Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मुलाखतीची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मुलाखतीची तयारी

तुकाराम जाधव, गुरुवार, ७ जून २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०११ सालापर्यंत मुलाखतीसाठी २०० गुण  निर्धारित केले होते. तथापि २०१२ सालापासून मुलाखतीसाठी १०० गुण निश्चित केले आहेत. परंतु यामुळे मुलाखतीच्या स्वरूपामध्ये वा तयारीमध्ये फारसा फरक पडत नाही. गुणांमध्ये तफावत असली, तरी विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या तयारीमध्ये आवश्यक असणाऱ्या एकाग्रतेपासून आणि समग्र दृष्टिकोनापासून विचलित होता कामा नये. 
मुलाखतकर्त्यांत साधारणत: एम.पी.एस.सी.चे सदस्य व इतर खात्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तज्ज्ञ म्हणून समावेश असतो. यांपैकी एम.पी.एस.सी.चे सदस्य हे पॅनेलचे अध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडतात. इतर सदस्यांत महसूल, पोलीस खात्यांतील तसेच मंत्रालय वा विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. या सर्वाना प्रशासकीय अधिकारी म्हणून दीर्घकाळच्या सेवेद्वारे विविध विषयांतील माहिती व ज्ञान प्राप्त झालेले असते. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या पदांवर काम केल्याने त्यांना राज्याच्या भौगोलिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक बाबींची निश्चित माहिती प्राप्त झालेली असते.
मुलाखतीदरम्यान उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू जाणून घेतले जातात. पूर्वी नमूद केलेली उमेदवाराच्या गुणांची चाचणी तर घेतली जातेच पण त्याबरोबरच त्याच्या सर्वसामान्य ज्ञानाचा कल, चाकोरीबाहेरील जीवनाबाबतची आस्था, चालू घडामोडींबाबतची जिज्ञासा, शासकीय सेवेत येण्यापाठीमागचे कारण व संबंधित खात्याबाबतची त्याची माहिती या सर्व बाबींतून उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व पडताळून पाहिले जाते. त्यामुळे मुलाखतीची तयारी करताना नेमकेपणा व योग्य दिशा यांवर अधिक भर द्यावा.
प्रस्तुत टप्प्याची तयारी करण्यासाठी पुढील घटक लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. 
(१) बायोडाटा - मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवाराला आपली संपूर्ण व्यक्तिगत माहिती नमूद करावी लागते. हा ‘बायोडाटा’च पायाभूत मानून त्यातील प्रत्येक घटकाची तयारी करावी. यात उमेदवाराचे स्वत:चे नाव, आई-वडिलांचे नाव आणि आडनावासंबंधी माहिती संकलित करावी. आपल्या नावाचा विशिष्ट अर्थ असल्यास तो लक्षात घ्यावा. तसेच आपल्या नावाची एखादी व्यक्ती इतर क्षेत्रात सुप्रसिद्ध असल्यास तिच्याविषयी थोडक्यात माहिती संकलित करावी.  

(२) वास्तव्य - विद्यार्थ्यांनी मूळ ठिकाण, सध्याचे ठिकाण, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य असे वर्गीकरण करावे. यातील प्रत्येक घटकाचा थोडक्यात इतिहास, भूगोल, समाजव्यवस्था, राजकारण, अर्थकारण, इतर काही महत्त्वाची वैशिष्टय़े यासंबंधी तयारी करणे अत्यावश्यक ठरते.
(३) शैक्षणिक पाश्र्वभूमी - उमेदवाराची शैक्षणिक पाश्र्वभूमी हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यात अगदी शालेय शिक्षणापासून, माध्यमिक, उच्चमाध्यमिक , महाविद्यालयीन आणि पदवी-पदव्युत्तर शिक्षणापर्यंतची माहिती निर्णायक ठरते. विशेषत: पदवी शिक्षण आणि त्यातील विशेषत्व ही बाब महत्त्वाची मानावी. ज्या शाखेत आणि विषयात पदवी संपादन केली आहे त्यातील पायाभूत संकल्पना, विचार आणि उपयोजनात्मक भाग यावर लक्ष केंद्रित करावे. शिक्षण संस्थांची नावे आणि ठिकाणे यासंबंधी देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन त्यासंबंधीही माहिती प्राप्त करावी.
(४) अभ्यासबाह्य बाबीतील रस - उमेदवाराच्या व्यक्तिगत माहितीतील ‘अभ्यासबाह्य बाबीतील रस’ हा घटकही महत्त्वपूर्ण ठरतो. यात विद्यार्थ्यांचा छंद, क्रीडा प्रकारातील रस, विविध स्पर्धात प्राप्त केलेली पारितोषिके, बक्षिसे अशा अभ्यासबाह्य घटकांचा समावेश होतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने या घटकाची प्रभावी तयारी करणे मध्यवर्ती ठरते. अशारीतीने उपरोक्त विविध घटकांची सविस्तर माहिती संकलित करून त्यावर आधारित अधिकाधिक ‘मॉक इंटरव्ह्यूव’चा सराव केल्यास अधिक गुण मिळवता येतील.
(५) चालू घडामोडींविषयी माहिती - आपल्या भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडींविषयीही अनेक प्रश्न विचारले जातात. राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळी आणि सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा अशी विभागणी करून त्यासंबंधी महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर तयारी करावी. चर्चेतील मुद्दय़ांचे स्वरूप, कारणे, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, संभाव्य उपाय इ. आयामांसंबंधी तयारी करावी. संबंधित मुद्दय़ांविषयी जी प्रचलित मतमतांतरे आहेत त्याची माहिती उमेदवाराकडे असणे गरजेचे आहे. या महत्त्वाच्या, कळीच्या मुद्दय़ांविषयी स्वत:चे मत असणे महत्त्वाचे ठरते.
(६) पदांचा पसंतिक्रम - पदांच्या पसंतिक्रमाबाबत योग्य स्पष्टीकरण देता यावे. आपले व्यक्तिमत्त्व व आजूबाजूची परिस्थिती यांची आपल्या पसंतिक्रमाशी सांगड घालता आली पाहिजे. अर्थात या वेळीसुद्धा यशस्वी उमेदवारांनी दिलेल्या उत्तरांची पुनरावृत्ती करण्याचा मोह टाळावा. ‘आपले पूर्वायुष्य व आलेले अनुभव यातून प्रशासकीय अधिकारी बनण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली’, नेमक्या या कारणांचा समावेश आपल्या उत्तरात असावा. दिलेल्या पसंतिक्रमांतील पदांची नेमकी माहिती, त्यांचे अधिकार, कर्तव्य, प्रशासनातील त्या पदाची नेमकी भूमिका याबाबत आपणास प्रश्नांना सामोरे जावे लागते. या पदांशी संबंधित सामाजिक व प्रचलित घडामोडींचे ज्ञान अपेक्षित असते.
तेव्हा स्वत:च्या क्षमतांची तपासणी करण्यास सुरु वात करा व ज्या कमतरता आहेत, त्या दूर करून आत्मविश्वासाने यशाचे शिखर पादाक्रांत करण्यास सुरु वात करा. शिखर तुमची वाट पाहत आहे!

No comments: