कैलास भालेकर, गुरुवार, २४ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com
अर्थव्यवस्था आणि नियोजन, विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमामधील सामान्य अध्ययन पेपर ४ च्या अभ्यासक्रमाचा आवाका विस्तृत असून पेपरचे स्वरूप वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी आहे. त्यामुळे या विषयाच्या प्रत्येक घटक आणि उपघटकाची तयारी अत्यंत नेमकेपणाने करण्याची आवश्यकता आहे.
सामान्य अध्ययन - ४ या विषयाच्या अभ्यासक्रमावरील सर्व मूलभूत संकल्पनांचे आकलन, मूलभूत संकल्पनांचे उपयोजन, संकल्पनांचा सद्य:स्थितीतील घडामोडींशी असलेला सहसंबंध, महत्त्वाची आकडेवारी यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आकडेवारीची तयारी करताना अद्ययावत संदर्भावर अधिक भर देणे उपयुक्त ठरते. अभ्यासक्रमाचे नेमकेपणाने अवलोकन करून उपयुक्त संदर्भाची निवड करणे आवश्यक ठरते. आकडेवारीसाठी अधिकृत संदर्भावर भर देण्याची गरज आहे. उदा. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, भारत व महाराष्ट्राचा अर्थसंकल्प, राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांच्या वेबसाइटवरील अधिकृत माहिती, इंडिया इयर बुक तसेच शासकीय प्रकाशने उदा. योजना, लोकराज्य इ.
मूलभूत संकल्पनांच्या तयारीसाठी योग्य संदर्भसाहित्य निवडणे आवश्यक आहे. परंतु संदर्भसाहित्याचा अभ्यास करताना अभ्यासक्रम आणि परीक्षाभिमुख दृष्टिकोन यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आकडेवारीची तयारी करताना देखील महत्त्वाची आकडेवारीच करण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रमाची सुसंगतता याचा विचार करणे अधिक उपयुक्त ठरते.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सर्व पेपरमध्ये स्वतंत्र रीत्या उत्तीर्ण होण्याची किमान गुणमर्यादा निश्चित केलेली आहे. तसेच, ३:१ अशी नकारात्मक गुणप्रणाली देखील निश्चित केलेली आहे. या बाबींचा विचार या पेपरची तयारी करताना आवश्यक असून त्यासाठी योग्य व्यूहरचना अवलंबिणे महत्त्वाचे ठरते. सामान्य अध्ययन - ४ या पेपरमध्ये प्रमुख तीन घटकांचा समावेश आहे -
(१) अर्थव्यवस्था आणि नियोजन,
(२) विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी
(३) विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास.
सामान्य अध्ययन पेपर - ४ मधील या तीन प्रमुख घटकांमध्ये एकूण २२ उपघटकांचा समावेश होत असून त्या उपघटकांच्या अंतर्गत देखील अनेक बाबींचा समावेश होतो. या सर्व घटकांमधील अनेक संकल्पना खऱ्या अर्थाने उपयोजित आणि सद्य:स्थितीतील संदर्भासह आहेत. तसेच या संकल्पना शासनाच्या यंत्रणा, कार्यक्रम आणि धोरणे यावर आधारित आहेत. देशातील प्रमुख समस्या आणि आव्हाने, त्यावरील महत्त्वाच्या उपाययोजना यांचा देखील या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
सध्या अधिक प्रचलित असणाऱ्या बाबी उदा. सार्वजनिक खासगी सहकार्य प्रारूप (PPP), परकीय थेट गुंतवणूक (FDI ), विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) यांसारख्या अनेक बाबींचा समावेश या पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास या घटकांतर्गत भारताचे महत्त्वाचे विज्ञान तंत्रज्ञानविषयक कार्यक्रम, धोरणे आणि उपाययोजना यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम खूपच उपयोजित करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या केस स्टडीजचा समावेश देखील या अभ्यासक्रमात करण्यात आलेला असून त्यांची तयारी अधिक नेमकेपणाने करण्याची गरज आहे.
भारताच्या आण्विक धोरणाचा समावेश एका स्वतंत्र प्रकरणात करण्यात आला असून त्यामधील महत्त्वपूर्ण घडामोडी अद्ययावत संदर्भासह अभ्यासणे आवश्यक ठरते. अभ्यासक्रमाचे स्वरूप विस्तृत असल्याने विद्यार्थ्यांनी स्वत:च्या नोट्स तयार केल्यास अभ्यास नेमका आणि जलद करणे शक्य होते. तसेच, कमी कालावधीत उजळणी करण्याच्या दृष्टीने देखील स्वत:च्या नेमक्या नोट्स खूपच उपयुक्त ठरतात. नोट्स तयार करण्याचा अगोदर अभ्यासक्रमाचे काळजीपूर्वक आकलन महत्त्वाचे आहे. परीक्षेचे वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूप लक्षात घेऊन नोट्स तयार केल्यास या नोट्स अधिक उपयुक्त ठरतील.
अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व संकल्पना, कमीत कमी शब्दात कशा पद्धतीने विचारल्या जाऊ शकतील याचा अंदाज घेऊन संकल्पनांच्या नोट्स तयार करणे आवश्यक ठरते. बहुपर्यायी परीक्षेत प्रश्नांचा अचूक पर्याय निवडण्यासाठी पर्यायांचा तुलनात्मक विचार करावा लागतो. त्यामुळे नोट्स तयार करतानाच तुलनात्मक विचार केल्यास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेसाठी या नोट्स अधिक उपयुक्त ठरतील. सामान्य अध्ययन पेपरसाठी नकारात्मक गुणपद्धती असल्याने अचूकता खूपच महत्त्वाची आहे. स्कोअरिंग, अचूकता आणि वेग या बाबी पेपरमध्ये खूपच महत्त्वाच्या ठरतात. त्या दृष्टीने नेमक्या नोट्स महत्त्वाच्या ठरतात.
सामान्य अध्ययन-४ या पेपरच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप विचारात घेता शासकीय कार्यक्रम, शासकीय यंत्रणा आणि सद्य:स्थितीतील आकडेवारी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व नोंदी एखाद्या छोटय़ा डायरीमध्ये केल्या आणि डायरीमधील माहितीची कायम उजळणी केल्यास ही सर्व माहिती अचूकपणे आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवणे सुलभ होते. तसेच, परीक्षेमध्ये या माहितीवरील प्रश्न अचूक रीत्या सोडविणे शक्य होते. अर्थातच, नोट्स बरोबरच अभ्यासक्रमाचे आकलन देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे नियमित वाचन, माहितीचा आणि आकलनाचा आवाका विस्तृत करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते.
योग्य संदर्भाची निवड, संकल्पनांचे अचूक आकलन, लक्षात ठेवलेली महत्त्वाची आकडेवारी, सद्य:स्थितीतील संदर्भाचा परिणामकारक वापर याद्वारे सामान्य अध्ययन पेपर - ४ मध्ये चांगले स्कोअरिंग करणे शक्य होईल.
No comments:
Post a Comment