Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : समारोप पूर्वपरीक्षेच्या तयारीचा!

‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : समारोप पूर्वपरीक्षेच्या तयारीचा!

तुकाराम जाधव ,शनिवार, २४ मार्च २०१२
संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

malharpatil@gmail.
altविद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, १ मार्चपासून राज्यसेवा पूर्वपरीक्षेविषयी सुरू झालेल्या लेखमालेची आज सांगता करत आहोत. आजपर्यंतच्या एकूण २० लेखांत आपण राज्यसेवा म्हणजे एमपीएससी परीक्षेचे स्वरूप, त्यातील टप्पे, तिचे इतर परीक्षांपेक्षा असणारे भिन्नत्व आणि विशेष म्हणजे त्यातील पूर्वपरीक्षा या टप्प्याविषयी सखोल व सविस्तरपणे चर्चा केली आहे. या परीक्षेचे वेगळेपण लक्षात आल्यास त्यास अनुषंगून अभ्यास करता यावा या हेतूनेच हा लेखनप्रपंच हाती घेतला. आज या लेखमालेतील पूर्वपरीक्षेसंबंधीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा समाप्त होत आहे. आतापर्यंत यात पूर्वपरीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, त्यासाठी वाचायचे संदर्भसाहित्य यापासून ते एकंदर वेळ व अभ्यासाचे प्रभावी व परीक्षाभिमुख नियोजन कसे करायचे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मूलत: ही परीक्षा इतर रूढ परीक्षांपेक्षा अनेक कारणांमुळे भिन्न असल्यामुळे त्यात यश संपादन करण्यासाठी निराळय़ा अभ्यासपद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक ठरते हे आता लक्षात आले असणार, यात शंका नाही. त्यादृष्टीने विचार करता परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, संदर्भसाहित्याची यादी, मागील प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि अभ्यास व वेळेचे नियोजन हे महत्त्वपूर्ण टप्पे समाविष्ट असणारी अभ्यासपद्धती निर्णायक ठरते. या परीक्षेत विविधांगी अभ्यासक्रमाची निरनिराळय़ा संदर्भाच्या आधारे तयारी करावी लागत असल्याने वेळेच्या नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. त्यामुळे कोणत्या घटकासाठी काय वाचायचे आणि त्यासाठी नेमका किती वेळ द्यायचा याची व्यवस्थित माहिती असणे महत्त्वाचे ठरते. त्याचप्रमाणे निर्धारित वेळेत बऱ्याच अभ्यासघटकांचे वाचन करावे लागत असल्यामुळे केवळ एकदा वाचून संपूर्ण अभ्यासक्रम स्मरणात ठेवणे अवघड असते. म्हणूनच प्रत्येकाला आपल्या नियोजनात त्या त्या घटकांच्या उजळणीलाही रास्त स्थान देणे अत्यावश्यक ठरते. थोडक्यात, उपलब्ध वेळेचा शिस्तबद्ध वापर, निर्धारित नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी ही बाब परीक्षेत यश मिळवण्यासाठी मध्यवर्ती ठरते.
दुसऱ्या बाजूला आपल्या अभ्यासात परीक्षाभिमुखता येण्यासाठी प्रश्नांचा भरपूर सराव करणे अत्यावश्यक असते. मागील लेखांत म्हटल्याप्रमाणे सराव चाचण्यांद्वारे आपल्या अभ्यासाची व्याप्ती व सखोलता तपासता येते. त्याद्वारे आपल्या उणिवा लक्षात घेऊन त्यावर मात करणे शक्य बनते. म्हणूनच सरावचाचण्यांचा नियमितपणे केलेला अवलंब आपल्या तयारीत परीक्षाभिमुखतेची हमी देण्यासाठी अत्यावश्यक ठरतो. थोडक्यात स्वरूप, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, संदर्भसाहित्य आणि नियोजन या प्रत्येक घटकाचा काटेकोर आणि परीक्षापद्धतीला समोर ठेवून विचार करणे महत्त्वाचे ठरते.
एकंदर या परीक्षेसंबंधी जाणून घेतल्यानंतर ही बाब लक्षात येते, की प्रत्येक विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या व्यक्तिमत्त्वातही पूरक बदल करावे लागतात. प्रस्तुत स्पर्धापरीक्षेची तयारी करण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतर परीक्षेच्या तयारीसाठी किती कालावधी आवश्यक आहे? प्रत्यक्षात किती कालावधी उपलब्ध आहे? आपल्या व्यक्तिमत्त्वात काही उणिवा आहेत का? आपले स्ट्राँग पॉइंट्स कोणते आहेत? अशा विविध अंगांनी स्वयंमूल्यमापन करणे उपयुक्त ठरते. निर्धारित एक-दोन वर्षांच्या काळात मुख्यत: या परीक्षेला सामोरे ठेवूनच आपले वेळापत्रक विकसित करावे. कारण जाता जाता किंवा केवळ टाइम पास करत करत या परीक्षेचा अभ्यास करता येत नाही अथवा यात यशही प्राप्त करता येत नाही, हे कायम स्मरणात ठेवा. म्हणूनच राज्यसेवेचे ध्येय निर्धारित केल्यानंतर इतर वेगळय़ा बाबीत वेळ व्यतीत न करता आपल्या ‘लक्ष्या’वर नजर ठेवावी. तेव्हा, विद्यार्थी मित्रहो, येणाऱ्या काळात या चर्चेला स्मरणात ठेवून तुम्ही आपल्या तयारीला सुरुवात कराल अशी खात्री वाटते. 
अर्थात, येत्या सोमवारपासून म्हणजे २६ मार्चपासून राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या उर्वरित दोन टप्प्यांविषयी जाणून घेणारी लेखमाला सुरू करत आहोत. त्यामुळे राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षेचा टप्पा पार करून मुख्य व मुलाखतीला कसे सामोरे जायचे किंबहुना त्यात नेत्रदीपक यश प्राप्त करून अपेक्षित पदापर्यंतचा प्रवास कसा सुखकर करायचा याची सविस्तर व सखोल माहिती सादर केली जाणार आहे.. तर मग पुढील तयारीला सज्ज व्हा!

No comments: