Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : सामान्य अध्ययन : इतिहासाची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : सामान्य अध्ययन : इतिहासाची तयारी


शरद पाटील - मंगळवार, १० एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.

sharadpatil11@gmail.com
alt
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक- १ मध्ये ७५ गुणांसाठी इतिहास या विषयाची विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास असे अभ्याससूत्र राज्य लोकसेवा आयोगानेच विद्यार्थ्यांसाठी जुन्या अभ्यासक्रमाबरोबरच या अभ्यासक्रमासाठीही दिलेले आहे.
आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास, ब्रिटिश सत्तेची भारतातील स्थापना,
ब्रिटिश सत्ता स्थापनेनंतरचे सामाजिक-सांस्कृतिक बदल, सामाजिक-आर्थिक जागृती, भारतीय राष्ट्रवादाचा उदय व विकास, गांधीयुगातील राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजसुधारक, त्यांचे विचार व कार्य, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा असे ९ घटक अभ्यासक्रमामध्ये दिले आहेत. तसेच अभ्यासक्रमातील हे घटक उपघटकांमध्ये आयोगानेच सविस्तररीत्या विभागले आहेत.
पूर्वीच्या अभ्यासक्रमातील प्राचीन ते आधुनिक काळातील (सातवाहन ते मराठा राज्य) सांस्कृतिक व सामाजिक जीवन घटक आयोगाने नवीन अभ्यासक्रमामधून रद्द केला आहे. पण त्यासोबतच नवीन काही घटक, उपघटकांचा अभ्यासक्रमामध्ये नव्याने समावेश केला गेला आहे.
पूर्वीच्या अभ्यासक्रमाच्या तुलनेत नवा अभ्यासक्रम नेमका व स्पष्ट दिला आहे. साधारणपणे  अठराव्या शतकाच्या मध्यापासून ते विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंतचा कालपट या अभ्यासक्रमांतर्गत येतो. राजकीय घडामोडींना महत्त्व देत असतानाच सामाजिक, आर्थिक जीवनातील बदल, सांस्कृतिक क्षेत्रातील परिवर्तनाचा विचार व त्याचे महत्त्व नव्या अभ्यासक्रमामध्ये आयोगाने दिले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रीय सभा व राष्ट्रीय सभाप्रणीत राष्ट्रवाद व राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखालील आंदोलनांएवढय़ाच राष्ट्रीय सभेशी समांतर असणाऱ्या चळवळी, आंदोलनांचे महत्त्व मान्य करून अभ्यासक्रमामध्ये त्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच स्वातंत्र्योत्तर भारतातील घडामोडींचा नव्या अभ्यासक्रमात असणारा समावेश व राष्ट्रीय चळवळीतील स्त्रियांचा सहभाग, स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्रीप्रश्नविषयक चळवळी, पर्यावरणविषयक आंदोलने या घटकांना दिलेले अभ्यासक्रमातील महत्त्व-इतिहासास समकाळाशी जोडण्याचा प्रयत्न करत असतानाच एकूणच इतिहास विषयाच्या रुंदावणाऱ्या कक्षांचा विचार आयोगाने केलेला दिसतो.
काही उपघटकांचे एकापेक्षा जास्त जागी आलेले उल्लेख, काही ठिकाणी ऐतिहासिक क्रमाची झालेली अदलाबदल या काही मर्यादाही नवीन अभ्यासक्रमामध्ये आहेत, पण एकूण विचार करता ६० टक्क्यांपेक्षा जास्त अभ्यासक्रम जुनाच आहे. नवीन अभ्यासक्रमातील नेमकेपणा व स्पष्टपणा या बाबी विद्यार्थ्यांना तयारीसाठी खूपच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाची आयोगाने नऊ घटकांमध्ये विभागणी केलेली असली तरी आपण आपल्या विवेचनाच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाचे काही गटांमध्ये विभाजन करणार असून, त्या गटांच्या आधारावरच आपण इतिहास या विषयाची तयारी मुख्य परीक्षेसाठी कशी करायची याचा विचार करणार आहोत.
इतिहास विषयाचा अभ्यास करत असताना एक-दोन बाबी विद्यार्थ्यांनी लक्षात घेतल्यास त्याचा त्यांना तयारीसाठी फायदा होऊ शकतो. त्यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे मुख्य परीक्षा जरी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असली तरी मुख्य परीक्षेतील सर्व प्रश्न हे शुद्ध ‘वस्तुनिष्ठ’ माहितीवर आधारलेले असणार नाहीत, त्यामध्ये विश्लेषणाचा भाग असणार आहेच. त्यामुळे या विषयाची तयारी करत असताना वस्तुनिष्ठ स्वरूपाचीच फक्त माहिती संकलित करण्यावर विद्यार्थ्यांनी भर देऊ नये तर एकूण ऐतिहासिक प्रक्रियेचा संदर्भ लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ माहिती, बाबींचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. अभ्यास करताना तयारीची दिशा या प्रकारे ठेवल्यास इतिहास घटकाची तयारी ही बाब कंटाळवाणी ठरणार नाही.
तयारीच्या संदर्भातील पुढील महत्त्वाची बाब म्हणजे ऐतिहासिक सनसनावळय़ांची भीती या घटकाची तयारी करताना विद्यार्थ्यांनी ठेवू नये. एकूण परीक्षेत सनसनावळय़ांवर आधारलेले प्रश्न हे एकूण प्रश्नांच्या तुलनेत मर्यादित असतात व दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे वारंवार वाचन, रिव्हिजन केल्यानंतर या सनसनावळय़ा लक्षात राहात जातात. त्यामुळे इतिहास विषयाच्या तयारीत सनसनावळय़ांची भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा.
बाजारपेठेमध्ये इतिहास विषयाची अनेक पुस्तके व संदर्भसाहित्य उपलब्ध आहे. तयारी करत असताना नेमके कोणते संदर्भसाहित्य वापरायचे हा विद्यार्थ्यांपुढील महत्त्वाचा प्रश्न असतो. अभ्यासक्रमावर आधारित संदर्भसाहित्य ‘द युनिक अॅकॅडमी’ने यापूर्वी जसे उपलब्ध करून दिले होते तसेच साहित्य नवीन अभ्यासक्रमावर आधारित उपलब्ध करून दिले जाईल. त्याबरोबरच काही पायाभूत संदर्भग्रंथांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. त्याचा उल्लेख पुढील लेखांमध्ये येईल. जास्तीत जास्त माहिती जमा करण्यासाठी गरजेपेक्षा जास्त संदर्भाचा वापर न करता मोजकीच, पण दर्जेदार संदर्भसाधने वापरली तर ती बाब जास्त फायद्याची ठरू शकते. एक अथवा दोन संदर्भग्रंथ इं२्रू म्हणून हाताशी ठेवले, त्यांचा व्यवस्थित अभ्यास केला व त्यामध्ये नंतर काही भर घातली तर अशी अभ्यासपद्धती लाभदायी ठरू शकते.
पुढील लेखांपासून प्रत्यक्ष या घटकाची तयारी कशी करायची याचा आपण विचार करणार आहोत.

No comments: