Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : अनिवार्य इंग्रजी- व्यक्त होण्याची संधी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : अनिवार्य इंग्रजी- व्यक्त होण्याची संधी

मंगळवार, ३ एप्रिल २०१२
altराज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाप्रमाणे अनिवार्य इंग्रजी हा विषय आता २०० गुणांऐवजी १०० गुणांसाठी असणार आहे. आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे इंग्रजी विषयाच्या अभ्यासक्रमात कोणताही मोठा बदल नाही. एकूण सात उपविभाग आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. (१) निबंधलेखन- दिलेल्या विषयावर उमेदवारांनी साधारणत ३०० शब्दांमध्ये निबंध लिहिणे अपेक्षित आहे. यामधून खालील गोष्टी पडताळून पाहण्यात येणार आहेत-
(अ) उमेदवाराचे विषयाबद्दलचे ज्ञान. (ब) सादरीकरण. (क) इंग्रजी भाषेचा उपयोग करण्याची क्षमता.
यामधून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्याप्रकारे इंग्रजी भाषेच्या अचूक वापरावर भर दिला आहे, तितकेच विषयाबद्दलच्या ज्ञानावर आणि समतोल विचारपद्धतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तेव्हा सामान्य अध्ययनाच्या तयारीची इथे गरज भासणार आहे. जोडीला मुद्देसूद आणि स्पष्ट अशा स्वरूपाचे सादरीकरण हे उमेदवारांसाठी चांगल्या रीतीने व्यक्त होण्याकरिता आवश्यक आहे. Global Warming, Accidents and Growing Traffic, Save the Forests, Save the Baby Girl, My Favourite Movie, India of My Dreams अशा प्रकारच्या, उमेदवाराची आपल्या परिसरविषयाची सजगता पडताळणाऱ्या, विषयांचा अंतर्भाव असेल.
(२) पत्रलेखन- उमेदवारांनी एक औपचारिक आणि एक अनौपचारिक अशी २ पत्रे लिहिणे अपेक्षित आहे. साधारण प्रत्येक पत्र १०० शब्दांचे असणे आवश्यक आहे. खालील मुद्यांवर यामध्ये भर दिला जाईल-
(अ) विषय मांडण्यासाठी वापरलेले मुद्दे. (ब) सादरीकरण. (क)    पत्रलेखनाच्या ठराविक साच्याबद्दल जागरूकता आणि वापर.
(३) संवादकौशल्य-  या घटकामध्ये साधारणत १००-१५० शब्दांमध्ये उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. यामध्ये संवादाची वेगवेगळी माध्यमे हाताळण्याची उमेदवाराची क्षमता तपासली जाते. जसे की सूचना लिहिणे, दोन व्यक्तींमधील संवाद लिहिणे, एखाद्या कार्यक्रमाची माहिती देणारा सारांश लिहिणे, गटचर्चा अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. 
(४) एकतृतीयांश सारांश सुमारे ३०० शब्दांच्या उताऱ्याचा एकतृतीयांश म्हणजेच १०० शब्दांमध्ये सारांश लिहिणे यामध्ये अपेक्षित आहे. यामध्ये उमेदवाराची आधी कधीही न वाचलेला उतारा वाचून समजून घेणे, त्याचे अवलोकन करून त्याच विषयाची स्वत:च्या व कमी शब्दांत पुन्हा मांडणी करण्याचे कौशल्य तपासले जाते. 
(५) उताऱ्यावरील प्रश्न- यामध्ये उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित आहे. इंग्रजी भाषा तसेच विषय समजून घेण्याची कुवत याची पडताळणी यातून केली जाते.
(६) उताऱ्याची मुद्देसूद रचना - याला आपण इंग्रजीमध्ये Paraphrasing  म्हणून ओळखतो. साधारण ३०० शब्दांचा उतारा समजून घेऊन स्वत:च्या शब्दांत, सुटसुटीतपणे आणि सोप्या भाषेत उताऱ्यातील मुद्दे लिहिणे याचा यात समावेश आहे.
(७) व्याकरण-  यामध्ये शालेय स्तरावरील इंग्रजी भाषा व्याकरण तपासले जाते. जसे, की वाक्यातील चुका सुधारणे, वाक्प्रचार वाक्यात वापरणे, काळांची माहिती, शुद्धलेखनाचे नियम वापरता येणे इ. 
या सर्व उपविभागांमधून एक गोष्ट ठळकपणे पुढे येते, ती म्हणजे राज्यसेवा आयोगाने कोणतीही अवास्तव अपेक्षा विद्यार्थ्यांवर लादली नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सनदी सेवांमध्ये अधिकारी म्हणून काम करताना कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल व तसे करताना आवश्यक इतके भाषेचे ज्ञान त्यांना आहे का, हे यामधून तपासले जाणार आहे. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील या पेपरचे कोणतेही दडपण घेण्याची गरज नाही.
ज्या विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवा आयोगाची परीक्षा देणे हे अंतिम ध्येय आहे, त्यांनी इंग्रजी पेपरबाबत भीती बाळगण्याची काहीच गरज नाही. याचे एक महत्त्वाचे कारण असे, की जो पेशा किंवा कामाचे क्षेत्र आपण स्वत:हून निवडले आहे, त्यासाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करणे हा ते ध्येय गाठण्यामधील अपरिहार्य टप्पा आहे. इंग्रजी भाषेबद्दलची किमान माहिती व विविध स्तरांवरील, विविध व्यक्तींशी संवाद साधता येण्यासाठी त्याचा वापर करता येणे ही बाब चांगला सनदी अधिकारी बनण्यासाठी अधोरेखित करावी अशीच आहे. त्यामुळे या विषयाचे कोणतेही दडपण न घेता त्याचा सखोल व बारकाईने अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आणि फायद्याचे आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंग्रजी विषयाच्या माध्यमातून स्वयंसिद्ध व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आपण मुख्य परीक्षेतील या घटकाबद्दल अधिक विवेचन पुढील लेखांमधून करणार आहोत. त्यात सातही विभागांचा स्वतंत्र आढावा, प्रश्नप्रकार, जास्त गुण मिळवून देणाऱ्या प्रश्नप्रकारांचा सराव अशा गोष्टींचा समावेश असेल. अनिवार्य इंग्रजी (आणि मराठीदेखील) पेपरकडे बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असा, की भाषेचे पेपर वगळता इतर ४ पेपर हे बहुपर्यायी प्रश्नपद्धतीचे असणार आहेत. त्यामुळे या भाषांच्या पेपरमधूनच विद्यार्थ्यांना व्यक्त होता येणार आहे. त्यामुळे भाषा हा अडसर न मानता उलट स्वत:च्या व्यक्तिमत्त्वातील वेगळेपण आणि विचारांची खोली दाखवण्याची संधी म्हणून याकडे पाहायला हवे. या संधीचा फायदा कसा करून घेता येईल याविषयी विस्तृतपणे चर्चा पुढील लेखामध्ये! 
अपर्णा दीक्षित, सुश्रुत रवीश
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

dixitaparna1@gmail.com
sushruth.ravish@gmail.com

No comments: