Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :अनिवार्य इंग्रजी - पत्रलेखन

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :अनिवार्य इंग्रजी - पत्रलेखन

अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश ,शनिवार, ७ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

dixitaparna1@gmail.com
sushruth.ravish@gmail.com
पत्रलेखन या घटकामध्ये आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे दोन उपप्रकार आहेत. ते म्हणजे औपचारिक पत्रलेखन तसेच अनौपचारिक पत्रलेखन. दोन्ही प्रकारचे एक पत्र लिहिणे अपेक्षित आहे. प्रत्येकी १०० शब्द उमेदवाराने लिहिणे आवश्यक आहे. दोन्ही प्रकारच्या पत्रलेखनासाठी उमेदवाराच्या खालील क्षमता तपासल्या जातील. (अ) पत्राचा मजकूर- औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही प्रकाराच्या पत्रांकरिता काही ठराविक माहिती पुरवली जाते. उदा., Write a letter to your father asking for Rs. 2000/- for a class trip to Ajanta Ellora caves. (अनौपचारिक) किंवा उदा., Literature club in your college is organising yearly festival. Write a letter to principal asking permission for using audiorium and other college facilities required for the same. . (औपचारिक) जसे या उदाहरणामध्ये, सहल कुठे जाणार आहे, किती पशाची तुम्हाला गरज आहे किंवा कुठल्या प्रकारच्या कार्यक्रमाचे संयोजन करायचे आहे, कॉलेजकडून कोणत्या गोष्टी वापरायची परवानगी घ्यायची आहे अशा प्रकारची माहिती पुरवली जाते. पत्राचा मजकूर दिलेल्या माहितीशी संबंधित असावा. दिलेल्या विषयापासून लिखाण भरकटू न देणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. हे अनौपचारिक पत्रामध्ये लक्षात ठेवणे अधिक गरजेचे आहे. अनौपचारिक पत्राची सुरुवात नातेवाइकाची/मित्राची चौकशी करून करावी असा प्रघात आहे. परंतु अशी चौकशी आटोपती घेऊन, प्रवाही लेखनशैलीत दिलेल्या विषयाची मांडणी करण्याचा पुरेसा सराव विद्यार्थ्यांनी करावा. पत्राचा मजकूर लिहिताना तोचतोचपणा टाळावा. असे करण्याकरिता कोणते मुद्दे आपल्याला मांडायचे आहेत याची मनात (किंवा कच्चे टिपण काढून) उजळणी करावी.
(आ) सादरीकरण : पत्राच्या विषयानुसार लेखनामधील भाषेमध्ये बदल करावा. जसे की एखाद्या गोष्टीची मागणी करणारे, परवानगी मागणारे, दिलगिरी व्यक्त करणारे पत्र असल्यास पत्राची भाषा सौम्य असावी. याउलट नगरपालिकेविरुद्ध वृत्तपत्रामध्ये प्रसिद्धीसाठीचे पत्र किंवा माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत असणारी माहिती न मिळण्याबाबत लिहिलेले पत्र- यामध्ये भाषा कडक आणि स्पष्ट असावी. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, सौम्य भाषा म्हणजे अतिआर्जवी नव्हे तसेच कडक भाषा म्हणजे रागाने आक्षेपार्ह भाषा वापरणे नव्हे. सादरीकरण प्रभावी करण्यासाठी अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी. १०० शब्दांचा हा मजकूर साधारणपणे तीन परिच्छेदांमध्ये विभागून लिहावा. तसेच वाक्यरचना सुटसुटीत असावी. पत्रामध्ये आपण झालेल्या घटनांबद्दल लिहीत आहोत का होणाऱ्या घटनांबद्दल लिहीत आहोत हे लक्षात घेऊन योग्य काळाचा वापर करावा. पत्रलेखनाच्या सादरीकरणामधील हे एक महत्त्वाचे अंग आहे. पत्रलेखनामध्ये अनेकदा दोन आणि बऱ्याच वेळा तिन्ही काळांचा उपयोग करावा लागतो. उदा.,  I am preparing for final exams. . (वर्तमानकाळ). Will you please transfer Rs. 2000 on my account? (भूतकाळ). अशा सर्व काळांचा योग्य वापर करून, पत्रात एक प्रकारचा प्रवाही संवाद निर्माण करणे ही खरी कसोटी आहे.
(इ) पत्रलेखनाचा ठराविक साचा व त्याचा प्रभावी वापर : अनौपचारिक तसेच औपचारिक पत्रलेखनाचा स्वत:चा असा एक ठराविक साचा आहे. सर्व व्यवहारांमधील पत्रलेखन एकसारखे किंवा एका धाटणीचे असणे हे वाचणाऱ्यास वाचताना सुलभ वाटावे यासाठी अतिशय गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या ठराविक रचनांचा स्वत: बारकाईने अभ्यास करावा. अशा प्रकारे रचनाबद्ध पत्रलेखन, हे विद्यार्थ्यांला पत्रलेखनाच्या स्वरूपाचे पूर्ण आकलन झाले आहे, हे परीक्षकापर्यंत पोहोचवण्याचे प्रभावी साधन आहे. पत्रलेखनासाठी उपयुक्त अशा रचना आणि साचे साधारणत: व्याकरण अथवा निबंध-पत्रलेखनासाठीच्या पुस्तकात पाहावयास मिळतात. जसे की पत्र पाठवणाऱ्याचे नाव आणि पत्ता डावीकडील वरच्या कोपऱ्यात असावा. त्याच्याच खाली पत्र कोणाला संबोधून लिहिले आहे, त्याचे नाव आणि पत्ता याचा उल्लेख करावा. उजवीकडे वरच्या कोपऱ्यात तारीख लिहावी. अभिवादनपूर्वक संबोधनाने पत्राची सुरुवात करावी. उदा.,   Respected Sir/Madam, Dear Mother, Dear Ramesh   इ. यानंतर औपचारिक पत्रामध्ये एका ओळीत विषय (Subject) मांडावा. यानंतर मूळ मजकूर साधारणत: तीन-चार परिच्छेदात विभागून लिहावा. औपचारिक पत्राचा शेवट करताना ज्याला संबोधून पत्र लिहिले आहे त्याचे एका वाक्यात आभार मानावेत. उदा., Please oblige us by granting permission for using loudspeakers for social gathering of our residential society. ÎIYUF I take this opportunity to thank you for considering my candidature as students representative for above mentioned post.. इत्यादी अनौपचारिक पत्राचा शेवट विषयास आणि व्यक्तीस लक्षात घेऊन करावा. सर्वात शेवटी उजव्या कोपऱ्यात योग्य संबोधनासहित पत्र लिहिणाऱ्याचा उल्लेख करावा.
अनौपचारिक पत्रलेखन जरी आजकालच्या तरुण पिढीच्या सामाजिक वर्तुळामधून हद्दपार झाले असले तरी पूर्णत: कालबाह्य नाही. विशेषत: निमशहरी किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची पूर्ण कल्पना आहे. भ्रमणध्वनीच्या तंत्रज्ञानातील इतक्या प्रगतीनंतरही अजूनसुद्धा अनौपचारिक स्वरूपाचे पत्रलेखन कायम आहे. तसेच औपचारिक व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात पत्रलेखन हे संवाद प्रस्थापित करण्याचे मुख्य आणि पहिले माध्यम आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संवाद माध्यमाची पूर्णपणे ओळख असणे आणि त्याचा सराव असणे मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक आहे. 

No comments: