‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा :वाणिज्य, विज्ञान व अभियांत्रिकी घटकांची तयारी
कैलास भालेकर ,मंगळवार, १३ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com
राज्यसेवा पूर्व परीक्षेतील वाणिज्य व अर्थव्यवस्था हा आणखी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. या घटकावर ३० प्रश्न विचारले जातात. वाणिज्य व अर्थव्यवस्था घटकातील तयारी करताना प्रामुख्याने या घटकातील महत्त्वपूर्ण संकल्पना, संकल्पनांशी निगडित विविध वस्तुनिष्ठ बाबी, विविध संकल्पनांमधील सहसंबंध, संकल्पनांचे उपयोजन, महत्त्वाची आकडेवारी आणि अर्थव्यवस्थेतील प्रचलित घडामोडी यावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. वाणिज्य व अर्थव्यवस्था या घटकामध्ये पुढील प्रमुख उपघटकांचा समावेश होतो - (१) पंचवार्षिक योजना (२) शासकीय अर्थव्यवस्था : अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी. (३) राष्ट्रीय विकासात सरकारी, सहकारी ग्रामीण बँकांची भूमिका. (४) भाववाढीची कारणे व उपाय. (५) भारतीय आयात-निर्यात.
पंचवार्षिक योजना या उपघटकाच्या तयारीमध्ये पुढील महत्त्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव होतो. भारताचे नियोजन, नियोजनाची ऐतिहासिक पाश्र्वभूमी, नियोजन आयोगाची रचना, राष्ट्रीय विकास परिषद, तिची रचना आणि या संस्थांची कार्यपद्धती याचा समावेश होतो. यावर आधारित भारताने कोणत्या प्रकारचे नियोजन स्वीकारले आहे? या प्रकारचा प्रश्न विचारला गेल्यास भारताच्या नियोजनाच्या मूलभूत वैशिष्टय़ांचा विचार करून ‘लोकशाही नियोजन’ स्वीकारले आहे हे स्पष्ट होते. पंचवार्षिक योजनेचा कालावधी, पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान, पंचवार्षिक योजनेतील महत्त्वपूर्ण घडामोडी, महत्त्वपूर्ण धोरणे आणि प्रत्येक पंचवार्षिक योजनेतील सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात साध्य झालेला वृद्धी दर यावर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात.
सर्व पंचवार्षिक योजनांची एखाद्या तक्त्यांच्या साहाय्याने एकत्रितरीत्या तयारी करणे शक्य आहे. या प्रकारची तयारी केल्याने सर्व पंचवार्षिक योजनांचा तुलनात्मक अभ्यास करावा. वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्नपद्धतीसाठी या प्रकारची तयारी अधिक उपयुक्त ठरते. तसेच परीक्षेमध्ये पर्यायाची निवड करताना तुलनात्मक दृष्टिकोन स्वीकारून योग्य पर्यायाची निवड करणे अधिक सुलभ ठरते. पंचवार्षिक योजनांची आकडेवारी अभ्यासताना महत्त्वाच्या आकडेवारीवर अधिक भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. महत्त्वपूर्ण आकडेवारीची नोंद एखाद्या डायरीमध्ये करून या नोंदी अनेकदा वाचल्यास परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने ही बाब अधिक लाभदायक ठरेल.
शासकीय अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण या उपघटकात प्रमुख भर अर्थसंकल्पावर असतो. म्हणूनच अर्थसंकल्पातील प्रमुख घटक आणि संकल्पनांचे आकलन यावर भर देणे आवश्यक ठरते. अर्थसंकल्पाची व्याख्या, अर्थसंकल्पाचे प्रकार, अर्थसंकल्पामधील महसुली जमा, भांडवली जमा, महसुली खर्च भांडवली खर्च या संकल्पनांची माहिती असणे आवश्यक ठरते. तसेच, महसुली जमेमध्ये कर महसूल, करेतर महसूल या अंतर्गत कोणत्या बाबी समाविष्ट होतात याची तयारी उपयुक्त ठरते. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर या संकल्पना आणि विविध करांचे प्रकार याची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून आकारल्या जाणाऱ्या कराची माहितीदेखील आवश्यक ठरते.
अर्थसंकल्पाची तयारी करताना प्रचलित घडामोडीवर अधिक देण्याची गरज आहे. त्यादृष्टीने कररचनेमध्ये होणारे बदल, त्यासंदर्भातील शासनाची सध्याची धोरणे आणि प्रत्येक कराशी निगडित महत्त्वाची आकडेवारी अवगत असणे गरजेचे ठरते. तसेच केंद्र शासन आणि राज्य शासनाद्वारे मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पातील ठळक वैशिष्टय़ांचे आकलन महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक पाहणी अहवाल आणि केंद्र शासनाचा आर्थिक पाहणी अहवाल उपयुक्त ठरतो.
अंदाजपत्रकाबरोबरच तुटीच्या विविध संकल्पना उदा., महसुली तूट, राजकोषीय तूट, प्राथमिक तूट यांची तयारी अत्यावश्यक ठरते. तसेच, तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय? तुटीच्या अर्थभरण्याची कारणे आणि परिणाम या बाबींची वस्तुनिष्ठ माहिती अभ्यासणे आवश्यक ठरते. त्यासंदर्भातील वर्तमानातील महत्त्वपूर्ण आकडेवारी उदा., तुटीचे उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष तूट अशी आकडेवारी उपयुक्त ठरते. कर सुधारणासंदर्भातील महत्त्वाच्या समित्या आणि या समित्यांच्या महत्त्वाच्या शिफारशींची तयारी करणे उपयुक्त ठरते. सध्याच्या केंद्राच्या आणि राज्यांच्या कर सुधारणा आणि प्रस्तावित कर सुधारणा यांची तयारी आवश्यक ठरते. अर्थातच, या उपघटकाची तयारी करताना आधीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण साहाय्यभूत ठरते.
रिझव्र्ह बँक आणि बँकिंग या उपघटकांमध्ये रिझव्र्ह बँकेची कार्ये, नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँका, अग्रणी बँका, सहकारी बँका यावर अधिक भर देण्याची गरज आहे. तसेच भांडवल बाजाराशी निगडित काही महत्त्वाच्या बाबींची उदा., शेअर बाजार, शेअर निर्देशांक, म्युच्युअल फंड यांची प्राथमिक व चालू संदर्भातील माहिती असणे उपयुक्त ठरते. बँकिंग क्षेत्राशी निगडित महत्त्वपूर्ण संस्था आणि त्यासंदर्भातील प्रचलित धोरणे आणि घडामोडींची तयारी अत्यावश्यक ठरते.
भाववाढीची कारणे आणि उपाययोजना या उपघटकांतर्गत भाववाढीसंदर्भात महत्त्वपूर्ण संकल्पनात्मक आकलन आवश्यक आहे. भाववाढीसंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्देशांक, निर्देशांकाची आधार वर्षे, भाववाढीची कारणे आणि भाववाढीसंदर्भासह रिझव्र्ह बँक आणि शासनाद्वारे करण्यात येणारी उपाययोजना यांची तयारी आवश्यक ठरते. त्यासंदर्भातील अलीकडील महत्त्वपूर्ण धोरणांचा आणि आकडेवारीचा परामर्श घेणेदेखील उपयुक्त ठरते.
भारतीय आयात-निर्यात या उपघटकांतर्गत भारताच्या परकीय व्यापाराची रचना आणि दिशा यामध्ये झालेले महत्त्वपूर्ण बदल याचे आकलन आवश्यक ठरते. भारताचे आयात-निर्यात धोरण, धोरणाची प्रमुख उद्दिष्टे आणि महत्त्वपूर्ण निर्यात प्रोत्साहनपर कार्यक्रम यांची तयारी उपयुक्त ठरते. भारताच्या आयात-निर्यात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांची रचना, कार्ये आणि सद्य:स्थितीतील महत्त्वपूर्ण धोरणे यांचे आकलन आवश्यक ठरते.
विज्ञान व अभियांत्रिकी
राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी हा आणखी एक महत्त्वाचा घटक असून, नेमकी आणि अचूक तयारी केल्यास या घटकात चांगले गुण प्राप्त करणे शक्य होते. विज्ञान व अभियांत्रिकी घटकामध्ये पुढील उपघटकांचा समावेश होतो.
ल्ल वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन- विज्ञानाचे स्वरूप, विज्ञानाची पूर्व गृहीतके, शास्त्रीय पद्धती, वैज्ञानिक ज्ञान.
ल्ल आधुनिकीकरण व विज्ञान-आधुनिकीकरण संकल्पना, प्रकार, आधुनिकीकरण व भारत, समस्या व उपाय.
ल्ल जागतिक तसेच भारतातील वैज्ञानिक व अभियांत्रिकी प्रगती.
ल्ल वैज्ञानिक प्रगतीमुळे शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम.
ल्ल भारतीय समस्यांवर वैज्ञानिक उपाय उदा., ऊर्जा समस्या, अन्नधान्य समस्या, लोकसंख्या समस्या, पर्यावरण समस्या, शैक्षणिक समस्या, गृहनिर्माण समस्या, संपर्कविषयक समस्या, लोकस्वास्थ्य इत्यादी.
वैज्ञानिक विचारसरणीमध्ये शास्त्रीय ज्ञान, विगमन, निगमन, साम्यानुमान, अभ्युपगम, सिद्धान्त, केवलगणन यांसारख्या विचारसरणीशी निगडित संकल्पनांची थोडक्यात तयारी करणे उपयुक्त ठरते.
आधुनिकीकरण या उपघटकाच्या तयारीमध्ये आधुनिकीकरणाचे प्रकार, आधुनिकीकरणाचे महत्त्वाचे टप्पे, सांस्कृतिकीकरण आणि पाश्चात्त्यीकरण या संकल्पना आणि त्यांचा भारतावरील प्रभाव या बाबींची तयारी महत्त्वाची ठरते. औद्योगिक समाज, नागरीकरण या संकल्पनांचे भारतीय संदर्भातील आकलन करण्याबरोबरच भारतीय आधुनिकीकरणासंदर्भातील समस्यांची माहिती आवश्यक ठरते. तसेच आधुनिकीकरणासंदर्भातील केलेल्या उपाययोजना आणि आवश्यक असलेल्या उपाययोजना यांची माहिती असणे महत्त्वाचे ठरते.
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि आरोग्य यांमधील महत्त्वपूर्ण आणि मूलभूत उपघटकांची तयारीदेखील आवश्यक आहे. त्यासाठी साधारणपणे दहावीपर्यंतच्या विज्ञानाच्या पुस्तकांतील महत्त्वाच्या बाबींचे वाचन उपयुक्त ठरते. त्यामधील महत्त्वाच्या संज्ञा, सूत्रे यांची तयारी काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. मूलभूत विज्ञानाच्या तयारीसाठी आधीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे उपयुक्त ठरते.भारताच्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या विविध टप्प्यांची माहितीदेखील महत्त्वाची आहे. ऊर्जा क्षेत्रातील प्रगती, विविध ऊर्जा कार्यक्रम, अणुऊर्जा कार्यक्रम, पुनर्नवीकरण ऊर्जास्रोत, सौर ऊर्जास्रोत, पवन ऊर्जास्रोत, यांमधील महत्त्वपूर्ण टप्प्यांची तयारी गरजेची आहे. ऊर्जा क्षेत्रातील विविध कार्यक्रम, ऊर्जा क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या यंत्रणा आणि ऊर्जा-क्षेत्रातील सद्य:स्थितीतील महत्त्वाच्या घडामोडी यांची तयारी आवश्यक ठरते.
पर्यावरणविषयक समस्या, पर्यावरणाशी निगडित महत्त्वाचे कायदे, पर्यावरणविषयक यंत्रणा, पर्यावरणविषयक सद्य:स्थितीतील महत्त्वाचे कार्यक्रम, पर्यावरणविषयक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय करार याबाबींची तयारी महत्त्वाची आहे.
भारतातील अवकाश कार्यक्रम, त्यातील प्रमुख टप्पे, अवकाश तंत्रज्ञानातील महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना, सद्य:स्थितीतील अवकाश कार्यक्रमाच्या घडामोडी, भारताचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम आणि त्यासंदर्भातील सद्य:स्थितीतील घडामोडींची माहिती उपयुक्त ठरते.
माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या बाबींची तयारीदेखील आवश्यक असून या तंत्रज्ञानामधील सध्याच्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती उपयुक्त ठरते. अन्नधान्य समस्या, संपर्कविषयक समस्या, लोकसंख्या समस्या, गृहनिर्माण समस्या यासंदर्भात त्यांचे स्वरूप, परिणाम, उपाययोजनात्मक महत्त्वाचे शासकीय कार्यक्रम आणि महत्त्वाच्या यंत्रणा यांची तयारी आवश्यक आहे. अशारीतीने उपरोक्त दोन्ही घटकांतील मूलभूत संकल्पना, त्यांचे उपयोजन, त्यासंदर्भातील चालू आकडेवारी, विविध घटकासंबंधी कल, त्यासंबंधी कार्यरत शासकीय यंत्रणा आणि उपाययोजनात्मक कार्यक्रम इ. बाबींची वस्तुनिष्ठ तयारी केल्यास दोन्ही घटकांत अधिक गुण प्राप्त करणे शक्य आहे यात शंका नाही.
No comments:
Post a Comment