Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-१

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा: सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-१



कैलास भालेकर, गुरुवार, ३१ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com
सामान्य अध्ययन-४ मध्ये ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ या घटकाचा समावेश केला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास हा घटक खूपच उपयोजित असून, या घटकाची तयारी अद्ययावत संदर्भासह करणे आवश्यक ठरते.


विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास घटकांतर्गत ऊर्जा, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, भारताचे आण्विक धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन या सहा उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. या उपघटकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या संकल्पनांचे वस्तुनिष्ठ आकलन आणि संकल्पनांच्या उपयोजनांसंदर्भातील अद्ययावत माहितीचे संकलन हा विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे.
‘ऊर्जा’ ही महत्त्वाची आíथक पायाभूत संरचना असून राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने ‘ऊर्जा’ या पायाभूत संरचनेचा विकास महत्त्वाचा ठरतो. पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जास्रोत यामध्ये कोणता फरक आहे? आणि पारंपरिक ऊर्जास्रोतांची आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांची उदाहरणे यांची माहिती मिळविणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत अपारंपरिक ऊर्जास्रोत का महत्त्वाचे ठरत आहेत याची वस्तुनिष्ठ माहिती मिळविणे फायदेशीर ठरते.
पुनर्नवीकरण ऊर्जास्रोत म्हणजे काय? पुनर्नवीकरण ऊर्जास्रोतांचे महत्त्व कोणते आहे? पुनर्नवीकरण ऊर्जास्रोत सद्य:स्थितीत का महत्त्वाचे ठरत आहेत? पुनर्नवीकरण ऊर्जास्रोतांची उदाहरणे या सर्व बाबींची तयारी ‘ऊर्जा’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. सौरऊर्जा, पवनऊर्जा, बायोगॅस, बायोमास, भू-औष्णिक ऊर्जा या पुनर्नवीकरण ऊर्जास्रोतांची तंत्रज्ञानविषयक माहिती वस्तुनिष्ठ स्वरूपात मिळविणे गरजेचे ठरते. सौरऊर्जा भारताच्या ऊर्जा विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून सोलर हीटर, सोलर कुकर, सोलर फोटोव्होल्टाईक सेल (सौर घट) ही उपकरणे सद्य:स्थितीमध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहेत.
शाश्वत आणि पर्यावरणपूरक स्रोत म्हणून सौरऊर्जा महत्त्वाची आहे. बायोगॅस सयंत्रे ग्रामीण भागातील ऊर्जा उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वाची असून हा एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जास्रोत आहे. ‘बायोगॅस’ सयंत्राचे तत्त्व आणि प्रक्रिया यांची नेमकी तयारी आवश्यक ठरते.
भारतातील ऊर्जा समस्या, ऊर्जा समस्येची कारणे आणि ऊर्जा समस्या सोडविण्यासंदर्भातील महत्त्वाच्या शासकीय उपाययोजना आणि कार्यक्रम या बाबींची नेमकी माहिती ‘ऊर्जा’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. ऊर्जानिर्मिती संदर्भातील महत्त्वाच्या शासकीय अभियानांची माहिती मिळविणे गरजेचे असून ऊर्जानिर्मितीसाठी कार्यरत महत्त्वपूर्ण यंत्रणांची माहिती मिळविणे उपयुक्त ठरते. औष्णिक विद्युत, जलविद्युत, अणुऊर्जा या विद्युतनिर्मिती संकल्पनात्मक आकलन आवश्यक आहे. विद्युतनिर्मिती संदर्भातील समस्यांचे आकलन आवश्यक असून ही तयारी सद्य:स्थितीतील संदर्भासह करणे लाभदायक ठरेल.
वीज वितरण आणि वीज वितरणासाठी कार्यरत असणाऱ्या नॅशनल ग्रीड या यंत्रणेच्या कार्यपद्धतीचे नेमके आकलन आवश्यक असून, या सर्व बाबींची तयारी तंत्रज्ञानविषयक संकल्पनांच्या आधारे करणे उपयुक्त ठरते. वीज वितरणविषयक समस्या आणि या समस्या सोडविण्यासंदर्भातील महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती सद्य:स्थितीतील संदर्भासह करणे लाभदायक ठरेल. ‘ऊर्जा सुरक्षा’ या संकल्पनेच्या आकलनाबरोबरच भारतातील ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व कोणते आहे? भारतामध्ये ऊर्जा सुरक्षासंदर्भात कार्यरत असणाऱ्या यंत्रणा आणि या यंत्रणांची कार्यपद्धती या बाबींची तयारी ‘ऊर्जा’ उपघटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. ऊर्जा सुरक्षेसंदर्भातील संशोधन आणि विकासातील महत्त्वाच्या टप्प्यांचे आकलनदेखील त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते.
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या उपघटकाची तयारी करताना या घटकाशी निगडित अद्ययावत बाबींची तयारी करावी लागते. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान विकास भारताच्या तंत्रज्ञान विकासातील महत्त्वाचा टप्पा असून संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव विविध क्षेत्रांवर पडला आहे. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे उपयोजन विविध क्षेत्रांत कशा पद्धतीने होत आहे याचे अद्ययावत आकलन आवश्यक ठरते. तसेच, सायबर गुन्हे प्रकार, स्वरूप आणि सायबर गुन्हे रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांची तयारीदेखील आवश्यक ठरते. सायबर गुन्हे रोखण्यासाठीच्या कायद्यांच्या महत्त्वाच्या तरतुदींची माहिती संकलित केल्यास अधिक नेमकेपणाने या उपघटकाची तयारी करणे शक्य होईल. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोजनांबरोबरच संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाची उपलब्धतादेखील महत्त्वाची असून शासकीय, खासगी आणि स्वयंसेवी यंत्रणांद्वारे त्यासाठी कार्यरत आहेत. त्यासंदर्भातील महत्त्वाच्या कार्यक्रमाची नेमकी माहिती मिळविणे त्यासाठी आवश्यक ठरते. ई-प्रशासन, राष्ट्रीय ई-प्रशासन योजना, ज्ञानवाहिनी, समुदाय माहिती केंद्र यांसारख्या घटकांच्या तयारीवर अधिक भर द्यावा लागतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात संशोधन होत असून सद्य:स्थितीत विकसित होणाऱ्या महत्त्वाच्या माहिती तंत्रज्ञानविषयक घडामोडींचे आकलन त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते. इंटरनेटचा वापर अलीकडील कालावधीत मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ई-रिटेल, ई-कॉमर्स, सोशल नेटवìकग साईट, सर्च इंजिन्स, ब्रॉड बँड, दूरसंचारविषयक महत्त्वाच्या प्रणाली या बाबींचे तंत्रज्ञानविषयक आकलन महत्त्वाचे ठरते.
संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या संदर्भातील केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदींची तयारी केल्यास फायदेशीर ठरेल. माहिती तंत्रज्ञान उद्योग भारताच्या उद्योग क्षेत्रातील महत्त्वाचा उद्योग असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाने महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे.
सॉफ्टवेअर सेवांची निर्यात, व्यावसायिक प्रक्रिया हस्तांतर, ज्ञानप्रक्रिया हस्तांतर, कायदेशीर प्रक्रियेचे हस्तांतर यांसारख्या बाबींच्या तयारीवर भर देणे उपयुक्त ठरते. माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे, संगणकीय क्षेत्रात झालेल्या प्रगतीचे महत्त्वाचे टप्पे, भारतामध्ये संगणक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती या सर्व माहितीचे संकलन फायदेशीर ठरते.
विज्ञान तंत्रज्ञान विकास घटकाची तयारी अधिक नेमकेपणाने आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात करणे आवश्यक असून त्यासाठी अचूक आणि अद्ययावत संदर्भ महत्त्वाचा ठरतो.

No comments: