Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ अभ्यासाची तयारी-४

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : ‘मानव साधनसंपत्तीचा विकास’ अभ्यासाची तयारी-४



कैलास भालेकर, बुधवार, १६ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com
alt

‘व्या वसायिक शिक्षण’ हा मानव साधनसंपत्तीच्या विकासातील  महत्त्वाचा घटक आहे. रोजगारनिर्मितीबरोबरच विविध सुविधांच्या उपलब्धतेसाठी व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्वातंत्र्योत्तर कालावधीत भारतामध्ये व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा मोठय़ा प्रमाणात विस्तारल्या असल्या तरी एकूण लोकसंख्येचा विचार करता व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विविध कौशल्ये असणाऱ्या मनुष्यबळाचे प्रमाण किती आहे यावरून मानवी साधनसंपत्तीची स्थिती खऱ्या अर्थाने व्यक्त होते. मानव साधनसंपत्तीच्या नियोजनामध्ये देखील व्यावसायिक शिक्षणाला महत्त्वाचे स्थान आहे. दर हजारी लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक व्यावसायिक कौशल्ये असणाऱ्या मानवी साधनसंपत्तीचे प्रमाण याचे सर्वेक्षण केले जाते. या प्रमाणाचा भारताच्या गरजांच्या विचाराबरोबरच विकसित राष्ट्रातील तुलनात्मक संदर्भातील आकडेवारीचा विचार केला जातो. अर्थातच, सध्याच्या आवश्यकतांचा विचार करण्याबरोबरच भविष्यातील मानवी साधनसंपत्तीची आवश्यकता विचारात घेतली जाते आणि त्यानुसार मानवी साधनसंपत्तीचे नियोजन करण्यात येते. त्यानुसार शासनाद्वारे विविध व्यावसायिक कौशल्यांचा आणि त्यांच्या गरजांचा बृहत् आराखडा तयार करण्यात येतो. व्यावसायिक शिक्षण बृहत् आराखडय़ाचा आधार घेऊन शासनाद्वारे विविध धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यात येते. तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रचंड वेग विचारात घेता, हे नियोजन तंत्रज्ञानातील बदलांशी सुसंगत बनणे आवश्यक असते. या सर्व बाबींचा समावेश शासनाच्या, खासगी क्षेत्रांच्या, स्वयंसेवी संस्थांच्या, अभ्यासकांच्या धोरणांमध्ये करण्यात येतो. त्यासंदर्भातील माहिती माध्यमांद्वारे प्रसारित होत असते. या माहितीचे अवलोकन ‘व्यावसायिक शिक्षण’ घटकाच्या अभ्यासासाठी निश्चित लाभदायक ठरते.
भारताच्या व्यावसायिक शिक्षण आणि तंत्रशिक्षणातील सद्य:स्थितीचा समावेशदेखील या घटकामध्ये करण्यात आला असून, शिक्षणविषयक संदर्भग्रंथाद्वारे या माहितीचे संकलन आवश्यक ठरते. तसेच, शासकीय वेबसाईटचा आधार घेऊन अधिकृत माहिती मिळविणे शक्य होते. व्यावसायिक शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास राष्ट्रीय स्तरावर करण्याबरोबरच महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या व्यावसायिक शिक्षणसंदर्भातील धोरणांचा आणि कार्यक्रमांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. शिक्षणविषयक संदर्भ पुस्तकांबरोबरच महाराष्ट्र शासनाचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्र शासनाची शिक्षण विभागाची वेबसाईट त्यादृष्टीने उपयुक्त ठरेल.
व्यावसायिक शिक्षणाच्या उपलब्धतेसंदर्भातील विविध समस्यांचे नेमके आकलन आवश्यक असून, त्यासंदर्भातील महत्त्वाच्या अहवालांचा अभ्यास त्यासाठी महत्त्वाचा ठरतो. व्यावसायिक शिक्षण सुविधांच्या उपलब्धतेचा समतोल निर्माण करण्यासंदर्भातील शासनाच्या योजना आणि कार्यक्रमांची नेमकी माहिती मिळविण्यास लाभदायक ठरेल. व्यावसायिक शिक्षण पद्धती अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणाचे स्वरूप यांची सध्याच्या व्यावसायिक गरजांशी सुसंगतता हा एक महत्त्वाचा प्रश्न असून, त्यासाठी शासनस्तरावरून आणि खासगी क्षेत्रावरून विविध प्रयत्न सध्याच्या कालावधीत होत आहेत. तसेच उद्योगक्षेत्र आणि व्यावसायिक शिक्षण संस्था यांचे सहकार्यदेखील मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्याचा परामर्श घेणे फायदेशीर ठरते.
व्यावसायिक शिक्षणाच्या उपलब्धतेबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची गुणवत्तादेखील तितकीच महत्त्वाची ठरते. व्यावसायिक शिक्षणाच्या गुणवत्तासंवर्धनासाठी व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यांकन आणि नियमन महत्त्वाचे ठरते. शासनाद्वारे व्यावसायिक शिक्षणाच्या नियमनासाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्था आणि संस्थांची कार्यपद्धती याची नेमकी माहिती मिळविणे आवश्यक ठरते. व्यावसायिक शिक्षणाच्या मूल्यांकनासंदर्भातील सद्य:स्थितीतील संदर्भाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. काही आंतरराष्ट्रीय संस्थादेखील अशा प्रकारचे मूल्यांकन करीत असतात. अशा संस्थांद्वारे भारतातील काही संस्थांना दिलेली मानांकने अनेकदा वृत्तपत्रांद्वारे जाहीर होत असते. अशा संदर्भाचा समावेश विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात केल्यास फायदेशीर बाब ठरेल.
भारतातील आणि महाराष्ट्रातील तंत्रशिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि रचनांचा वेध घेणे आवश्यक ठरते. या सर्व बाबींचा नेमक्या नोट्स केल्यास योग्य वेळेत परीक्षेची तयारी शक्य होते आणि अभ्यासाच्या वेळेच्या नियोजनाचे पालन करण्यास मदत होते.
व्यावसायिक शिक्षणाशी निगडित सामाजिक, आर्थिक घटकांचा विचार करणे आवश्यक ठरते. त्यासंदर्भातील शासन प्रयत्नांची माहिती मिळविणे उपयुक्त ठरते. ग्रामीण भागातील व्यावसायिक शिक्षणाच्या संधी वाढविण्यासंदर्भातील शासकीय योजनांची माहिती मिळविण्याची आवश्यकता असून, त्यासंदर्भातील खासगी आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचा वेध घेतल्यास अभ्यासाची सखोलता वाढविणे शक्य होईल.
तंत्रशिक्षणाच्या प्रसारासाठी अनौपचारिक शिक्षण प्रणालींचा अवलंबदेखील करण्यात येत असून, त्यांची अंमलबजावणी मुख्यत: औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे करण्यात येते. त्यासंदर्भातील माहितीचे संकलनदेखील तयारीची सखोलता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. बाराव्या पंचवार्षिक आराखडय़ामधील व्यावसायिक शिक्षणासंदर्भातील महत्त्वाच्या तरतुदींच्या आणि उद्दिष्टांची माहितीदेखील परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त ठरेल.
‘व्यावसायिक शिक्षण’ घटकाच्या तयारीसाठी सद्य:स्थितीच्या अधिकृत संदर्भाचे अवलोकन नेमक्या तयारीसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

No comments: