कैलास भालेकर, मंगळवार, १५ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com
शिक्षण हे मानव साधनसंपत्ती विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणाच्या विकासावर आणि उपलब्धतेवरच मानव साधनसंपत्तीचा विकास खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. भारताच्या मानव साधनसंपत्तीच्या विकासाच्या धोरणांमध्ये शिक्षणाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण या सर्व शिक्षण पद्धतींचा समावेश या घटकांतर्गत करण्यात आला आहे. सर्व टप्प्यांतील शिक्षणविषयक स्थितीचा अभ्यास महत्त्वाचा असून, भारताच्या विविध सर्वेक्षणाद्वारे केलेल्या पाहणींचा अभ्यास त्यासाठी महत्त्वाचा ठरतो. अशा प्रकारच्या पाहणींचे अहवाल शासन यंत्रणाद्वारे वेळोवेळी जाहीर केले जातात. तसेच काही स्वयंसेवी यंत्रणांद्वारेदेखील विविध पाहणी अहवाल जाहीर होतात. या अहवालातील महत्त्वाच्या कलांचे आणि आकडेवारीचे अवलोकन केल्यास या संदर्भातील शिक्षणविषयक भारतातील स्थितीचे आकलन शक्य होते.
पूर्व प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत कार्यरत असणाऱ्या शासनाच्या महत्त्वपूर्ण यंत्रणांची माहिती मिळविणेदेखील त्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. या सर्व यंत्रणांची कार्यपद्धती आणि सद्य:स्थितीशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची नेमकी तयारी या घटकाच्या अभ्यासाचा महत्त्वाचा भाग ठरतो. स्वातंत्र्योत्तर कालावधीत शिक्षणविषयक महत्त्वाच्या यंत्रणांच्या कामगिरीची नेमकी माहिती उपयुक्त ठरते.
प्राथमिक शिक्षण विकासाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यांचा आढावा त्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्कातील समावेश आणि शिक्षण हक्क कायदा २००९ यांचे नेमके आकलन महत्त्वाचे ठरते. शिक्षण हक्क कायद्यातील महत्त्वपूर्ण तरतुदींची तयारी करणे आवश्यक असून, या कायद्यासंदर्भातील सद्य:स्थितीतील घडामोडींचे आकलनदेखील उपयुक्त ठरेल. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासंदर्भातील विविध समस्यांची माहिती आवश्यक असून, या समस्या सोडविण्यासाठी शासनाने राबविलेल्या विविध कार्यक्रमांची नेमकी तयारी आवश्यक ठरते. विद्यार्थ्यांच्या गळतीविषयक समस्यांचे आणि त्यासंदर्भातील विविध सर्वेक्षणांची नेमकी माहिती अवगत करणे आवश्यक ठरते. तसेच शिक्षणविषयक राज्यघटनेतील तरतुदींचे नेमके आकलनदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासंदर्भात शासनाने राबविलेल्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांची तयारी आवश्यक ठरते. यासंदर्भातील केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या उपक्रमांचे आकलन आवश्यक ठरते. प्रज्ञाशोध परीक्षा, त्यांचे महत्त्व, स्वरूप यांची माहिती मिळविणे त्यासाठी आवश्यक ठरते. शिक्षण विभागाची वेबसाईट खूपच उपयुक्त ठरते. तसेच योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या शासनाच्या नियतकालिकांतील शिक्षणासंदर्भातील माहिती मिळविणे उपयुक्त ठरेल. यासाठी शिक्षणविषयक घटकाच्या तयारीसाठी सद्य:स्थितीतील संदर्भावर आणि कार्यक्रमावर अधिक भर देण्याची गरज असून, वृत्तपत्रांतील आणि नियतकालिकांतील त्यासंदर्भातील विविध लेख त्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात. वृत्तपत्रांतील शिक्षणविषयक माहितीची कात्रणे आणि नोट्स या विषयाच्या सखोल तयारीसाठी खूपच लाभदायक ठरतील.
सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा वंचित घटकांच्या शिक्षणासंदर्भातील समस्या आणि त्यासाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नेमके आकलन आवश्यक ठरते. मुलींच्या शिक्षणविषयक समस्या, अपंगांच्या शिक्षणविषयक समस्या, अल्पसंख्याक घटकांच्या शिक्षणविषयक समस्या अभ्यासणे आवश्यक असून, त्यासंदर्भातील शासनाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. या सर्व शासकीय धोरणांचा आणि आकडेवारींचा अभ्यास करताना राष्ट्रीय स्तरावरील माहितीबरोबरच महाराष्ट्र स्तरावरील माहितीचे अवलोकन महत्त्वाचे असून इतर राज्यांच्या संदर्भातील महाराष्ट्राच्या शिक्षणविषयक प्रगतीचा तुलनात्मक आढावा आवश्यक आहे. मानव विकास अहवालातील महत्त्वाच्या माहितीचा आधार घेणे महत्त्वाचे असून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील तुलनात्मक प्रगतीचा, क्रमांकाचा, निर्देशांकाचा वेध घेणे त्याद्वारे शक्य होते. या सर्व माहितीचे संकलन करताना परीक्षेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच ही सर्व माहिती नोट्सच्या स्वरूपात संकलित केल्यास अभ्यास अधिक सुलभरीत्या करणे शक्य होते.
शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची आणि कार्यक्रमांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते, तसेच स्वयंसेवी संस्थांद्वारे शिक्षणविषयक हक्कासंबंधी जागृतीसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण कार्याची माहिती उपयुक्त ठरते.
औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षणाच्या विविध महत्त्वपूर्ण कार्यक्रमांची माहिती आवश्यक ठरते. अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व आणि सद्य:स्थितीतील त्यासंदर्भातील महत्त्वाचे टप्पे यांचा वेध घेणे आवश्यक ठरते. प्रौढ शिक्षणविषयक कार्यक्रमांचा आढावा घेताना महत्त्वाच्या योजनांची तयारी गरजेची ठरते.
जागतिकीकरण आणि खासगीकरणाचा भारतीय शिक्षणावरील प्रभाव अभ्यासणे आवश्यक असून, त्यामुळे निर्माण झालेल्या संधी आणि आव्हानांचा नेमका वेध घेणे महत्त्वाचे ठरते. तसेच यासंदर्भातील शासनाच्या सद्य:स्थितीतील महत्त्वाच्या धोरणांची नेमकी माहिती मिळविणे आवश्यक ठरते. शासनाच्या नियामक यंत्रणा, नियमने, मूल्यांकन यंत्रणा यांची माहिती मिळवण्याबरोबरच या यंत्रणांच्या महत्त्वाच्या तरतुदी, या यंत्रणांची आवश्यकता आणि त्यांचा प्रभाव या बाबी अभ्यासणेदेखील महत्त्वाचे आहे.
ई-लर्निगसारख्या अलीकडे विकसित झालेल्या शिक्षणविषयक सुविधांचे महत्त्व, रचना, स्वरूप यांचे आकलन आवश्यक ठरते. ई-लर्निग सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावरील कार्यक्रमांची नेमकी माहिती मिळविणे उपयुक्त ठरते.
राष्ट्रीय ज्ञान आयोग, राष्ट्रीय उच्च शिक्षण आणि संशोधन आयोग, आय.आय.टी., आय.आय.एम., एन.आय.टी. या संस्थांची नेमकी माहिती आवश्यक ठरते. त्यासाठी या संस्थांच्या वेबसाईटवरील माहिती खूपच उपयुक्त ठरेल.
भारताच्या शिक्षणविषयक महत्त्वाचे टप्पे, कार्यक्रम आणि प्रगती यांचे आकलन हा या अभ्यासक्रमातील तयारीचा महत्त्वाचा भाग असून त्याची नेमकी तयारी आवश्यक ठरते.
No comments:
Post a Comment