Monday, September 3, 2012

'एमपीएससी'चा राजमार्ग : परीक्षेचे अभ्यासधोरण

'एमपीएससी'चा राजमार्ग : परीक्षेचे अभ्यासधोरण


तुकाराम जाधव -
संचालक, द युनिक अकॅडमी, पुणे.

malharpatil@gmail.com 

altविद्यार्थी मित्र-मत्रिणींनो मागील लेखात आपण एमपीएससी म्हणजे काय? तिचे स्पर्धापरीक्षा म्हणून असणारे वेगळेपण आणि स्वरूप या बाबींची चर्चा केली आहे. ही सर्व प्राथमिक चर्चा केल्यानंतर आता नेमका अभ्यास कुठून आणि कसा करायचा? या महत्त्वाच्या, अर्थात कळीच्या प्रश्नाचा उलगडा करणार आहोत. यातूनच राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासाची पद्धती सिद्ध होणार आहे. यालाच आपण एमपीएससीचे अभ्यासधोरण संबोधणार आहोत.प्रस्तुत अभ्यासधोरणातील प्रारंभिक बाब म्हणजे या परीक्षेचे, त्यात समाविष्ट प्रत्येक टप्प्याचे स्वरूप सखोलपणे लक्षात घ्यावे.
अर्थात मागील चच्रेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा, मुख्यपरीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांचे स्वरूप अभ्यासले आहे. त्यातही महत्त्वाचे म्हणजे या परीक्षेचे स्पर्धात्मक स्वरूपही पाहिले आहे. स्वरूपानंतर लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे अभ्यासक्रम होय. आयोगाने पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सविस्तरपणे नमूद केलेला आहे. अभ्यासक्रमातील प्रकरणे, त्यातील उपघटक आणि त्यात अंतर्भूत घटकांचे बारकाईने वाचन करावे. अभ्यासाची लांबी व रुंदी लक्षात घेतल्यास त्याचे योग्य नियोजन करणे सुलभ ठरते. त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाची खोलीही ध्यानात घ्यावी. त्यातूनच एकंदर अभ्यासाचा आवाका निश्चित करता येणे शक्य बनते.
अभ्यासधोरणातील पुढील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण होय. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेच्या मागील किमान ५ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे वाचन करून त्याचे विश्लेषण करावे. त्या-त्या टप्प्यात नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात? त्यात कोणत्या अभ्यास घटकाला किती महत्त्व दिले जाते? एखाद्या घटकावर संकल्पनात्मक, माहिती-प्रधान प्रश्न कशा स्वरूपाचे व किती असतात? संबंधित घटकात चालू घटनांवर काही प्रश्न आहेत का? एखाद्या घटकावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाच्या स्वरूपात काही मूलगामी बदल होत आहेत का? प्रश्नांची खोली वाढत आहे का? इ. महत्त्वपूर्ण अंगांनी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करावे. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे होणारे काही महत्त्वपूर्ण फायदे पुढीलप्रमाणे आहेत. यामुळे प्रश्नांचे स्वरूप व त्यात होणारे बदल लक्षात घेता येतात. तसेच अभ्यासक्रमातील कोणता भाग अधिक महत्त्वाचा आहे हेही लक्षात येते. प्रश्नपत्रिकेत येणारे काही नवे प्रवाह व कलही अधोरेखित करता येतात. त्याशिवाय आपण एखाद्या घटकासाठी जे संदर्भ वापरतो ते पुरेसे आहेत किंवा नाहीत याचीही तपासणी करता येते. आणि शेवटी आपल्या अभ्यासाची दिशाच निश्चित करणे शक्य होते. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हा घटक मध्यवर्ती मानावा लागतो.
उपरोक्त बाबी केल्यानंतर हाती घ्यावयाची बाब म्हणजे संदर्भ साहित्याचे संकलन. आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि त्यावरील प्रश्नपत्रिका सूक्ष्मपणे पाहून कोणत्या विषयासाठी नेमके कोणकोणते संदर्भसाहित्य वापरायचे हे ठरवावे. यासंदर्भात पायाभूत पाठय़पुस्तके, प्रमाणित पुस्तके आणि निवडक संदर्भ ग्रंथाचा वापर महत्त्वाचा ठरतो. त्याशिवाय प्रस्तुत संदर्भसाहित्य हे अधिकृत, प्रमाणित, दर्जेदार आणि अद्ययावत असेल याची खबरदारी घ्यावी. वस्तुत: बाजारात भरमसाठ पुस्तकांची भाऊगर्दी असते. मात्र त्यातील निवडक व प्रमाणित संदर्भ साहित्याची निवड करावी. त्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अधिक श्रेयस्कर ठरते. कारण निरुपयोगी अथवा सुमार दर्जाचे लेखनसाहित्य वाचल्यामुळे वेळ आणि ऊर्जा दोन्हीचा अपव्यय होणार हे नक्की! म्हणूनच सांगोपांग विचारविमर्षांनंतरच संदर्भपुस्तकाची खरेदी करून अभ्यासाची सुरुवात करावी. यासंदर्भात लक्षात ठेवायची एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या परीक्षेसाठी ‘अनेक पुस्तके मर्यादित अथवा कमी वेळा वाचण्यापेक्षा काहीच पुस्तके पुन्हा-पुन्हा वाचण्यावर’ लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे संबंधित विषयाचा सखोल अभ्यास करणे सोईस्कर ठरते. त्याचा नेमका अर्थ, मतितार्थ, त्याचे आयाम इ. बाबींचे योग्य रीतीने आकलन करणे शक्य बनते आणि अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकावर प्रभुत्व निर्माण करता येते.
संदर्भसाहित्यातील एक मध्यवर्ती घटक म्हणजे वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचा वापर होय. त्या दृष्टीने ‘लोकसत्ता’ हे दैनिक; ‘परिवर्तनाचा वाटसरू’ हे पाक्षिक; ‘लोकराज्य’ व ‘योजना’ ही मासिके आणि युनिक प्रकाशनाची ‘महाराष्ट्र वार्षकिी’ या यादीवर भर द्यावा. पूर्व, मुख्य आणि मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या चालू घडामोडीतील प्रश्नांच्या तयारीसाठी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे नियमित, सातत्यपूर्ण व सखोल वाचन अत्यावश्यक ठरते. संदर्भाचे वाचन करताना सूक्ष्म स्वरूपातील नोट्सची तयारी, महत्त्वाची कात्रणे कापून ठेवणे आणि एकाच मुद्याच्या विविध आयामासह मांडलेल्या विविध मत-मतांतराच्या नोट्स तयार करणे, या बाबींवर भर द्यावा. त्याआधारे एका बाजूला निव्वळ तांत्रिक माहिती प्रधान आणि दुसऱ्या बाजूला विश्लेषणात्मक बाजूला योग्य न्याय द्यावा. अन्यथा आपला अभ्यास एकांगी होण्याचीच शक्यता आहे.
अभ्यासधोरणातील शेवटची बाब म्हणजे योग्य नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी होय. उपरोक्त साधनांची जमवाजमव केल्यानंतर अभ्यास व वेळेचे नियोजन ही बाब कळीची ठरते. त्यात परीक्षेचा विशिष्ट टप्पा, त्यातील अभ्यासक्रम व अभ्यासघटक, त्यांचे परीक्षेतील महत्त्व, त्यासाठी वाचावयाची संदर्भ पुस्तके, त्या-त्या अभ्यासघटकातील आपली पाश्र्वभूमी व गती या सर्व घटकांना लक्षात घेऊनच अभ्यासाचे नियोजन तयार करावे. नियोजनाची आखणी करतांना प्रत्येक घटकाला रास्त महत्त्व दिले जाईल याची खबरदारी घ्यावी. आपल्या आवडीच्या विषयात वा अभ्यासघटकांसाठी अनाठायी वेळ दिला जाणार नाही हे पाहावे. या दृष्टीने विचार करता प्रत्येक संदर्भ पुस्तकाचे किमान तीन वेळा वाचन होईल याची दक्षता घ्यावी. त्यासाठी पहिले वाचन, दुसरे वाचन आणि तिसरे वाचन याचे वेळापत्रक तयार करावे. यातील पहिल्या वाचनासाठी बराच कालावधी गरजेचा असतो. दुसऱ्या व तिसऱ्या वाचनासाठी आवश्यक कालावधी उत्तरोत्तर कमी होत जातो. उदा. पूर्वपरीक्षेसाठी चार महिन्यांचा कालावधी निर्धारित केल्यास पहिल्या वाचनासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी राखीव ठेवावा लागतो. त्यानंतर ४०-४५ दिवसांत दुसरे वाचन आणि २०-२५ दिवसांत तिसरे वाचन करणे शक्य होते. वाचनाचे हे तीन टप्पे आणि त्यासाठीचा कालावधी निर्धारित केल्यास त्यातील प्रत्येक टप्प्याची विषय व त्यातील अभ्यासक्रमानुसार अंतर्गत विभागणी करावी लागते. उदा. पहिल्या टप्प्यातील ६० दिवसांत पूर्वपरीक्षेतील एकंदर सहा अभ्यासघटकांचे वाचन करायचे आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक घटक व त्यावरील संदर्भसाहित्यासाठी द्यावयाचा कालावधीही ठरवावा आणि निर्धारित वेळेतच तो संदर्भ अभ्यासून पूर्ण करावा लागेल. अर्थात एखाद्या पूर्णपणे नव्या आणि अवघड विषयासाठी इतर घटकापेक्षा अधिक कालावधी देणे अत्यावश्यक ठरते. अभ्यास व वेळेच्या नियोजनात वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांसाठी दैनंदिन वेळापत्रकातील किमान दोन ते तीन तास कालावधी निर्धारित करावा. चालू घडामोडीची तयारी ही सातत्यपूर्ण रीत्या केल्यासच त्यावर प्रभुत्व मिळवता येते. आपल्या नियोजनातील आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव होय. त्यासाठी सुरुवातीपासूनच विशिष्ट वेळ राखीव ठेवावा. प्रत्येक अभ्यासघटकातील संदर्भाचे वाचन झाल्यानंतर त्यावरील सरावप्रश्नांची नियमितपणे उकल करावी. विशेषत: दुसऱ्या व तिसऱ्या वाचनाच्या वेळी सरावप्रश्नपत्रिकांसाठी अधिकाधिक वेळ द्यावा. म्हणजे १० तासांतील ५-६ तास वाचन व उजळणीसाठी असल्यास उर्वरित ३-४ तास प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी वापरावेत. प्रश्नपत्रिकांच्या सरावामुळे आपल्या अभ्यासाची तपासणी करता येईल आणि त्यात परीक्षाभिमुखतेची हमी देता येईल. आपल्या तयारीतील त्रुटी लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्यावर जोर देता येईल. त्यामुळे अभ्यास म्हणजे केवळ वाचन नव्हे तर केलेल्या वाचनाची, अभ्यासाची उलटतपासणी म्हणजेच सराव प्रश्नपत्रिकांची उकल होय. सर्वसाधारण विचार करता एका वर्षांचा कालावधी, दररोज १०-११ तास प्रभावीपणे वापरल्यास राज्यसेवेची संपूर्ण तयारी यशस्वी रीत्या करणे शक्य आहे. त्यातील ८ महिन्यांचा कालावधी मुख्य परीक्षेसाठी आणि ४ महिन्यांचा कालावधी पूर्वपरीक्षेसाठी राखून ठेवावा. अर्थात आपल्या तयारीची सुरुवात मुख्यपरीक्षेच्या अभ्यासानेच करावी. सुरुवातीला मुख्यपरीक्षेचा अभ्यास केल्यानंतरच पूर्वपरीक्षेच्या तयारीला आरंभ करावा. या दोन्ही टप्प्यांची तयारी केल्यामुळे मुलाखतीचीही तयारी होते हे लक्षात घ्यावे आणि मुख्यपरीक्षा दिल्यानंतर मुलाखतीपर्यंत जो कालावधी उपलब्ध होतो त्यात विशेषत्वाने मुलाखतीच्या तयारीवर भर द्यावा. अशा रीतीने वर्षभराचे परीक्षानिहाय वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. नियोजनाची योग्य अंमलबजावणी होत आहे अथवा नाही यासाठी अभ्यासाचे नियमितपणे पुनरावलोकन करून त्यात वेळोवेळी आवश्यक दुरुस्त्या करण्यावर भर द्यावा. अशा रीतीने नियोजनबद्ध, सातत्यपूर्ण, नेमक्या व परीक्षाभिमुख अभ्यासधोरणाचा स्वीकार केल्यास यश प्राप्त करणे शक्य आहे यात शंका नाही.

No comments: