Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा - राजमार्ग - मुख्य परीक्षा : ब्रिटिश सत्तेची स्थापना व प्रबोधनाचा अभ्यास

‘एमपीएससी’चा - राजमार्ग - मुख्य परीक्षा : ब्रिटिश सत्तेची स्थापना व प्रबोधनाचा अभ्यास

शरद पाटील - बुधवार, ११ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

sharadpatil11@gmail.com 
altराज्यसेवा मुख्य परीक्षेतील इतिहास या विषयाची प्रभावीपणे तयारी करता यावी यासाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे सुसंगत असे वर्गीकरण करणे अत्यावश्यक ठरते. म्हणूनच आपण येणाऱ्या लेखांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम तीन ते चार भागांत विभागून त्याची सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. आज आपण इतिहासाच्या अभ्यासक्रमातील आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात १८१८ ते १८५७); भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना, परिणामस्वरूप घडून आलेले सामाजिक-सांस्कृतिक बदल आणि सामाजिक-आर्थिक प्रबोधन या पहिल्या चार घटकांची तयारी कशी करायची याची चर्चा करणार आहोत.
आधुनिक भारताचा इतिहास या पहिल्या घटकात आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे, रेल्वे, पोस्ट, तारयंत्र, उद्योग, जमीन सुधारणा, सामाजिक-धार्मिक सुधारणा आणि या घडामोडींचा समाजावर झालेला परिणाम या बाबी समाविष्ट केल्या आहेत. अर्थात, ब्रिटिशांची थेट सत्ता प्रस्थापित होण्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात विकास पावलेल्या शासकीय-प्रशासकीय-आर्थिक यंत्रणेमुळे निर्माण झालेला बदल अभ्यासणे अपेक्षित आहे. त्या त्या क्षेत्रात कोणते बदल, सुधारणा आणि उपाययोजना हाती घेण्यात आल्या, त्यांचा प्रवर्तक कोण, त्या सुधारणांची गुणवैशिष्टय़े कोणती आणि त्यांचा समाजावर झालेला प्रभाव, अशा रीतीने या प्रकरणात समाविष्ट घटकांचा सर्वागीण अभ्यास करता येईल. 
भारतातील ब्रिटिश सत्तेची स्थापना या दुसऱ्या घटकात १८५७ पर्यंतचे ब्रिटिश सत्तेचे स्वरूप आणि भारतात निर्णायकपणे आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी ब्रिटिशांनी स्वीकारलेल्या धोरणांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. यात युरोपियन सत्तांचे भारतातील आगमन ते १८५७ पर्यंतचा कालखंड यावर जोर देणे महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करत असताना फ्रेंच, डच, पोर्तुगीज या बा'ा सत्तांबरोबरच मराठे, हैदर, बंगाल व पंजाबचे शासक या स्थानिक सत्तांशीही संघर्ष करावा लागला. या युद्धांची कारणे, युद्धात सहभागी झालेल्या सत्ता व व्यक्ती, युद्धाची ठिकाणे, वर्ष, युद्धोत्तर तह, युद्धाचे परिणाम आणि विविध इतिहासकारांनी संबंधित युद्धाविषयी व्यक्त केलेली मते इ. बाबींचा अभ्यास करावा लागेल. ब्रिटिश प्रशासनाची माहिती संकलित करताना ईस्ट इंडिया कंपनीसाठी केलेले कायदे, भारतातील महसूल, सैन्य, पोलीस, न्यायप्रशासन यात विविध काळात झालेल्या सुधारणा लक्षात घ्याव्या लागतील. उदा., महसूल प्रशासनाचा विचार करता- कायमधारा, रयतवारी, महालवारी पद्धती कोणी? कधी? कोणत्या प्रदेशात सुरू केली? या पद्धतीत महसूल दर किती होता? या पद्धतीचे परिणाम कोणते, इ. बाबी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासाव्यात. त्याचबरोबर तैनाती फौज आणि संस्थानांच्या विलीनीकरणाचे धोरण याचा अभ्यास करत असताना वरील पद्धतीचा अवलंब करावा.
भारतात ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यानंतर आधुनिक शिक्षण, वृत्तपत्रे व दळणवळणाच्या नव्या साधनांचा प्रसार झाला. शासन पुरस्कृत सामाजिक सुधारणाही घडून आल्या. परिणामी, भारतीय समाजात सामाजिक व सांस्कृतिक बदल घडून आले. वर उल्लेख केल्याप्रमाणे अभ्यासक्रमात नमूद केलेला प्रत्येक उपघटक समोर ठेवून त्याच्या सर्व आयामांविषयी माहिती संकलित करावी. उदा., रेल्वेच्या विकासाचा विचार करत असताना भारतातील पहिली रेल्वे कधी धावली? महत्त्वाचे रेल्वेमार्ग कधी सुरू झाले? अशारीतीने रेल्वे विकासाचे विविध टप्पे, त्यासाठी शासनाने स्थापन केलेले विविध आयोग, राष्ट्रीय नेत्यांनी रेल्वेविकासाबाबत व्यक्त केलेली मते यांचा पद्धतशीर अभ्यास करावा. हीच पद्धत शिक्षण प्रसार, वृत्तपत्रे/छापखाना, उद्योग विकास या घटकांच्या तयारीलाही लागू करावे.
ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेनंतर भारतीय समाजात जो सामाजिक व सांस्कृतिक बदल घडून आला त्यात येथील सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळींचा महत्त्वाचा वाटा होता. त्यात ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज या संघटनात्मक प्रयत्नांचा समावेश होतो. त्याशिवाय शीख, मुस्लिम समुदायातील सुधारणा चळवळी, दलित उद्धारासाठी हाती घेण्यात आलेले वेगवेगळे प्रयत्न, ब्राह्मणेत्तर चळवळ आणि जस्टीस पार्टी इ.चा अभ्यास मध्यवर्ती ठरतो. या संघटना आणि चळवळींचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी सर्वसमावेशक माहितीचे संकलन करून कोष्टकाद्वारे ही माहिती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. सामाजिक-धार्मिक सुधारणांसाठी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचे संस्थापक, संस्था-स्थापना वर्ष, संस्थेचे तत्त्वज्ञान, त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सुरू केलेली नियतकालिके व वृत्तपत्रे, इतर प्रदेशांत स्थापन करण्यात आलेल्या शाखा, संस्थेशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती या घटकांकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे.   
अशारीतीने ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना झाल्यानंतर ‘प्रबोधन’ प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेत राज्यपुरस्कृत आणि एतद्देशीय पुढाकार, महत्त्वाच्या व्यक्ती, शिक्षण आणि प्रसारमाध्यमे या घटकांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याशिवाय १८५७च्या उठावानंतर विकसित झालेला राष्ट्रवाद, राष्ट्रीय काँग्रेस आणि आझाद िहद सेनेचे योगदान या घटकांचाही अभ्यास करायचा आहे. अर्थात, उपरोक्त सर्व घटकांची तयारी करताना अखिल भारतीय पातळीवर घडलेल्या घडामोडींबरोबरच महाराष्ट्राच्या पातळीवर घडलेल्या घटनांचा अभ्यास अत्यावश्यक आहे. त्यासाठी प्रारंभी एनसीईआरटीचे आधुनिक भारत हे पाठय़पुस्तक, ग्रोवर-ग्रोवर, बिपन चंद्रा आणि बेल्हेकर यांची आधुनिक भारतावरील पुस्तके या संदर्भाचा वापर करावा. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात घडलेल्या घटनांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्र वार्षिकीतील इतिहासावरील विभाग बारकाईने अभ्यासावा.

No comments: