Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : महाराष्ट्राचा मानवी, सामाजिक व लोकसंख्या भूगोल

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : महाराष्ट्राचा मानवी, सामाजिक व लोकसंख्या भूगोल


डॉ.अमर जगताप ,शनिवार, २१ एप्रिल २०१२
प्राध्यापक :  द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

jagtapay@gmail.com
altभूगोलाच्या अभ्यासक्रमातील २.३ हा घटक महाराष्ट्राचा मानवी आणि सामाजिक भूगोल तर २.५ हा घटक लोकसंख्या भूगोल (महाराष्ट्राच्या संदर्भासह) असा आहे. मानवी लोकसंख्येचा थेट संबंध प्राकृतिक पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्ती इ. घटकांशी आहे. या घटकांची अनुकूलता किंवा प्रतिकूलता मानवी लोकसंख्येच्या घनता, वितरण, स्थलांतर या घटकांवर परिणाम करते. त्यामुळे भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल या शाखेचा उदय व विकास झाला आहे.
त्याचप्रमाणे पर्यावरण, साधनसंपत्ती इ. घटक मानवी, आर्थिक प्रक्रिया, मानवी जीवनाची सुरक्षितता यांवर परिणाम करतात; त्यामुळे मानवाची वस्ती, तिचे स्थान व स्वरूप निर्धारित होते. त्यामुळे आजच्या लेखात परस्परांशी सेंद्रीयपणे जोडलेल्या मानवी, सामाजिक व लोकसंख्या भूगोलाची चर्चा करणार आहोत.
मानवी व सामाजिक भूगोलात लोकसंख्येचे स्थलांतर, कारणे, स्रोत आणि परिणाम, या आयामांचा प्रामुख्याने विचार करणे अभिप्रेत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण वस्ती हा मुद्दा जाणीवपूर्वक नमूद केलेला आहे. त्यासाठी ‘मानवी वस्ती’चा नेमका अर्थ माहिती असणे गरजेचे आहे. सर्वसाधारणत वस्ती म्हणजे राहण्याचे ठिकाण असा अर्थ असला तरीदेखील भौगोलिकदृष्टय़ा आर्थिक प्रक्रियेकरिता आवश्यक साधनसंपत्तीची उपलब्धता आणि मानवी जीवनाकरिता आवश्यक सुरक्षितता प्रदान करू शकणारे ठिकाण म्हणजे वस्ती होय. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी वस्तीचा अभ्यास करावा. वस्तीस अनुकूल व प्रतिकूल घटक कोणते? प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेनुसार मानवी वस्तीचे स्वरूप कसे बदलते? इ. प्रश्नांचा अभ्यास या घटकामध्ये आवश्यक ठरतो. उदा. कोकणातील घरे उतरत्या छपराची व पठारी प्रदेशातील घरे धाब्याची असतात. वसाहतीमधील लोकांच्या आर्थिक प्रक्रियांनुसार वसाहतीचे ग्रामीण व नागरी वसाहत या पद्धतीने वर्गीकरण, त्यांचे निकष यांचा अभ्यास आवश्यक आहे. त्यानंतर नागरी वसाहतींचे कार्यानुसार, लोकसंख्येनुसार असलेले उपप्रकार उदाहरणासह विद्यार्थ्यांना माहिती असले पाहिजेत. ग्रामीण व नागरी दोन्ही प्रकारच्या वसाहतींना विविध समस्या भेडसावत आहेत. त्या समस्या व त्यांचे उपाय विद्यार्थ्यांना माहिती असणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे सरकारने त्याकरिता योजलेले उपाय आपल्याला माहिती असले पाहिजेत. उदाहरणार्थ महाराष्ट्र सरकारने ग्रामीण स्वच्छतेसाठी सुरू केलेले ‘संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान’; ग्रामीण वस्तीमधील कलह निवारणासाठीचे ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान’ इ. अशा विविध योजनांची सखोल माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.
भारत विशेषत: महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची वेगात वाढ होत आहे. त्यामागची कारणे व त्यातून उद्भवणाऱ्या समस्या आव्हानात्मक ठरल्या आहेत. राष्ट्राच्या विविध भागांतील तसेच राज्याच्या विविध भागांतील प्रादेशिक असमतोलामुळे गेल्या काही दशकांमध्ये मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत आहे. स्थलांतर ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे स्थलांतरणाचा स्रोत प्रदेश आणि गंतव्य प्रदेश; या दोन्ही ठिकाणी भौगोलिक (विशेषत: पर्यावरणीय), आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय परिणाम घडून येतात. देशातील महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, कर्नाटक यांसारख्या गंतव्य आणि उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान यांसारख्या स्रोत प्रदेशांमध्ये त्याचे विपरित परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे आयोगाद्वारे या घटकांवर जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
सन २०११ साली भारताची जनगणना पूर्ण झाली असून त्याचा सविस्तर अहवाल उपलब्ध झाला आहे. या अहवालामध्ये एकूण लोकसंख्या, लोकसंख्या वितरण, घनता, साक्षरता प्रमाण, िलगदर, वयोगटानुसार लोकसंख्या, माता मृत्यू दर, अर्भक मृत्यू दर इ. विविध घटकांची राष्ट्र आणि राज्यांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या माहितीवर थेट किंवा सन २००१ व २०११ या दोन जनगणना अहवालांच्या तुलनात्मक माहितीवर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या प्रश्नांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम २००१ व २०११ च्या जनगणनेची माहिती गोळा करावी. या माहितीला श्रेणीबद्ध स्वरूपात मांडावे; ती मांडताना अचूकपणे मांडावी. या माहितीकरिता दर्जेदार स्रोत वापरावेत. उदा. इंडिया इअर बुक, मनोरमा इअर बुक, महाराष्ट्र वार्षिकी, योजना मासिक, केंद्र सरकारच्या ‘मानव संसाधन विकास’ ख्यात्याची वेबसाईट इ. चा वापर करावा. त्यानंतर या माहितीला राज्यनिहाय आणि केंद्रशासित प्रदेशनिहाय वर्गीकृत करावे. ही सर्व माहिती घटकनिहाय (उदा. िलगदर/घनता इ.) मांडावी. या माहितीतील  सुरुवातीची ५-६ व शेवटची ५-६ राज्ये यावर विशेष भर द्यावा.
लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला पुढचा मुद्दा म्हणजे नागरीकरण होय. मूलत: हा मुद्दा वस्ती भूगोलाशी संबंधित आहे. जागतिकीकरणाच्या अंमलबजावणीनंतर गेल्या २० वर्षांमध्ये भारतातील नागरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आहे; विशेषत: महाराष्ट्रासारख्या राज्यात. मात्र भारतातील बहुतांश नागरीकरण अनियोजित स्वरूपाचे आहे. त्यातून अनेक समस्या उद्भवल्या आहेत. नागरीकरणामधून पायाभूत सुविधांची कमतरता; सांडपाणी - घन कचरा विल्हेवाटीची समस्या; वाहतूक व्यवस्थेवरील ताण, ऊर्जेचा तुटवडा, घरांचा प्रश्न, झोपडपट्टय़ांची निर्मिती, गुन्हेगारीचे वाढते प्रमाण इ. समस्या उद्भवत आहेत. विशेषत: महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक शहरांमध्ये या समस्या प्रकर्षांने आढळत आहेत. त्या समस्यांचा अभ्यास व त्यावरील उपाय यांची विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. विशेषत: केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी नागरीकरणाच्या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाय, योजना यांची र्सवकष माहिती आवश्यक आहे. उदा. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्नवीकरण अभियान काय आहे? त्याद्वारे महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमध्ये विकास केला जात आहे इत्यादी माहिती विद्यार्थ्यांना असणे आवश्यक आहे.
प्रस्तुत अभ्यासात सर्वात शेवटी समाविष्ट केलेला पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रादेशिक असमतोल होय. या मुद्दय़ाचा अर्थ, त्याची कारणे, परिणाम व त्यावरील उपाय इ. आयामांचा अभ्यास करावा. विशेषत: महाराष्ट्रासंदर्भात प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी स्थापना केलेली प्रादेशिक विकास मंडळे उदा. मराठवाडा विकास महामंडळ इ. ची सखोल माहिती घ्यावी. अनुशेषाची संकल्पना व तो अनुशेष भरून काढण्याचे उपाय यांचा देखील अभ्यास करावा. थोडक्यात या घटकांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी विशिष्ट पुस्तकावर भर देण्याऐवजी वर्तमानपत्रे, मासिके, सरकारी अहवाल यांचा जास्त वापर करावा. प्रत्येक घटकाला चालू घडामोडीच्या अनुषंगाने अभ्यासावे; ही रणनीती वापरल्यास निश्चितच चांगले गुण प्राप्त करता येतील.

No comments: