Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मृदा व जलव्यवस्थापनाची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मृदा व जलव्यवस्थापनाची तयारी


डॉ.अमर जगताप - मंगळवार, २४ एप्रिल २०१२
प्राध्यापक,  द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

jagtapay@gmail.com
altआयोगाने भूगोलाच्या अभ्यासक्रमातील भूगोल व कृषी या विभागाच्या शेवटच्या दोन पायाभूत घटकांमध्ये ‘मृदा’ व ‘जलव्यवस्थापन’  यांचा समावेश केला आहे. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने मृदा व जल हे दोन्ही घटक पायाभूत आहेत. आयोगाने मृदा  (घटक ३.३) या घटकामध्ये मृदाविषयक सर्व माहिती सामाविष्ट केली आहे.
त्याचबरोबर मानवी हस्तक्षेपामुळे आणि चुकीच्या शेतीपद्धतीमुळे झालेला मृदेचा ऱ्हास हे प्रकरणही अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. सद्यस्थितीत मृदा धूप व ऱ्हास ही कृषी क्षेत्रासमोरील ज्वलंत समस्या आहे. त्यामुळे त्यावर जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. मृदा या घटकामध्ये संकल्पनात्मक मुद्दे समाविष्ट नसून बहुतांश मुद्दे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वारंवार वाचन, पाठांतरावर भर द्यावा लागणार आहे. मृदा घटकाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सवदीच्या ‘भूगोलाची मूलतत्त्वे खंड-१’ या पुस्तकामधील जैवभूगोल घटक आणि डॉ. साबळे यांच्या ‘कृषी घटक’ पुस्तकातील मृदा प्रकरण मोलाची मदत करेल. मृदा घटकाचा अभ्यास करताना सर्वप्रथम मृदेची वैशिष्टय़े अभ्यासावी लागतील. त्याकरिता शालेय पातळीवरील भौतिकशास्त्र व विशेषत: रसायनशास्त्राची सामान्य माहिती असावी लागते. ती माहिती असल्यास मृदेची वैशिष्टय़े सहज समजतात. त्यानंतर मृदा निर्मितीची प्रक्रिया व त्यावर परिणाम करणारे घटक यांचा अभ्यास करावा. तो अभ्यास करताना निर्मिती प्रक्रियेतील विविध टप्पे आणि त्यावर परिणाम करणारे घटक वर्गीकृत करून अभ्यासावेत. त्यापुढे येणारा मुद्दा म्हणजे वनस्पतींना उपयुक्त असणारे मृदेतील घटक होय. त्यांची वनस्पतींच्या (पिकांच्या) वाढीतील भूमिका काय? त्यांच्या कमतरतेमुळे वनस्पतींवर कोणते विपरीत परिणाम होतात? त्या परिणामांची लक्षणे कोणती? याची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी. या घटकातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘मृदा समस्या व त्यावरील उपाय’ हा आहे. कारण देशात आणि महाराष्ट्रात, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात प्रकर्षांने मानवी चुकांमळे अनेक प्रकारच्या समस्याग्रस्त मृदा निर्माण झाल्या आहेत. त्याचा थेट परिणाम कृषी क्षेत्राच्या उत्पादनावर होतो. तसेच सर्वत्र आढळणारी आणखी एक समस्या म्हणजे मृदा धूप होय. मृदा धूप म्हणजे काय? त्याची कारणे, परिणाम विशेषत: महाराष्ट्रासंदर्भात अभ्यासणे आवश्यक आहे. मृदा धूप प्रवण क्षेत्रामध्ये विशेषत: डोंगराळ प्रदेश, दऱ्या इ. क्षेत्रात होणारी मृदा धूप, त्यावर परिणाम करणारे घटक, त्यांची प्रक्रिया याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
या सर्व मृदा समस्यांवरील उपाय म्हणजे मृदा संवर्धन होय. त्यादृष्टीने मृदा संवर्धनाच्या विविध पद्धती व त्यांचे स्वरूप याचा सविस्तर अभ्यास करणे आवश्यक आहे. या घटकाच्या अभ्यासक्रमामध्ये आयोगाने भारत व महाराष्ट्रातील मृदा प्रकार हा मुद्दा समाविष्ट केलेला नाही. तथापि विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना भारत व महाराष्ट्रातील मृदा प्रकार, त्यांची वैशिष्टय़े व त्यांचे वितरण याचा नकाशासह अभ्यास करावा.
अभ्यासक्रमाच्या शेवटच्या घटकामध्ये जल व्यवस्थापनाचा (घटक ३.४) समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीतील पाणी टंचाई, अनियमित पर्जन्यमान; वाढत्या लोकसंख्येची, उद्योगांची पाण्याची वाढती गरज या अनुषंगाने हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. पाणी या मौल्यवान संसाधनाच्या संवर्धनाची नितांत आवश्यकता २१ व्या शतकामध्ये भासत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जल संवर्धनाच्या विविध पद्धतींचा अभ्यास केला पाहिजे. त्याकरिता केंद्र व राज्य शासनाने आखलेल्या योजनांचा अभ्यास आवश्यक आहे. पाण्याचा सर्वात महत्त्वाचा उपयोग पिण्यासाठी आहे. पण देशात जलप्रदूषण वाढत आहे. त्यामुळे अलीकडे पुढे आलेली ‘पाण्याच्या दर्जाची मानके’  (हं३ी१ ०४ं’्र३८ २३ंल्लिं१२ि) ही  संकल्पना काय आहे? भारतातील व आंतरराष्ट्रीय मानके काय आहेत? याचा तुलनात्मक अभ्यास करणे आवश्यक आहे. भारतातील पृष्ठीय जलाचे वितरण विषम आहे. उत्तर भारतामध्ये अतिरिक्त पाणी असून दक्षिण भारतामध्ये पाणी टंचाई जाणवते. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘नदी जोड योजना’ आखली होती. मात्र पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम ध्यानात घेता सरकारने ती योजना रद्द केली. मात्र काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने ती योजना कार्यान्वित करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. त्यामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकल्पाचे पर्यावरण, परिसंस्था, आर्थिक, सामाजिक, राजकीय पातळीवर होणारे सर्व परिणाम विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यासले पाहिजेत. या योजनेचे स्वरूप काय आहे? कोणत्या नद्या कुठे जोडल्या जाणार आहेत? याची नकाशासह माहिती आवश्यक आहे. या संदर्भात पथदर्शक ठरलेल्या उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्य़ात लघु पातळीवर राबविलेल्या नदी जोड प्रकल्पाचे स्वरूप व यशापयश याचाही विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. पाण्याचे मूल्य लक्षात घेता पावसाच्या पाण्याचा पूर्णत: वापर करण्यासाठी ते पाणी जास्तीत जास्त साठविले पाहिजे. त्याच्या विविध परंपरागत व आधुनिक पद्धती कोणत्या? त्यांचा अभ्यास करावा. पृष्ठीय जलाप्रमाणेच भूजलदेखील उपयुक्त आहे. त्याचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. जल संवर्धनासाठी पाणलोट क्षेत्र संकल्पना महत्त्वाची आहे. पाणलोट क्षेत्राचा अर्थ समजावून घेऊन पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाची पद्धती सविस्तर अभ्यासणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणलोट क्षेत्र विकासाच्या सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा. भारतातील बहुतांश कृषी क्षेत्र कोरडवाहू क्षेत्रात मोडते. कोरडवाहू शेती म्हणजे काय? तिच्या समस्या व उपाय विद्यार्थ्यांनी अभ्यासावेत. त्या संदर्भातील शासनाच्या योजनांचा अभ्यास करावा. जलसिंचन करताना वाया जाणारे पाणी वाचविण्याच्या विविध पद्धती कोणत्या? त्या दृष्टिकोनातून विकसीत झालेल्या आधुनिक जलसिंचन पद्धती-ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. त्याचप्रमाणे पाणथळ जमिनीतील जलनि:सारणाचे उपाय अभ्यासावेत. त्याचप्रमाणे जलप्रदूषणाचा विशेषत: उद्योगांमधून सोडलेल्या प्रदूषकांचा पाणी, मृदा व पिके यावर होणारा विपरीत परिणाम अभ्यासणे गरजेचे आहे. थोडक्यात जल व मृदा यांच्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व मुद्दय़ांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. प्रस्तुत घटकांसाठी ‘इंडिया इयर बुक’, ‘महाराष्ट्र वार्षिकी-२०१२’, या वार्षिकी; योजना, कुरुक्षेत्र आणि लोकराज्य ही मासिके आणि वर्तमानपत्रात नियमितपणे लिहिली जाणारी या विषयावरील सदरे व लेख या संदर्भस्रोतांचा अवलंब करावा.

No comments: