Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल

डॉ.अमर जगताप, गुरुवार, १९ एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

jagtapay@gmail.com
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी आपण मागील दोन लेखांमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. आता आपण सामान्य अध्ययन १ मधील भूगोलात समाविष्ट असणाऱ्या सर्व अभ्यास घटकांचे स्वरूप, त्यासाठी वाचावयाची संदर्भपुस्तके आणि अभ्यासाची रणनीती यासंबंधी जाणून घेणार आहोत. सामान्य अध्ययन -१ मधील भूगोल या घटकात घटक क्र. २.१ ‘प्राकृतिक भूगोल’ आणि घटक क्र. २.२ ‘महाराष्ट्राचा  आर्थिक भूगोल’ असा अभ्यासक्रम समाविष्ट केला आहे, हे याआधी पाहिलेच आहे. प्राकृतिक भूगोल हा घटक भूगोलाचा गाभा समजला जातो. या विषयातील सर्व मूलभूत संकल्पना प्राकृतिक भूगोलात समाविष्ट होतात. थोडक्यात, हा घटक पूर्णत: संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. तसेच, आयोगाने अत्यंत हुशारीने संकल्पनात्मक बाबींबरोबरच उपयोजित घटक आणि चालू घडामोडींचा देखील समावेश केला आहे. या घटकात पृथ्वीचे अंतरंग, त्याची रचना आणि प्राकृतिक स्थिती; विविध भूरूपे आणि त्यांचा विकास नियंत्रित करणारे घटक, विविध कारकांशी संबंधित भूरूपे, भूरूप चक्राची संकल्पना, उपखंडाची उत्क्रांती इ. घटक संकल्पनात्मक पायावर आधारित आहेत. 
भारताची व महाराष्ट्राची भूरूपशास्त्रीय रचना हा घटक बहतांश प्रमाणात उपयोजनात्मक स्वरूपाचा आहे. कारण, अभ्यसाक्रमात या घटकाशी संबंधी ‘पूर समस्या’ हा घटक जाणीवपूर्वक समाविष्ट केला आहे. स्वाभाविकच भारतीय तसेच महाराष्ट्राच्या पातळीवर अस्तित्वात असलेल्या पूरसमस्येचा सर्वागीण अभ्यास महत्त्वाचा ठरतो. पूरसमस्येचे स्वरूप, कारणे; पूरग्रस्तप्रदेश, घटकराज्ये; या समस्येचे विविध परिणाम आणि हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना अशा विविध अंगांनी पूरसमस्येचा अभ्यास करावा. नकाशा पुस्तकाचा वापर करून हा अभ्यास अधिकाधिक दृश्य आणि रसपूर्ण करण्यावर भर द्यावा. भारताचे भूसामारिक स्थान, शेजारील राष्ट्रे, िहदी महासागर, आशिया व जग या घटकांचा अभ्यास करताना ऐतिहासिक पाश्र्वभूमीबरोबरच समकालीन, वर्तमान घडामोडींचा संदर्भ मध्यवर्ती ठरतो. त्यामुळेच या संबंधी नुकत्याच घडलेल्या आणि सद्य:स्थितीतील घटना-घडामोडींचा  सखोल अभ्यास अत्यावश्यक ठरतो. 
प्राकृतिक भूगोलातील संकल्पनात्मक घटकांचा अभ्यास करताना मूळ संकल्पना समजावून घेणे आवश्यक आहे. संकल्पनेमधील सर्व बारकावे समजल्याशिवाय पुढे जाऊ नये. त्याकरिता प्रमाणित व दर्जेदार पुस्तके व मार्गदर्शन आवश्यक आहे. संकल्पनांचा अभ्यास करताना पाठांतराऐवजी समजून घेण्यावर म्हणजेच आकलनावर भर द्यावा. उदा. पृथ्वीच्या अंतरंगातील विविध स्तर समजून घेतांना त्याचे आधार, स्वरूप आणि वैशिष्टय़े असे वर्गीकरण करून सुलभ पद्धतीने अभ्यास करण्यावर भर द्यावा. तसेच त्या-त्या संकल्पनेसंबंधी इतर बाबी देखील समजून घ्याव्यात. उदा. पृथ्वीच्या अंतरंगाची रचना अभ्यासताना ‘पृथ्वीची निर्मिती कशी झाली?’ या प्रक्रियेचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. त्यानंतर पृथ्वीच्या अंतरंगाची माहिती प्राप्त करण्याकरिता ज्या स्रोतांचा वापर केला जातो, ज्या पद्धती वापरल्या जातात त्यांची माहिती घेणे आवश्यक आहे. या स्रोतांमध्ये भूकंप लहरी व ज्वालामुखी उद्रेकाचा समावेश होतो.
भारताच्या व महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेवर आधारित काही प्रश्न या घटकांवर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे देखील असतील. कारण या घटकांमध्ये बरीच सूक्ष्म माहिती दडलेली असते. ती सर्व माहिती तोंडपाठ असणे आवश्यक आहे. केवळ एवढेच नव्हे, तर या प्राकृतिक रचनेचा अभ्यास नकाशासहित करणे आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ माहिती संकलित करताना विद्यार्थ्यांनी प्रमाणित पुस्तके वाचून टिपणांच्या स्वरु पात नोट्स काढाव्यात. अधिकाधिक माहिती अत्यंत मोजक्या स्वरूपात लिहून काढावी आणि त्याची वारंवार उजळणी करावी.
भारताचे भूसामरिक महत्त्व या घटकावर चालू घडामोडीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. सद्य:स्थितीत चर्चेत असणाऱ्या कळीच्या मुद्यांविषयी सखोल माहिती प्राप्त करणे महत्त्वाचे ठरते. उदा. भारत-पाक सीमा प्रश्नासंदर्भात एल.ओ.सी., एल.ओ.ए.सी. आणि आंतरराष्ट्रीय सीमा या तीन घटकांमधील फरक माहीत असणे आवश्यक आहे. ‘सर क्रीक’ प्रश्न काय आहे? ‘मॅकमोहन रेषा’ हा भारत-चीन सीमेचा कोणता भाग आहे? चीनची भारताच्या संदर्भात ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल थिअरी’ काय आहे? या स्वरूपाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ऐतिहासिक पाश्र्वभूमीबरोबरच चालू घडामोडींचाही अभ्यास अत्यावश्यक ठरतो. त्यासाठी वृत्तपत्रे, मासिके याद्वारे अद्ययावत ज्ञान संकलित करावे.  
महाराष्ट्राच्या आर्थिक भूगोलात खनिज व ऊर्जा साधन संपत्ती, पर्यटन व पर्यावरणासंबंधी वस्तुनिष्ठ माहितीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्यामुळे खनिज व ऊर्जा संसाधनांचे स्रोत प्रदेश, राज्यनिहाय साठे व उत्पादनांचा क्रम, उत्पादनातील चढउतार, त्यावर आधारित प्रकल्प, आयात व निर्यात याबद्दलची वस्तुनिष्ठ व अद्ययावत माहिती गोळा करून तिचे पाठांतर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संसाधनांच्या साठय़ांची नकाशाधारित माहिती संकलित करावी. त्याचप्रमाणे संसाधनांच्या उत्खननामध्ये गुंतलेल्या सार्वजनिक, खासगी कंपन्यांची माहिती महत्त्वाची ठरते. या घटकात पर्यटन हा मुद्दादेखील समाविष्ट करण्यात आला आहे. २१ व्या शतकात, जागतिकीकरणाच्या अंमलबजावणीनंतर भारतात पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला आहे. परकीय चलनप्राप्तीचा तो एक खात्रीलायक मार्ग ठरला आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्याने पर्यटन, विशेषत: परकीय पर्यटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न आपल्याला माहीत असणे आवश्यक आहेत; विशेषत: महाराष्ट्राचे! राज्यांचे पर्यटन राजदूत, राज्यांची पर्यटन घोषवाक्ये, पर्यटनासंबंधी प्रकल्प व योजना; महत्त्वाची ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची ठिकाणे,किल्ले, निसर्ग पर्यटन स्थळे आणि भारताच्या वाढत्या वैद्यकीय पर्यटनाची माहिती आवश्यक आहे.
आर्थिक भूगोलाच्या अभ्यासक्रमात पर्यावरणाचाही समावेश केला आहे. त्या घटकांचा अर्थ समजावून घेऊन त्याविषयक वस्तुनिष्ठ माहिती लक्षात ठेवावी. विशेषत: महाराष्ट्रातील अभयारण्ये, व्याघ्रप्रकल्प इ. थोडक्यात, भूगोलाच्या अभ्यासक्रमातील २.१ प्राकृतिक भूगोल आणि २.२ महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल या घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक उपघटकाच्या स्वरूपानुसार रणनीती निश्चित करून योग्य दिशेने अभ्यास करावा. या अभ्यासासाठी ५ वी ते १० वी इयत्तेची महाराष्ट्र बोर्डाची भूगोल विषयाची पुस्तके; एनसीईआरटीची ५ वी ते १२ वी पर्यंतची पुस्तके; भूगोलाची मूलतत्त्वे खंड १,  भारताचा भूगोल,  महाराष्ट्राचा भूगोल ही सवदी लिखित व संपादित पुस्तके; महाराष्ट्र वार्षिकीतील भूगोल, ज्यात प्राकृतिक भूगोलाबरोबरच पर्यावरण (राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, व्याघ्रप्रकल्प; इ.) पर्यटन स्थळे, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळे, या प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करावा. भूगोलाच्या बाबतीत आणखी एक बाब म्हणजे नकाशा पुस्तकाचा नियमित वापर. अशारीतीने अभ्यासक्रमातील मूलभूत संकल्पना, उपयोजित बाबी, विविध समस्यांवर मात करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना आणि अभ्यासक्रमातील घटकासंबंधी भोवताली घडणाऱ्या चालू घडामोडी. अशा विविध आयामांना लक्षात घेऊन समावेशक अभ्यास केल्यास अधिकाधिक गुण प्राप्त करता येतील.   

No comments: