Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा मराठी , अनिवार्य : पत्र, वृत्तान्त, गटचर्चा व संवादलेखनाची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा मराठी , अनिवार्य : पत्र, वृत्तान्त, गटचर्चा व संवादलेखनाची तयारी


मंगेश खराटे - शनिवार, ३१ मार्च २०१२
द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

mangeshkharate@gmail.com
altविद्यार्थी मित्रहो, आज आपण व्यावहारिक मराठीतील पत्र, अहवाल, वृत्तान्त, गटचर्चा व संवादलेखन या घटकांची चर्चा करणार आहोत. वस्तुत: हे सर्वच घटक आपल्या परिचयाचे असतात. मात्र त्याकडे पुरेशा जिज्ञासू वृत्तीने न पाहिल्यामुळे त्याविषयी लेखन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रलेखन ही मराठीच्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाची बाब होय. त्याची योग्य तयारी करण्यासाठी पत्रलेखनाचे विविध प्रकार, पत्रलेखनाचे स्वरूप, त्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती आणि त्याचे उपयोजन या घटकांचे ज्ञान महत्त्वाचे ठरते.
संदर्भित पुस्तकातून पत्रलेखनाविषयीच्या तांत्रिक बाबी लक्षात घ्याव्यात. म्हणजे पत्राचा प्रकार, संबोधन, विषयाचे कथन, अवलंबावयाची भाषा (औपचारिक अथवा अनौपचारिक) आणि शेवट या पत्रलेखनातील तांत्रिक बाबींची माहिती करून घ्यावी. अर्थात, संदर्भ पुस्तकाचा वापर पत्रलेखनाचे प्रारूप लक्षात घेण्यापुरता मर्यादित असावा. पत्रलेखनाचा नमुना लक्षात आल्यानंतर आपल्या विविधांगी वाचनाच्या आधारे स्वत:च निरनिराळय़ा प्रकारचे पत्रलेखन हाती घ्यावे. प्रभावी पत्रलेखनासाठी कसदार वाचनाबरोबरच परिसराविषयीचे सामान्यज्ञानदेखील महत्त्वाचे ठरते. मागणीपत्राचा उदाहरणादाखल विचार करता येईल. मागणीपत्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी, पोलीस चौकीची मागणी, वीजबिल भरणा केंद्राची मागणी असे स्वरूप असते. तो परिसर, ती गरज याचा विचार करून माहिती लिहावी. उदा., मुंबई वा पुणे शहरातील लोक प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करणार नाहीत. कारण तिथे सार्वजनिक इस्पितळे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागातच असते. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असते.
alt अहवाल लेखन- अहवाललेखन म्हणजे घडलेल्या प्रसंगाचे, घटनेचे अथवा कार्यक्रमाचे कथन असते. केवळ वृत्तान्त वाचून कार्यक्रमाच्या भव्यतेचा, प्रसंग दु:खद असल्यास त्यातील कारुण्य, कार्यक्रम अयशस्वी झाला असल्यास त्यातील फसगत याचा वाचकाला अंदाज यावा. त्यासाठी निरीक्षण व कल्पनाशक्तीची आवश्यकता असते. त्याचबरोबर घडलेला वृत्तान्त जिवंत वाटावा यासाठी लेखनाची प्रभावी शैली अवगत असणे उपयुक्त ठरते. नेमक्या शब्दांत घडलेला वृत्तान्त साररूपाने कथन करून त्यात सर्व बाबींचा समावेश करणे महत्त्वाचे ठरते.
 संवादलेखन - संवादलेखनात कल्पनाशक्तीच्या आधारे विविध पात्रांची निर्मिती करून आणि त्यांच्या भूमिकेत शिरून लेखन करायचे असते. उदा., ‘देऊळ’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांची मुलाखत संवादरूपाने लिहा. हा प्रश्न सोडवायचा झाल्यास उमेश कुलकर्णी यांच्याविषयी माहिती असणे गरजेचे ठरते. त्यांनी यापूर्वी केलेले सिनेमे, कलाकारांची निवड, पुरस्कारप्राप्तीनंतरची त्यांची भावना याबद्दल कल्पनाशक्तीच्या आधारे लेखन करायचे असते. थोडक्यात, सिनेमाचा दिग्दर्शक जहाजाच्या कप्तानासारखा असतो. त्याचबरोबर मुलाखत घेणारी व्यक्ती पुरस्कारप्राप्त दिग्दर्शकाला नेमके कोणते प्रश्न विचारेल याचेही भान असावे लागते. शेवटी दोन व्यक्तींमधील संवाद प्रभावीपणे रेखाटण्यासाठी लेखनशैली महत्त्वाची ठरते.
 निमंत्रणपत्रिका/कार्यक्रमपत्रिको- कार्यक्रमपत्रिका तयार करण्यासाठी कार्यक्रमाचे स्वरूप, त्यामागील हेतू या मूलभूत माहितीबरोबरच कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि दिनांक या बाबीदेखील महत्त्वाच्या ठरतात. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहणे अथवा वक्ते आणि निमंत्रक अथवा आयोजक ही माहितीदेखील अत्यावश्यक ठरते. त्याआधारेच निमंत्रणपत्रिका तयार करता येते. प्रस्तुत माहिती थोडक्यात आणि नेमक्या शब्दांत सादर करण्याची शैलीच यासाठी उपयुक्त ठरते.
 अभिनंदनपर पत्र - ज्या व्यक्तीचे अभिनंदन करावयाचे आहे त्याच्या अभिनंदनाचे कारण कळावे. संबंधित व्यक्तीच्या कार्याचा अल्पपरिचय आणि ज्यासाठी तिला पुरस्कार अथवा सन्मान प्राप्त झालेला आहे त्याचे नेमक्या भाषेत केलेले लेखन मध्यवर्ती ठरते. अशा पत्रात संबंधित व्यक्तीचे अभिनंदन करताना अलंकारिक भाषेचा वापर आवश्यक ठरतो. उदा., क्रांतिसुक्त हातावर गोंदूनच आपण उत्थानाच्या दिशेने निघालात.. या प्रवासात आपण प्रचंड संघर्ष साहिलात.. त्या संघर्षांची गोड फळे म्हणून आपल्याला जे यश प्राप्त झाले आहे.. वगैरे इत्यादी. जर तुमच्या शब्दांत सामथ्र्य, वेगळेपण दिसले तर त्यात नक्कीच अधिक गुण मिळतील.
 संवाद - शेती की नोकरी? माणूस परिस्थितीचा गुलाम की स्वामी? नियती श्रेष्ठ की कर्तृत्व? अशा विषयांवर दोन अथवा अधिक व्यक्तीत घडणाऱ्या संवादाचे लेखन अपेक्षित असते. संवाद दोन वा अधिक व्यक्तीमध्ये होतो. या प्रश्नात पुन्हा पात्राच्या भूमिकेत शिरायचे असते. उदा., पूर्वापार म्हण होती उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी. सध्या म्हण आहे उत्तम नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती. या संदर्भात शेती की नोकरी असा संवाद रेखाटण्यासाठी तुम्हाला नोकरीचे, शेतीचे फायदे व तोटे, नोकरी व शेती व्यवसायात झालेले स्थित्यंतर आणि सद्य:स्थिती आणि संबंधित व्यक्तीचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अवगत असणे गरजेचे असते.
 गट चर्चा/संवाद - दोनपेक्षा अधिक व्यक्तीचा मिळून गट निर्माण होतो. एखाद्या विषयासंबंधी विविध स्वरूपाचे मते मांडणाऱ्या व्यक्तींचा संवादलेखन स्वरूपात मांडायचा असतो. अर्थातच यासाठी प्रश्नपत्रिकेत दिलेल्या विषयाच्या अनेक बाजू माहिती असणे गरजेचे ठरते. एखादी व्यक्ती आपल्या मताच्या समर्थनार्थ कोणता युक्तिवाद करेल याचीही जाण असणे महत्त्वाचे ठरते. या प्रश्नात सद्य:स्थितीत महत्त्वाचे असणाऱ्या अनेक विषयांची चर्चा करता येईल. अशा रीतीने विविध स्वरूपाचे वाचन, आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण, त्याविषयी विचार, चिंतन व मनन आणि लेखनाचा सराव या
आधारेच व्यावहारिक मराठीतील विविध घटकांवर प्रभुत्व मिळविता येईल.

No comments: