Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी अनिवार्य व्यावहारिक मराठीची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी अनिवार्य व्यावहारिक मराठीची तयारी


मंगेश खराटे ,शुक्रवार, ३० मार्च २०१२
द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

mangeshkharate@gmail.com
altमराठी अनिवार्यचा अभ्यासक्रम निर्धारित करताना विद्यार्थ्यांकडे मराठीच्या उपयोजनाची क्षमता आहे की नाही हे तपासण्यासाठी व्यावहारिक मराठीचा अंतर्भाव केला आहे. यात मुख्यत भाषांतर, सारांशलेखन, परिच्छेदावरील प्रश्न, आशयलेखन, पत्रलेखन, अहवाललेखन आणि संवादकौशल्य या घटकांचा समावेश केला आहे.
प्रस्तुत लेखात भाषांतर, सारांशलेखन, आशयलेखन आणि परिच्छेदावरील प्रश्न या घटकांविषयी जाणून घेणार आहोत.
भाषांतराचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हणजे प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी उताऱ्याचे सुगम मराठीत भाषांतर करण्यासाठी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांचे योग्य आकलन अत्यावश्यक ठरते. भाषांतरासाठी दिलेल्या परिच्छेदाचा आशय समजून घेण्यासाठी इंग्रजी शब्दार्थ, म्हणी-वाक्प्रचारांचे आकलन, वाक्यरचना व प्रकाराची ओळख आणि व्याकरण या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. या आधारेच उताऱ्याचा आशय लक्षात घेता येतो. त्याचबरोबर उताऱ्यातील आशय नेमकेपणाने मांडण्यासाठी मराठी भाषेवर प्रभुत्व हवे. उताऱ्यातील प्रत्येक ओळीचा अर्थ लक्षात घेऊन त्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी योग्य शब्द, म्हणी आणि व्याकरणदृष्टय़ा अचूक वाक्यरचनेची आवश्यकता असते. वस्तुत: भाषांतर ही एक कला आहे, त्यासाठी दोन्ही भाषांचे ज्ञान अत्यावश्यक आहे. दोन्ही भाषांतील विपुल शब्दसंग्रह गाठीशी असावा. विविध इंग्रजी म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्दांची माहिती असावी. त्याची खुबीने सोप्या सुलभ मराठीत मांडणी करता यावी. एखादा इंग्रजी परिच्छेद घेऊन सुरुवातीला ‘डिक्शनरी’ हाती घेऊन भाषांतर करावे. इंग्रजीतून मराठीत जी पुस्तके आली आहेत ते वाचावे. इंग्रजी पुस्तक वाचल्याने इंग्रजीच्या अभ्यासाला फायदाच होतो. ‘द िहदू’ या इंग्रजी वर्तमानपत्रातील रामचंद्र गुहा वा पी. साईनाथ, अमर्त्य सेन यांचे लेख भाषांतर करून ‘परिवर्तनाचा वाटसरू’ या पाक्षिकामध्ये येतात, ते जरूर अभ्यासावेत.
सारांशलेखनाच्या बाबतीत विद्यार्थ्यांची आकलन व भाषिक म्हणजे अभिव्यक्तीची क्षमता महत्त्वाची ठरते. सारांशलेखनासाठी दिलेल्या परिच्छेदातील प्रतिपादनाचा अर्थ काय? त्यातून कोणता विचार प्रकट होतो? किंवा एखाद्या समस्येकडे पाहण्याचा लेखक/लेखिकेचा दृष्टिकोन काय? त्यातून त्यांना कोणता संदेश द्यायचा आहे? या प्रश्नांचे अचूक आकलन महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे एखादा दाखला, उदाहरण अथवा  संवादाद्वारे संबंधित विषय विस्तृतपणे मांडला जातो. अशा वेळी त्यातून कोणता निष्कर्ष अधोरेखित होतो, यावर लक्ष केंद्रित करावे. थोडक्यात, प्रश्नपत्रिकेत सारांशलेखनासाठी दिलेल्या उताऱ्याचा आशय समजल्यास त्याचा थोडक्यात सारांश मांडणे सुलभ जाते. त्यासाठी मूळ उताऱ्यातील शब्दसंख्येचे मोजमाप करून त्याचा १/३ शब्दसंख्येतच सारांश लिहिला जाईल याची खबरदारी घ्यावी. म्हणूनच आशयघन व नेमक्या लेखनाची सवय महत्त्वपूर्ण ठरते.
आशयलेखनाच्या बाबतीतही विद्यार्थ्यांची आकलनक्षमता आणि लेखनक्षमताच अत्यावश्यक ठरते. दिलेल्या उताऱ्याचा नेमका अर्थ लक्षात घेऊन त्याचा थोडक्यात आशय लिहिण्यासाठी प्रभावी लेखनशैली विकसित करणे अत्यावश्यक ठरते. अर्थात यासाठी उताऱ्यातून प्रतित होणारा थेट अर्थ आणि त्याचबरोबर मथितार्थ लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी नेमकेपणाने वाचन करणे आणि त्यास अचूकपणे शब्दांत मांडणे गरजेचे ठरते. दर्जेदार, कसदार साहित्याचे वाचन आणि सातत्यपूर्ण लिखाणाच्या सरावातूनच अशा घटकांवर प्रभुत्व मिळविता येते.
त्याचप्रमाणे उताऱ्यावरील प्रश्नात हा एक उपयोजनात्मक मराठीतील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी उताऱ्यातील आशय, त्याचे नेमके वाचन, उताऱ्याखाली दिलेल्या प्रश्नांचे योग्य आकलन या बाबी महत्त्वाच्या ठरतात. प्रश्नांची उत्तरे देताना समजलेला आशय स्वत:च्या भाषेत लिहिणे ही बाब महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजेच प्रश्नांची उत्तरे लिहिताना उताऱ्यातील वाक्य जशीच्या तशी लिहिण्याचे टाळावे. उपरोक्त नमूद केलेल्या ‘भाषांतरा’पासून ते ‘उताऱ्यावरील प्रश्न’ या घटकांची उकल करताना विद्यार्थी आपली आकलनक्षमता उपयोगात आणतो की नाही ही बाब तपासली जाते.
व्यावहारिक मराठी अंतर्भूत होणाऱ्या सर्व घटकांच्या तयारीसाठी विपुल वाचन आणि सातत्यपूर्ण लिखाण आवश्यक ठरते. तथापि विद्यार्थी बहुतांश वेळा एखाददुसऱ्या संदर्भपुस्तकावरच भिस्त ठेवतो. मराठीच्या तयारीसाठी इतर संदर्भपुस्तके अभ्यासण्याची सवय परीक्षार्थीना नसते. परिणामी बाजारातील एखाद्या पुस्तकाच्या आधारेच मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम ‘उरकला’ जातो. मग गुणही यथातथाच प्राप्त होतात. जसे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यव्यवस्था या घटकांच्या तयारीसाठी अनेक संदर्भाचा वापर केला जातो, तसे मराठीसाठीही अनेक संदर्भाचा अवलंब केल्यास चांगले गुण प्राप्त करता येतील यात शंका नाही.

No comments: