुख्य परीक्षेच्या या पेपरमधील विरामचिन्हांशी संबंधित प्रश्नांचा नीट अभ्यास केल्यास असे दिसून येते की, विरामचिन्हांविषयी अगदी प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे. इंग्रजीमधील main clause, subordinate clause , या किचकट वाटणाऱ्या संकल्पनांवर आधारित फारसे प्रश्न विचारले जात नाहीत. या प्रश्नांचे उत्तर देताना वाक्याचा अर्थ समजून घेऊन ते वाक्य मनातल्या मनात उच्चारून बघावे. यामुळे बरोबर उत्तर लिहिणे सोपे जाते.
(५) शब्दांचे योग्य रूप तयार करून वापरणे (Word Formation) :
यामध्ये कंसात दिलेल्या शब्दांचे योग्य रूप वापरून गाळलेल्या जागा भरावयाच्या असतात.
उदा. Following _____ were passed in the meeting. (resolve) Following  resolutions were passed in the meeting किंवा Lead is the   _____ of all metals. (heavy).
Lead is the   heaviest of all metals.२. किंवा  1857 _____  against the British is significant (to revolt ) The 1857  revolution against the British is singnificant.
(६) वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करणे (Use of Phrases)  यामध्ये दिलेल्या वाक्प्रचारांचा योग्यप्रकारे वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे. दिलेल्या वाक्प्रचारात फक्त एक कर्ता आणि एक कर्म जोडल्याने चांगले वाक्य तयार होतेच असे नाही. त्यामुळे वाक्प्रचाराचा अशाप्रकारे वाक्यात उपयोग करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांला त्या शब्दसमूहाचा अर्थ कळला आहे हे परीक्षकास सहज समजावे.
उदा. To get rid of.    He got rid of her.
यामधून कोणताही अर्थबोध होत नाही. याउलट In 2011, India got rid of polio यामधून लगेचच वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट होतो. वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करताना ही बाब नक्की लक्षात ठेवावी.
हे ६ प्रश्नप्रकार मिळून व्याकरणाचा घटक बनतो. व्याकरणाची भीती मनात न बाळगता, आपल्याला जे म्हणायचे आहे ते इंग्रजीमध्ये तसेच्या तसे पोहोचवता येण्यासाठी व्याकरणाच्या नियमांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अचूक आणि सुलभ लिखाणाकरता गरजेच्या अशा या संकल्पना आहेत.
एकूणच इंग्रजी अनिवार्य या पेपरसाठी तयारी करताना, आपल्याला आपल्या शब्दांत व्यक्त होण्यासाठी दिलेली संधी म्हणून याकडे पाहावे. जुन्या गुणपद्धतीप्रमाणे (२०० गुण) पेपरमधील ६ घटकांसाठीचे गुण वितरण साधारणपणे खालीलप्रमाणे होते.
निबंधलेखन -                               ३०    गुण
पत्रलेखन     -                              २०    गुण
संवाद कौशल्य     -                        ५०    गुण
एक तृतीयांश सारांश     -                 २०    गुण
उताऱ्याची मुद्देसूद रचना                    २०    गुण
व्याकरण     -                             ४०    गुण
एकूण     -                               २००     गुण
आता परीक्षा जरी १०० गुणांसाठी घेण्यात येणार असली, तरीदेखील अभ्यासक्रमात कोणतेही मोठे बदल सुचवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे याच प्रमाणात गुणोत्तरात यावेळीही गुणवाटप होईल, असे म्हणता येऊ शकते. इंग्रजी अनिवार्यच्या तयारी करिता खालील पुस्तकांचा मार्गदर्शनपर उपयोग होऊ शकतो.
(१)  Intermediate  English Grammer by Cambridge University press.
(२) Advanced   English Grammer by Cambridge University press
(३) Word  Power Made Easy by Norman Lewis.
अशाप्रकारे सखोल आणि बारकाईने अभ्यास केल्यास इंग्रजीविषयाची मनातील भीती दूर होण्यास निश्चितच उपयोग होईल. आजकाल रेडिओ, टी.व्ही., वृत्तपत्रे यामधून खूप सारे दर्जेदार इंग्रजी ऐकावयास व वाचावयास मिळते. या सर्व माध्यमांचा योग्य उपयोग करून घेतल्यास व त्याला सखोल अभ्यासाची जोड दिल्यास इंग्रजी अनिवार्य पेपर, तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे परीक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन बनू शकते.

No comments: