Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मानव साधन संपत्तीचा विकास : अभ्यासाची तयारी - ५

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मानव साधन संपत्तीचा विकास : अभ्यासाची तयारी - ५

कैलास भालेकर
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com
alt‘आरोग्य’ हा मानव साधनसंपत्तीच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक असून, ‘सर्वागीण आरोग्य’ मानव साधनसंपत्तीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते. मानव विकास अहवालाद्वारे मानव विकास निर्देशांक मापन करताना आरोग्यविषयक समावेश करण्यात येतो. आरोग्य विकासासंदर्भात पंचवार्षिक योजनांमध्ये अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, दहाव्या आणि अकराव्या पंचवार्षिक उद्दिष्टांमध्ये आरोग्यविषयक मानकांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरण-२००२नुसार संपूर्ण लोकसंख्येला विकेंद्रित सार्वजनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्याचे निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी आरोग्यविषयक पायाभूत संरचना उभारणी करण्यात येत आहे आणि सध्याच्या आरोग्यविषयक पायाभूत संरचनांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. शासनाद्वारे विविध स्तरांवरून आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न होत असले तरी अजूनही आरोग्यविषयक पायाभूत संरचना लोकसंख्येचा विचार करता अपुरी आहे. आरोग्यविषयक सुविधांच्या उपलब्धतेमध्ये ग्रामीण-शहरी असा असमतोल अधिक प्रमाणात असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांची उपलब्धता आणि गुणवत्ता तुलनेने असमाधानकारक असल्याचे दिसून येते. दुर्गम भागातील आरोग्यविषयक प्रश्न अधिक तीव्र असल्याचे दिसून येते.
भारतातील आरोग्यसुविधा सुधारण्यासाठी शासनाकडून अनेक आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत असून २००५ मध्ये सुरू करण्यात आलेला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम (NEHM) हा कार्यक्रम त्यादृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. ह्या कार्यक्रमाची व्याप्ती मोठी असून त्यातील महत्त्वाच्या उद्दिष्टांची नेमकी माहिती मिळविणे ह्या घटकातील अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग ठरेल. मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य स्वयंसेवक (ASHA), आयुष (AYUSH) यांसारख्या यंत्रणांची नेमकी माहिती या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. जननी सुरक्षा योजना आणि जननी बाल सुरक्षा कार्यक्रमांचे आकलन आवश्यक असून, त्या कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण सुविधा आणि उद्दिष्टे यावर अधिक भर देणे उपयुक्त ठरेल. माता-बाल आरोग्यासंदर्भातील १ जून २०११ रोजी सुरू करण्यात आलेल्या जननी बाल सुरक्षा कार्यक्रमाचे यश आणि त्यामधील महत्त्वपूर्ण बदलांचा वेध घेणे आवश्यक ठरते. भारत वार्षिकी आणि भारताच्या आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ घेतल्यास अचूक, नेमकी आणि अधिकृत सांख्यिकी आकडेवारीसह तयारी करणे शक्य होईल.
राष्ट्रीय कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमातील महत्त्वाच्या टप्प्याचा अभ्यास आवश्यक असून मलेरिया, फायलेरिया, काला आजार, डेंग्यू, जपानीज इनसिफॅलिटीस, चिकुनगुन्या यांसारख्या आजारांच्या नियंत्रणासाठी शासनाने आखलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप, उद्दिष्टे आणि सद्य:स्थिती यासंदर्भातील नेमकी माहिती मिळविणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांसारख्या शासनस्तरावरून राबविण्यात येत असणाऱ्या आरोग्यविषयक कार्यक्रमांतील महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास फायदेशीर ठरतो.
भारताच्या आरोग्यविषयक सद्य:स्थितीसंदर्भातील शासकीय स्तरावरून आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत अनेक सर्वेक्षणे आणि अहवाल प्रसिद्ध होत असतात. त्या अहवालांद्वारे भारतातील आरोग्यविषयक समस्या आणि आरोग्यविषयक कार्यक्रमातील यश आणि त्रुटी यांची माहिती मिळविता येते. यासाठी वृत्तपत्रांचे आणि मासिकांचे वाचन लाभदायक ठरते. महाराष्ट्राच्या संदर्भासह या सर्व बाबींची तयारी करणे आवश्यक असून, राष्ट्रीय स्तरावरील आणि राज्य स्तरावरील आरोग्यविषयक आकडेवारीचे तुलनात्मक आकलन आवश्यक ठरते. आकडेवारी लक्षात राहण्यासाठी आकडेवारीची सुटसुटीत मांडणी असणाऱ्या नोट्स लाभदायक ठरतील.
सर्वागीण आरोग्यासाठी आरोग्यसुविधांबरोबरच स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आवश्यक ठरते. भारतातील अनेक आरोग्यविषयक समस्या अस्वच्छतेशी आणि दूषित पाण्याशी निगडित आहेत. शासनाद्वारे यासंदर्भात अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले असून, अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हे महत्त्वाचे उद्दिष्ट समाविष्ट केले आहे. 
‘सुपोषण’ हा भारताच्या आरोग्यविषयक कार्यक्रमातील महत्त्वाचा भाग आहे. १९७५मध्ये सुरू करण्यात आलेल्या एकात्मिक बालविकास कार्यक्रम त्यादृष्टीने खूपच महत्त्वाचा असून सहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील बालकांच्या सुपोषण आणि आरोग्यविषयक विकासासाठी हा कार्यक्रम अत्यंत प्रभावी ठरला आहे. या कार्यक्रमाची उद्दिष्टे, मानके आणि अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा यावर भर देण्याची गरज आहे. अंगणवाडी केंद्रे आणि शासनाद्वारे त्यासंदर्भातील सद्य:स्थितीतील तरतुदी याची माहितीदेखील मिळविणे उपयुक्त ठरते. तसेच मध्यान्ह भोजन कार्यक्रमाचे स्वरूप आणि उद्दिष्टे यांची माहिती या घटकाच्या तयारीसाठी लाभदायक ठरेल.
जागतिक आरोग्य संघटना (WHO), या संघटनेची उद्दिष्टे, रचना, कार्ये आणि कार्यक्रम यांचा अभ्यास या घटकांतर्गत करण्यात आला असून, या सर्व बाबींची नेमकी तयारी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची वेबसाईट खूपच फायदेशीर ठरेल. वेबसाईटवरील महत्त्वाची माहिती संकलित करताना परीक्षेच्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे. विविध आरोग्यविषयक निर्देशांकासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे मानके निश्चित केली आहेत. या आरोग्यविषयक मानकांचा प्रभाव भारतातील आरोग्यविषयक धोरणांवर आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या मूल्यमापनावर पडतो. जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेली मानके आणि भारतातील आरोग्यविषयक प्रगती यांचे तुलनात्मक आकलन उपयुक्त ठरेल. त्यासाठी अद्ययावत आकडेवारीचा संदर्भ घेणे फायदेशीर ठरते. त्यासाठी भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटचा संदर्भ घेता येईल.
जागतिक स्तरावर पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांसंदर्भात जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाची जबाबदारी पार पाडते. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे त्यासंदर्भात समन्वय राखण्याचे महत्त्वाचे कार्य केले जाते. या सर्व बाबींची अद्ययावत संदर्भासह नेमकी तयारी करणे महत्त्वाचे ठरते. आरोग्यविषयक सर्व कार्यक्रमांच्या माहितीची सुटसुटीत तक्त्यांमध्ये मांडणी केल्यास अधिक परिणामकारकरीत्या हा घटक अभ्यासणे शक्य होईल. तसेच, महत्त्वाच्या आरोग्यविषयक संकल्पनांचे आकलनदेखील नेमक्या तयारीसाठी लाभदायक ठरते.

No comments: