Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-२

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - सामान्य अध्ययन-४. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास’ घटकाची तयारी-२



कैलास भालेकर - शुक्रवार, १ जून २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारताच्या अवकाश कार्यक्रमातील विविध टप्प्यांचे तंत्रज्ञानविषयक आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये होणाऱ्या अद्ययावत घडामोडींच्या आकलनावरदेखील भर द्यावा लागतो. कृत्रिम उपग्रहांची उभारणी, उपग्रह प्रक्षेपक तंत्रज्ञान आणि कृत्रिम उपग्रहांचे उपयोजन यामध्ये समाविष्ट होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक संकल्पना समजून घेऊन त्या संकल्पनांचे सद्य:स्थितीतील आकलन करणे आवश्यक ठरते. भारताच्या उपग्रह प्रक्षेपकांचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत.



(१) एस.एल.व्ही. -सॅटेलाईट लाँच व्हेईकल (उपग्रह प्रक्षेपक)
(२) ए.एस.एल.व्ही.-ऑगमेंटेड सॅटेलाईट लाँच व्हेईकल (अधिक क्षमतेचा उपग्रह प्रक्षेपक)
(३) पी.एस.एल.व्ही.    -पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक)
(४) जी.एस.एल.व्ही.- जिओस्टेशनरी लाँच व्हेईकल (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक)
या सर्व प्रक्षेपकांचे वस्तुनिष्ठ आकलन महत्त्वाचे आहे. या सर्व प्रक्षेपकांमध्ये किती आणि कोणते टप्पे आहेत? या प्रक्षेपकांच्या यशस्वी चाचण्या कधी झाल्या? या प्रक्षेपकांद्वारे प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या उपग्रहांच्या कक्षा कोणत्या आहेत आणि या कक्षा कशा प्रकारच्या आहेत? या सर्व बाबींचे आकलन या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा भाग आहे. या मूलभूत संकल्पनांचे आकलन करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान विषयातील संदर्भ पुस्तकाचा अभ्यास करावा लागतो. तसेच, इंडिया इयर बुक, भारतीय अवकाश संशोधन संस्था (करफड) या संस्थेच्या वेबसाईटवरील अद्ययावत माहितीचे संकलन करणे या घटकाच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. भारताने धुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने इतर राष्ट्रांच्या उपग्रहांचेदेखील प्रक्षेपण केले असून, या सर्व बाबींचे अद्ययावत संकलनदेखील आवश्यक ठरते.
अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांची आणि यंत्रणांची अचूक आणि नेमकी माहिती मिळविणे गरजेचे असून या सर्व संस्थांचे मुख्यालय, संस्थांची महत्त्वाची काय्रे आणि सद्य:स्थितीतील संस्थांशी निगडित महत्त्वाच्या घडामोडी या बाबींच्या तयारीवर भर द्यावा लागतो. कृत्रिम उपग्रहांचे उपयोजन हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असून रिसोर्स सॅट, कार्टेसॅट आणि ओशनसॅट यांसारख्या दूरसंवेदी उपग्रहांच्या तंत्रज्ञानविषयक आणि उपयोजनविषयक बाबींच्या आकलनावर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. दूरसंवेदी उपग्रहांचे आपत्ती व्यवस्थापनासाठीचे उपयोजन आणि त्याचा सद्य:स्थितीतील संदर्भ अभ्यासणे फायदेशीर ठरेल.
भारताच्या खनिज संपत्तीचा विकासाच्या दृष्टीने दूरसंवेदी उपग्रहांचे उपयोजन महत्त्वाचे आहे. भारताच्या भूमी उपयोजनाच्या संदर्भातील अचूक आणि अद्ययावत माहिती मिळविण्यासाठी देखील दूरसंवेदी उपग्रहांचे उपयोजन महत्त्वपूर्ण ठरते. ‘ओशन सॅट’ हा सागरी संशोधनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा दूरसंवेदी उपग्रह असून मत्स्यविकासासाठी ओशन सॅटचे महत्त्व अभ्यासणे गरजेचे ठरते.
नागरी नियोजनाच्या दृष्टीने ‘कार्टेसॅट’ हा उपग्रह महत्त्वपूर्ण असून, अचूक आणि अद्ययावत नकाशे कार्टेसॅट या दूरसंवेदी उपग्रहाद्वारे उपलब्ध होतात. भारताच्या प्राकृतिक रचनेचे अचूक आणि अद्ययावत नकाशे मिळविण्यासाठी कार्टेसॅट हा महत्त्वाचा उपग्रह आहे. राष्ट्रीय दूरसंवेदी यंत्रणा ही दूरसंवेदी उपग्रहांच्या माहितीच्या उपयोजन करण्यासाठी कार्यरत असणारी यंत्रणा असून या यंत्रणेच्या कार्यपद्धतीविषयक माहिती उपयुक्त ठरेल.
‘इन्सॅट’ हा भारताच्या अवकाश कार्यक्रमातील महत्त्वाचा टप्पा असून, ‘इन्सॅट’ उपग्रहांचे उपयोजन बहुद्देशीय आहे. भारताच्या दूरचित्रवाणी आणि दूरसंचार प्रगतीमध्ये ‘इन्सॅट’ प्रणालीचे महत्त्वाचे योगदान आहे. इन्सॅट उपग्रहांच्या श्रेणींची माहितीदेखील आवश्यक ठरते. इन्सॅट प्रणालीशी निगडित असणाऱ्या मूलभूत तंत्रज्ञानविषयक संकल्पनांचे आकलन अद्ययावत संदर्भासह करण्याची आवश्यकता आहे.
‘एज्युसॅट’ हा शिक्षणविषयक उपग्रह असून दूरशिक्षणाच्या सुविधांची उपलब्धता वाढविण्यासाठी ‘एज्युसॅट’ हा उपग्रह महत्त्वपूर्ण ठरतो. टेलिमेडिसीनद्वारे दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करणे इन्सॅट उपग्रहांद्वारे शक्य झाले आहे. हवामानविषयक माहिती उपलब्ध करण्यासाठीदेखील इन्सॅट उपग्रह महत्त्वाचे आहेत. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी हवामान अंदाज महत्त्वाचे आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी देखील हवामान अंदाज महत्त्वाचे ठरतात. या सर्व बाबींची तंत्रज्ञानविषयक आणि उपयोजनविषयक माहितीचे संकलन उपयुक्त ठरेल.
‘स्थाननिश्चिती’साठी ग्लोबल पोझिशिनग सिस्टिम (जीपीएस)प्रणालीचे उपयोजन केले जाते. पर्वतीय प्रदेश, जंगल क्षेत्र, सागरी क्षेत्र, वाळवंटी क्षेत्र या ठिकाणी स्थाननिश्चिती जीपीएस प्रणालीद्वारे केल्यास अचूक स्थाननिश्चिती करणे शक्य होते. तसेच आपत्ती व्यवस्थापन, संरक्षण क्षेत्र, वाहतूक क्षेत्र यामध्ये जीपीएस प्रणाली महत्त्वाची असून त्यासंदर्भातील तंत्रज्ञानविषयक संकल्पनांचे आणि उपयोजनांचे आकलन आवश्यक आहे.
भौगोलिक माहिती पद्धती (जीआयएस) प्रणालींचा समावेशदेखील अवकाश तंत्रज्ञान उपघटकामध्ये करण्यात आला असून जीआयएस प्रणालीची मूलभूत माहिती आणि उपयोजन या बाबींची तयारी या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. ‘अवकाश तंत्रज्ञान विकास’ या उपघटकाची तयारी करण्यासाठी मूलभूत संकल्पनांच्या आकलनाबरोबरच अद्ययावत घडामोडींची माहिती आवश्यक ठरते.

No comments: