Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : सराव चाचण्यांचे अर्थात प्रश्नपत्रिका सरावाचे महत्त्व

‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : सराव चाचण्यांचे अर्थात प्रश्नपत्रिका सरावाचे महत्त्व

तुकाराम जाधव ,शुक्रवार २३ मार्च २०१२ :
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

malharpatil@gmail.com
राज्यसेवा पूर्वपरीक्षेत यश मिळवण्यासाठी घटकनिहाय वाचन व उजळणीबरोबरच प्रश्नांचा सरावदेखील तितकाच महत्त्वाचा  ठरतो. किंबहुना केलेल्या अभ्यासावरील सराव चाचण्यांची किती प्रमाणात व कशा प्रकारे उकल करतो यावरच विद्यार्थ्यांचे पूर्वपरीक्षेतील यश अवलंबून असते. सराव चाचण्यांचे पुढील महत्त्वपूर्ण फायदे लक्षात घेता येतात. एक म्हणजे सराव चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांला स्वत:चे वाचन व आकलन अर्थात अभ्यास पुरेसा आहे अथवा नाही हे ठरवता येते. दुसरी बाब म्हणजे प्रश्नांचे व त्या खालील पर्यायांचे वाचन करताना होणाऱ्या नाहक चुकादेखील लक्षात घेता येतात. संपूर्ण पेपर निर्धारित वेळेत सोडविण्यासाठी आवश्यक वेळेचे नियोजन सरावाद्वारेच विकसित करता येते आणि महत्त्वाचे म्हणजे पूर्वपरीक्षेसाठी आवश्यक लॉजिकची निर्मिती सरावाद्वारेच करता येते. याचा अर्थ एखाद्या प्रश्नाचे नेमके, अचूक उत्तर माहीत नसले तरी पर्यायातील चुकीची उत्तरे कोणती हे ओळखून उर्वरित पर्याय बरोबर आहे हे ठरवता येते. थोडक्यात विद्यार्थ्यांला सराव चाचण्यांच्या आधारे स्वत:चे विश्लेषण करता येते, स्वत:चे कच्चे दुवे ओळखून त्यावर वेळीच मात करता येऊ शकते. 
प्रश्नपत्रिकांचा नेमका सराव कसा करायचा? हा विद्यार्थ्यांपुढे निर्माण होणारा मोठा प्रश्न आहे. यासाठी पुढील तीन सराव पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. (१) प्रत्येक आठवडय़ात एखाद्या घटकातील अभ्यासलेल्या प्रकरणावरील प्रश्न सोडविणे. (२) संपूर्ण घटकावरील सराव चाचण्यांची उकल करणे. म्हणजे संपूर्ण घटक अभ्यासून झाल्यावर त्या घटकातील सर्व प्रकरणांवर आधारित प्रश्नपत्रिकांची उकल करणे आणि (३) पूर्वपरीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एकत्रित, सर्वसमावेशक, (आयोगाच्या धर्तीवरील) प्रश्नपत्रिका सोडविणे. यापैकी पहिल्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांला केलेल्या अभ्यासाचे व्यवस्थित आकलन झाले आहे अथवा नाही हे दर आठवडय़ाला लक्षात घेता येते. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्या प्रकरणाचा पुन्हा व्यवस्थित अभ्यास करता येईल. दुसऱ्या पद्धतीचा विचार करता अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा सराव केल्यामुळे त्या संबंधित घटकाचे व्यवस्थित आकलन झाले आहे का? हे समजते. घटकनिहाय चाचण्यांचा सराव केल्यामुळे प्रत्येक घटकावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करणेदेखील सुलभ बनते. तसेच प्रत्येक घटकाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप वेगवेगळे असल्याने त्यावरील प्रश्न सोडविताना कोणत्या पद्धतीचा वापर करायचा याचा विद्यार्थ्यांला अंदाज घेता येतो. तिसरी सराव पद्धतीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. यामध्ये दोन तासांतील वेळेचे नियोजन, अवघड-सोपे घटक, न येणाऱ्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे, बुद्धिमापन चाचणीला किती वेळ दिला पाहिजे, बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न सुरुवातीला घ्यायचे अथवा नंतर घ्यायचे, या बाबींचे नियोजन करता येते.
अर्थात तिन्ही पद्धतींचा सराव करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांने स्वत:ची सरावपद्धती विकसित करावी. सराव चाचण्या सोडवताना वेळेचे नियोजन मध्यवर्ती ठरते. म्हणूनच दोन तासांचा वेळ निर्धारित करूनच सराव प्रश्नपत्रिकांची उकल करावी. त्यातून कोणत्या घटकाला किती वेळ लागतो याची तर कल्पना येतेच, त्याचबरोबर वेळेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने कोणत्या बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे हे विद्यार्थ्यांला समजू शकते. कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा लागतो. किंवा घाईत सोडविल्यामुळे चूक होण्याची शक्यता कोणत्या प्रश्नाच्या बाबतीत आहे? याची देखील उमेदवाराला माहिती मिळू शकते. बुद्धिमत्ता चाचणी या घटकातील काही प्रश्न अवघड असतात. त्यामुळे ते सोडून सोपे प्रश्न अगोदर सोडविता येतात व नंतर उरलेल्या वेळात अशा अवघड प्रश्नांची उत्तरे सोडवता येतात. अशा प्रकारचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये केवळ सरावानेच विकसित होऊ शकते. त्यामुळे पूर्वपरीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिकांचा सराव फायद्याचा ठरतो. 
राज्यसेवा पूर्व परीक्षेत २०० प्रश्नांना फक्त १२० मिनिटे वेळ असतो. यापैकी आपण बुद्घिमापन चाचणीच्या ५० प्रश्नांना किमान ५० मिनिटे दिली पाहिजेत. उरलेल्या १५० प्रश्नांसाठी केवळ ७० मिनिटेच वेळ शिल्लक राहतो. या उर्वरित ७० मिनिटाचे नियोजन करताना संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर काही वेळ (किमान ५ मि.) शिल्लक राहील याची काळजी घ्यावी. कारण या शिल्लक वेळेत राखीव ठेवलेले अनुत्तरित प्रश्न सोडवता येऊ शकतील. याचाच अर्थ विद्यार्थ्यांने वेळेचे नियोजन करताना बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न वगळता प्रत्येकी २२-२३ मिनिटांत ५० प्रश्न सोडविणे गरजेचे ठरते. म्हणजे विद्यार्थ्यांनी १० वाजता पेपर सुरू झाल्यावर १०.२० मि. आपण कितवा प्रश्न सोडवीत आहोत? १०.४०ला आणि ११ वाजता कितव्या प्रश्नावर आहोत याचे भान ठेवले पाहिजे. काही विद्यार्थी तर सामान्य क्षमता चाचणीतील पहिले १५० प्रश्न सोडवायला दीड तास घेतात आणि हक्काचे गुण मिळवून देणाऱ्या बुद्धिमापन चाचणीला केवळ ३० मिनिटेच वेळ देतात. त्यामुळे शेवटी विद्यार्थ्यांचे १५-२० प्रश्न सोडवायचेच शिल्लक राहतात. परिणामी अपयशाशिवाय दुसरे काहीही हाती लागणार नाही याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे.
सराव चाचण्या सोडवताना प्रथम येणारे प्रश्न सोडविणे, त्यानंतर उत्तराबद्दल द्विधा असलेले प्रश्न सोडविणे आणि शेवटी बुद्धिमापन चाचणीतील वेळखाऊ प्रश्नांना सामोरे जाणे, अशा स्वरूपाची सरावपद्धती अवलंबावी, अर्थात प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव करूनच अशी पद्धती विकसित करता येईल. त्यामुळे परीक्षेपूर्वी किमान १०-१५ सराव चाचण्या वेळ लावून सोडविलेल्या असल्या पाहिजेत. मगच विद्यार्थ्यांला पूर्वपरीक्षेत पास होण्याची खात्री बाळगता येईल. सराव चाचण्यांमधून एका बाजूला आकलन, वेळेच्या नियोजनातील चुका आणि शक्यतांचा सिद्धान्त  (Law of Probability) या बाबी विकसित करता येतात, तर दुसऱ्या बाजूला परीक्षेला आवश्यक मनोधैर्य व आत्मविश्वास वृिद्धगत करता येतो.

No comments: