‘एमपीएससी’चा राजमार्ग:मुख्य परीक्षा:मानवी साधनसंपत्ती विकास अभ्यासक्रमाची तयारी-१
कैलास भालेकर, शुक्रवार, ११ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com
सामान्य अध्ययन भाग-३ मध्ये ‘मानवी साधनसंपत्तीचा विकास’ या विषयाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन अभ्यासक्रमात केला आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप खऱ्या अर्थाने उपयोजित असून, शासनाच्या या संदर्भातील सर्व महत्त्वाच्या कार्यक्रमांचे अचूक आकलन या विषयाच्या अभ्यासातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अभ्यासक्रमाची तयारी करताना सद्य:स्थितीतील संदर्भाचा अचूक वेध घेणे खूपच महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शासनाच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या धोरणांचे आणि अहवालांचे परीक्षाभिमुख आकलन खूपच उपयुक्त ठरते. उदा. भारताची जनगणना. जनगणना अहवालाचा अभ्यास करताना त्यामधील तुलनात्मक संदर्भाचे आकलन आवश्यक ठरते. जनगणना अहवाल खूपच विस्तारित असल्याने त्यामधील माहिती संकलित करताना परीक्षाभिमुख दृष्टिकोन खूपच आवश्यक आहे. उदा., माहितीचे वर्गीकरण विद्यार्थ्यांने अभ्यासक्रमाचा आधार घेऊन केल्यास महत्त्वाच्या आकडेवारीच्या सुटसुटीत नोट्स तयार करता येतील. त्यामुळे आकडेवारी लक्षात ठेवणे तुलनेने सुलभ ठरते.
लोकसंख्या हा मानवी साधनसंपत्तीच्या विकासातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्या दृष्टीने सध्याच्या म्हणजेच २०११च्या जनगणना अहवालाचे आकलन तर आवश्यक आहेच, परंतु त्याचबरोबर आधीच्या जनगणना अहवालातील म्हणजेच २००१च्या अहवालातील काही महत्त्वपूर्ण घटकांचे तुलनात्मक आकलन खूपच महत्त्वाचे आहे. उदा. लोकसंख्या, लोकसंख्यावाढ, स्त्री-पुरुष प्रमाण, साक्षरता, साक्षरतेतील-स्त्री साक्षरता, पुरुष साक्षरता, लोकसंख्येची घनता इ. त्याचबरोबर लोकसंख्या घटकाचे आकलन जनगणना अहवालाधारे करताना भारताच्या माहितीबरोबरच महाराष्ट्राच्या त्या संदर्भातील तुलनात्मक संदर्भ विचारात घेणे महत्त्वाचे आहे. ही सर्व आकडेवारी आणि त्यातील महत्त्वाचे कल त्या दृष्टीने अभ्यासणे आवश्यक आहे. लोकसंख्या घटकातील निगडित बाबींमध्ये महाराष्ट्राची प्रत्येक घटकातील स्थिती आणि भारतातील क्रमांक या बाबींची माहिती मिळविणे गरजेचे आहे. तसेच, महाराष्ट्राच्या या संदर्भातील आकडेवारीसंदर्भात मागील जनगणना अहवालातील महत्त्वाचे कल विचारात घेऊन त्याचे अचूक विश्लेषण अधिक नेमकेपणाने करण्याची आवश्यकता आहे. तसेच, या माहितीचे संकलन नोट्समध्ये केल्यास परीक्षेच्या अगोदर सरावासाठी अधिकाधिक लाभदायक ठरते.
अर्थातच, या सर्व लोकसंख्येच्या वैशिष्टय़ांच्या कलांचे (trends) विश्लेषण केल्यास या वैशिष्टय़ांमधील अलीकडील कालावधीतील बदलांच्या संदर्भातील शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांची आणि धोरणांची नेमकी माहिती मिळविणे गरजेचे आहे. उदा., भारतातील आणि विविध राज्यांतील घटत्या स्त्री-पुरुष प्रमाणाची स्थिती बिकट असून त्यासंदर्भातील केंद्र शासनाने आणि विविध राज्य शासनांनी राबविलेल्या धोरणांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. विशेषत महाराष्ट्र शासनाने त्यासंदर्भातील राबविलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांची परिपूर्ण माहिती मिळविणे आवश्यक आहे. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासंदर्भातील कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचे आकलन करणे त्यादृष्टीने उपयुक्त ठरते. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि त्या संस्थांचे त्या संदर्भातील कार्यक्रम यांची थोडक्यात माहिती मिळविणेदेखील परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. अर्थातच, या माहितीचे संकलन करताना परीक्षेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकसंख्या धोरण- २००० मधील महत्त्वाच्या घटकांचा आणि त्या धोरणामध्ये अंदाजित केलेल्या २०५०पर्यंत लोकसंख्येचे कल अधिक नेमकेपणाने अभ्यासण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या धोरणाद्वारे भारताच्या लोकसंख्या नियंत्रण कार्यक्रमातील महत्त्वाच्या शासकीय धोरणांची तयारीदेखील विद्यार्थ्यांनी करणे अवाश्यक आहे. अर्थातच, या घटकाच्या तयारीसाठी शासनाच्या वेबसाईटवरील संदर्भ खूपच उपयुक्त आहेत. त्याचबरोबर काही इंग्रजी संदर्भपुस्तकांचा अभ्याससुद्धा उपयुक्त ठरेल. उदा., INDIAN ECONOMY-Dutt Sundaram एन.सी.ई.आर.टी. ची अकरावी आणि बारावीची अर्थव्यवस्थेवरील पुस्तके इत्यादी.
लोकसांख्यिकी लाभांश (Demographic Dividend) सारख्या संकल्पनांचे आकलन करण्याबरोबरच या लोकसांख्यिकी लाभांशाचे भारताच्या दृष्टीने असलेले महत्त्व आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरील आणि समाजावरील प्रभाव याची तयारीदेखील विद्यार्थ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. लोकसांख्यिकी लाभांशासंदर्भातील महत्त्वाचे कल आणि त्याचा भारतावरील प्रभाव अभ्यासण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय तुलनात्मक विश्लेषणदेखील महत्त्वाचे आहे.
मानवी साधनसंपत्ती या संकल्पनेच्या आकलनाबरोबरच मानवी साधनसंपत्तीचे नियोजन आधुनिक समाजाच्या दृष्टीने कसे महत्त्वपूर्ण आहे याचे नेमकेपणाने आकलन करणे उपयुक्त ठरते. त्यासंदर्भातील सद्य:स्थितीतील विविध कलांचे विश्लेषण आवश्यक आहे. भारताच्या संदर्भातील मानवी साधनसंपत्तीच्या विकासाचे महत्त्व वस्तुनिष्ठरीत्या अभ्यासणे आवश्यक असून, त्यासाठी संदर्भपुस्तकांचा आधार घेणे आवश्यक ठरते. संदर्भपुस्तकांचा अभ्यास करताना परीक्षेचे स्वरूप विचारात घेऊन केलेली तयारी निश्चितच लाभदायक ठरेल.
मानवी साधनसंपत्तीच्या विकासातील शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्ये, आरोग्य यांसारख्या घटकाचे महत्त्व आणि भारतातील या घटकांची असलेली सद्य:स्थिती यांचे अचूक आकलन मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या घटकांचा परस्परसंबंध आणि या घटकांचे महत्त्व वस्तुनिष्ठरीत्या अभ्यासण्याची आवश्यकता आहे.
भारतातील रोजगाराची सद्य:स्थिती आणि कल यांचा मानवी साधनसंपत्तीच्या विकासाच्या अनुषंगाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. अर्थातच, रोजगारनिर्मितीशी आणि बेरोजगारीशी निगडित सर्व संकल्पनांचे अचूक आकलन आवश्यक ठरते. या सर्व संकल्पनांच्या संदर्भात वेळोवेळी करण्यात आलेल्या बदलांचा वेध घेणेही त्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतातील बेरोजगारीचे स्वरूप आणि कारणे यांची तयारी वस्तुनिष्ठ आणि सद्य:स्थितीतील संदर्भासह करणे महत्त्वाचे ठरते.
No comments:
Post a Comment