Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग-मुख्य परीक्षा : भूगोलाच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - १

‘एमपीएससी’चा राजमार्ग-मुख्य परीक्षा : भूगोलाच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख - १

डॉ. अमर जगताप ,मंगळवार, १७ एप्रिल २०१२
प्राध्यापक : द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
jagtapay@gmail.com
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या नेहमीच्या ‘दे धक्का’ शैलीत राज्यसेवा मुख्य  परीक्षेच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाच्या प्रश्नपत्रिका क्र. १ मध्ये ‘दुसरा’ व ‘तिसरा’ घटक भूगोलाचा आहे. दुसरा घटक ‘भूगोल- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह’ आणि तिसरा घटक ‘भूगोल आणि कृषी’ असा आहे. नव्या अभ्यासक्रमात भूगोल हा घटक अत्यंत विस्तृत व चालू घडामोडींच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात आला आहे. नव्या पद्धतीत प्राकृतिक व मानवी भूगोलासह महाराष्ट्र व भारताचा भूगोल नमूद केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणासारख्या सद्य:स्थितीत चच्रेत असणाऱ्या समकालीन विषयालाही स्थान देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अभ्यासक्रमात काही कृषीविषयक घटकांचादेखील अंतर्भाव केला आहे. आजच्या लेखात सामान्य अध्ययन पेपर क्र.१ मधील दुसऱ्या घटकांतर्गत दिलेल्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख करून घेणार आहोत.
घटक २ : भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात
१. प्राकृतिक भूगोल :
 या घटकामध्ये आयोगाने अथपासून इतीपर्यंत सर्व घटकांचा समावेश केल्याचे दिसून येते. कारण पृथ्वीच्या अंतरंगाच्या रचनेपासून ते थेट महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेपर्यंत सर्व घटक एकत्रित करण्यात आले आहेत. या घटकामध्ये भूरूपशास्त्रातील काही महत्त्वाच्या संकल्पना समाविष्ट करण्यात आल्या आहेत. स्वाभाविकच महाराष्ट्र व भारताच्या प्राकृतिक रचनेसंबंधी संकल्पनात्मक स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे हिंदी महासागर व भारताचे दक्षिण आशियामधील स्थान यावर चालू घडामोडींच्या अनुषंगाने काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा., चीनच्या सेशल्स बेटावरील नाविक तळाची स्थापना, स्ट्रींज ऑफ पर्ल्स पॉलिसी या ताज्या घडामोडींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
२. महाराष्ट्राचा आíथक भूगोल : या घटकामध्ये खनिज व ऊर्जा साधनसंपत्ती, पर्यटन, पर्यावरणाशी संबंधित काही घटकांचा अभ्यास समाविष्ट करण्यात आला आहे. हा घटक महाराष्ट्रासंबंधी असल्यामुळे महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीची सखोल माहिती आवश्यक आहे. महाराष्ट्रातील खनिजसंपन्न क्षेत्रे कोणती व त्या ठिकाणी कोणती खनिजे सापडतात याची माहिती नकाशासह असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विचार करता धार्मिक, वैद्यकीय, पर्यावरणीय पर्यटनाची माहिती संबंधित पर्यटन स्थळांच्या माहितीसह गोळा करणे अपेक्षित आहे. त्याच्याशी संबंधित विशेषत: राज्य सरकारच्या योजना विद्यार्थ्यांना अवगत असाव्यात. या घटकांमध्ये महाराष्ट्रातील अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, किल्ले यांची जिल्हानिहाय माहिती संकलित करावी. नव्याने उदयाला आलेले व्याघ्र प्रकल्प, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्यानाची माहिती हाताशी असावी. थोडक्यात, या घटकाकरिता वस्तुनिष्ठ ज्ञान व चालू घडामोडींची माहिती असणे आवश्यक आहे. 
३. महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल : या घटकामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम या सद्य:स्थितीतील समस्येचा अभ्यास आवश्यक आहे. त्यामध्येदेखील विशेषत: ऊसतोड कामगारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या संदर्भातील शासनाच्या योजना व करार माहिती असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील ग्रामीण व नागरी वस्त्यांचे स्वरूप व त्यांच्या समस्यांचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील नागरीकरणाचा वेग वाढत आहे, पण त्यात मोठा असमतोल असून त्याचे दुष्परिणामदेखील तीव्र स्वरूपाचे आहेत. नागरीकरणाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्यांच्या महत्त्वपूर्ण योजनांचे ज्ञान आवश्यक आहे. (उदा.,  खठठवफट जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्नवीकरण अभियान). थोडक्यात सद्य:स्थितीतील समस्या व त्यावरील शासकीय योजनांच्या स्वरूपातील उपाय यांची माहिती आवश्यक आहे. 
२. पर्यावरण भूगोल : संपूर्ण भूगोलाच्या अभ्यासक्रमातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पर्यावरण भूगोल आहे. या घटकात पर्यावरण व संबंधित संकल्पना, विशेषत: ज्या सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चच्रेत आहेत, त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पर्यावरण, परिस्थितिकी, परिसंस्था, अन्नसाखळी, अन्नजाळे, ऊर्जाचक्र या मूलभूत संकल्पनांचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीतील पर्यावरणाचा ऱ्हास व त्याच्याशी संबंधित घटक उदा.,  हरितगृह परिणाम, जागतिक तापमानवाढ, ओझोनच्या थराचा ऱ्हास, आम्लवर्षां, प्रदूषण, वाळवंटीकरण, पाणथळ भूमीचा ऱ्हास, इ.ची माहिती असणे आवश्यक आहे. या दुष्परिणामावर मात करण्यासाठी जागतिक पातळीवर हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना अवगत असल्या पाहिजेत. उदा., मॉन्ट्रियल करार, क्योटो करार, दरबन येथील परिषद इ.
२. लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) : आयोगाने अभ्यासक्रमाच्या २.३ या प्रकरणातील स्थलांतर, त्याची कारणे व परिणाम; ग्रामीण व नागरी वसाहती, त्यांच्या समस्या हे घटक पुन्हा महाराष्ट्राच्या संदर्भात या घटकामध्ये नमूद केले आहेत. या घटकाच्या तयारीसाठी लोकसंख्याविषयक सर्वसमावेशक माहिती अवगत असणे गरजेचे आहे. २०११च्या जनगणना अहवालातील अद्ययावत माहिती हाती असणे अत्यावश्यक आहे. या माहितीचा अभ्यास करताना २००१ व २०११ या दोन्ही जनगणनांचा तुलनात्मक अभ्यास करणे उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे भारत व महाराष्ट्र या दोन्ही एककासंबंधी आकडेवारी अभ्यासणे आवश्यक आहे. जनगणनेतील एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, नागरीकरण, स्त्री-पुरुष प्रमाण, जन्म व मृत्यू दर, बालमृत्यू दर, मातामृत्यू दर अशा महत्त्वपूर्ण आकडेवारीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कारण या घटकांशी संबंधित जास्त प्रतिकूल परिस्थिती किंवा समस्या आहेत. 
२. दूरसंवेदन : आयोगाने अभ्यासक्रमाचे पूर्णपणे तांत्रिक स्वरूप असलेला हा घटक प्रथमच समाविष्ट केला आहे. २०व्या शतकात अवकाश संशोधनामध्ये क्रांती झाल्यामुळे कृत्रिम उपग्रहांचा विकास झाला व त्याद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे दुरून, आकाशातून निरीक्षण व अभ्यास करणे सोपे झाले, त्यास दूरसंवेदन म्हणतात. त्याचप्रमाणे या घटकामध्ये संगणक, माहिती तंत्रज्ञान व त्यांचे भूगोलातील उपयोजन याच्याशी संबंधित ‘भौगोलिक माहिती प्रणाली’ हा घटक समाविष्ट करण्यात आला आहे. कृत्रिम उपग्रह व संगणक प्रणाली यावर आधारित ‘जागतिक स्थान निश्चिती प्रणाली’ हा या घटकामधील पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतदेखील विकसित राष्ट्रांप्रमाणे स्वत:ची ‘गगन’ ही जागतिक स्थान निश्चिती प्रणाली विकसित करीत आहे. त्याची संपूर्ण माहिती व इतर राष्ट्रांच्या या प्रणालींची नावे, माहिती, तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे. अशा रीतीने उपरोक्त नमूद केलेल्या प्रकरणातील अभ्यासक्रमाची व्याप्ती ठरवून अभ्यासाचे धोरण आखणे उपयुक्त ठरेल. त्याआधारेच या विषयाला द्यावा लागणारा वेळ निर्धारित करता येईल.

No comments: