Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : नकारात्मक गुणपद्धतीला सामोरे जाताना

‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : नकारात्मक गुणपद्धतीला सामोरे जाताना

तुकाराम जाधव ,मंगळवार, २० मार्च २०१२ 
संचालक, द युनिक एॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ७ जानेवारी २००९ रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. यानुसार २००९ पासून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांपकी ज्या परीक्षा वस्तुनिष्ठ , बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित असतील त्यासाठी आयोगाने नकारात्मक गुणपद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उमेदवाराला चुकीच्या उत्तरासाठी गुणांच्या परिभाषेत जणू शिक्षा दिली जाणार आहे. कारण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला असलेल्या गुणापकी १/४ गुण वजा केले जातील. सोप्या भाषेत उत्तरपत्रिकेत सोडविलेल्या प्रत्येक चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. स्वाभाविकच पूर्वपरीक्षेतील संपूर्ण २०० प्रश्नांची उकल न करता ज्या प्रश्नांच्या अचूक उत्तरांविषयी आत्मविश्वास वाटतो असे प्रश्न सोडवण्यावर भर हवा. नव्या पद्धतीद्वारे आयोगाने एका अर्थाने अभ्यासू व व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांला नवी संधीच बहाल केली आहे. त्यामुळे ही गुणपद्धती एक आवाहन न मानता संधी म्हणूनच लक्षात घेतली पाहिजे. अर्थात त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अधिक नेमका अभ्यास करणे गरजेचे आहे.
नकारात्मक गुणपद्धतीला यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी नेमका अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि प्रश्नपत्रिका सोडविण्यातील अचूकता ही  त्रिसूत्री महत्त्वाची ठरणार आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करता असे लक्षात येते की, प्रश्नपत्रिकेतील ५० टक्के प्रश्न विद्यार्थ्यांने केलेल्या अभ्यासावर आधारित जसेच्या तसे म्हणजे थेट स्वरूपाचे असतात. ३० ते ३५ टक्के प्रश्न हे त्याने केलेल्या अभ्यासातील ज्ञानाच्या ताíकक आणि उपयोजनात्मक ‘स्वरूपा’वर आधारभूत असतात. उर्वरित १० ते १५ टक्के प्रश्न पूर्णत नव्या स्वरूपाचे असतात. विद्यार्थ्यांने नेमका व व्यवस्थित अभ्यास केल्यास एकूण प्रश्नांपकी किमान ८० टक्के प्रश्नांची (२००/१६०) अचूक उत्तरे सोडविणे शक्य होते.
‘निगेटिव्ह गुण पद्धतीचा’ विचार करताना विद्यार्थ्यांनी ‘अभ्यासाची व्यूहरचना’ आणि ‘प्रश्नपत्रिका सोडविण्याची व्यूहरचना’ अशा दोन्ही स्तरांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे. दोन्ही घटकांची व्यवस्थित सांगड घातली गेली तरच विद्यार्थ्यांला पूर्वपरीक्षेत यश मिळवता येऊ शकेल. त्यादृष्टीने आता विद्यार्थ्यांनी स्वत:चे कच्चे दुवे कोणते आहेत हे लक्षात घ्यावे. त्या दृष्टीने प्रत्येकाने अभ्यासक्रमातील घटकनिहाय स्वत:चे स्ट्राँग आणि वीक एरियाज् कोणते? हे लक्षात घ्यावे. म्हणजे कोणत्या घटकात आपल्याला गती आहे आणि कोणता घटक कमकुवत आहे याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करावे.
आपला अभ्यास नेमका व अचूक व्हावा यासाठी प्रमाणित, अद्ययावत संदर्भसाहित्यच वाचण्यावर जोर द्यावा. अभ्यासक्रमातील घटकनिहाय शॉर्ट नोट्स, वारंवार उजळणी आणि प्रश्नपत्रिकांचा नियमित सराव या बाबींवर भर द्यावा. यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि योग्य मार्गदर्शन हे घटक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. नेमक्या अभ्यास साहित्यासाठी विद्यार्थ्यांनी बाजारू साहित्य टाळून खात्रीशीर अभ्यास साहित्यावर भर दिला पाहिजे, प्रत्येक घटकाची अभ्यासपद्धती जाणून घेऊन त्याच्या शॉर्ट नोट्स तयार कराव्यात. त्यातील महत्त्वाच्या संकल्पना, सिद्धांत आणि आकडेवारीसारखा तांत्रिक भाग या सर्व बाबींना समप्रमाणात महत्त्व द्यावे. सराव चाचण्यांतून कोणत्या घटकावरील प्रश्न चुकत आहेत? त्याची कारणे कोणती? हे व्यवस्थितपणे शोधावे. त्यातूनच आपल्या तयारीतील उणिवा लक्षात घेऊन त्यावर मात करता येईल.
एकूणच राज्यसेवा पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या व अपात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विश्लेषणातून सामोरे आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या तांत्रिक ‘चुका’. यात प्रश्न घाई-घाईत वाचणे, पर्याय घाई-घाईत वाचणे, प्रश्नाच्या स्वरूपाचे व्यवस्थित आकलन न होणे, व्यवस्थित उजळणी न केल्यामुळे अचूक उत्तराबाबत गोंधळ निर्माण होऊन चुकीच्या ठिकाणी मार्क करणे आणि पुरेशा सराव चाचण्या न दिल्याने प्रश्नपत्रिका सोडविताना नियोजनाचा बोजवारा उडणे याचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. या बाबीच प्रमुख धोके म्हणून लक्षात ठेवले पाहिजेत. 
उपरोक्त धोक्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांने १२० मिनिटांत २०० प्रश्नांपकी कोणते प्रश्न बरोबर सोडविता येतील यावरच मुख्यत: भर दिला पाहिजे. आणि आपल्याला न येणाऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करावे. अर्थात २०० प्रश्नांपकी १७० ते १७५ प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. यातील किमान १३५ ते १४० प्रश्नांच्या अचूकतेबाबत विद्यार्थ्यांला खात्री असावयास हवी. आणि त्याआधारेच २५ ते ३० प्रश्नांबाबत विद्यार्थी धोका पत्करू शकतो. म्हणजे एकंदर १७० ते १७५ प्रश्न सोडविता येतील. त्यामुळे राहिलेल्या २० ते ३० प्रश्नांचा वेळ इतर प्रश्नांवर खर्ची घालून त्यातून जास्तीत जास्त अचूक प्रश्न सोडविणे शक्य होईल. 
नकारात्मक गुणपद्धतीमुळे सराव चाचण्यांना आता पूर्वीपेक्षाही अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अर्थात सराव चाचण्या सोडवताना विद्यार्थ्यांने विशिष्ट पद्धतींचा वापर केला पाहिजे. त्यात प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची त्यांच्या स्वरूपांवर आधारित वर्गवारी करावी. उदा. प्रश्न पत्रिकेतील प्रश्न ‘अ’ गट, ‘ब’ गट, ‘क’ गट अशा पद्धतीने विभागावेत. ‘अ’ गटात खात्रीशीररीत्या उत्तर येणारे प्रश्न समाविष्ट करावेत. ‘ब’ गटात प्रश्नांच्या पर्यायांमधून हेच उत्तर आहे याची ५० टक्के खात्री असणारे प्रश्न समाविष्ट करावेत. तर ‘क’ गटात पूर्णपणे अनोळखी प्रश्न अंतर्भूत करावेत. आणि यातील ‘अ’ व ‘ब’ गटावर जोर देऊन ‘क’ गटात मोडणारे प्रश्न कमी कसे करावेत याचा सातत्याने विचार करावा. 
नकारात्मक गुणपद्धतीमुळे सर्वसमावेशक व सखोल अभ्यास करणाऱ्या; खऱ्या अर्थाने कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. कारण त्यांनी मिळविलेले अभ्यास साहित्य व योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण उजळणी आणि नियोजनबद्धपणे सोडविलेल्या सराव चाचण्या त्यांना निश्चितच अंतिम यशापर्यंत घेऊन जातील. ही अभ्यासपद्धती अवलंबल्यास पूर्वपरीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल यात शंकाच नाही.
(१) अभ्यास अधिक सखोल, व्यापक, नेमका व अचूक करण्यावर भर द्यावा.
(२) नव्याने प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे.
(३) अभ्यासक्रमातील घटकांमध्ये महत्त्व व तयारीच्या आधारे अग्रक्रम लावावा.
(४) सराव चाचण्यांवर पूर्वीपेक्षा अधिक भर द्यावा.
(५) प्रश्नपत्रिका सोडविताना योग्य रणनीतीचा वापर करावा.
(६) बुद्धिमापन चाचणी व चालू घडामोडी या घटकांकडे विशेष लक्ष द्यावे.
(७) अभ्यासाची स्वत:ची वेगळी व्यूहरचना हवी.
(८) काही प्रमाणात कॅलक्युलेटेड रिस्क घेण्याची तयारी हवी.
(९)  प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न न सोडवता १६५ ते १७५ प्रश्न सोडवावेत. अर्थात प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व स्वतची तयारी या दोन बाबी निर्णायक ठरणार आहेत.

No comments: