‘एमपीएससी’चा राजमार्ग - पूर्वपरीक्षा : पूर्वपरीक्षेचा अभ्यास व वेळेचे नियोजन
तुकाराम जाधव ,बुधवार, २१ मार्च २०१२
संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com
पूर्वपरीक्षा हा राज्यसेवा परीक्षेतील पहिला टप्पा असल्याने या टप्प्याला सामोरे जाताना विद्यार्थ्यांने अभ्यासासंदर्भात अत्यंत नियोजनबद्ध राहणे गरजेचे आहे. पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमातील विविध घटक, प्रत्येक घटकात समाविष्ट प्रकरणे यांचा पद्धतशीर अभ्यास महत्त्वाचा ठरतो. परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याबरोबरच परीक्षाभिमुख आणि सोयीस्कर असे अभ्यासाचे वेळापत्रक करून त्या वेळापत्रकाची परिणामकारक अंमलबजावणी करणे अत्यावश्यक ठरते. नियोजनबद्ध अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होण्याबरोबरच अभ्यासाचे स्वयंमूल्यमापन करणेदेखील शक्य होते. म्हणूनच वेळेचे नियोजन हा पूर्वपरीक्षेतील कळीचा मुद्दा ठरतो.
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करताना पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम त्यातील प्रत्येक घटकाला विभागून दिलेले गुण आणि मागील मागील दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे गरजेचे ठरते. त्याद्वारे प्रत्येक अभ्यास घटकाचे स्वरूप, व्याप्ती आणि परीक्षेतील महत्त्व लक्षात घेता येते. अभ्यासक्रमातील कोणता घटक ओळखीचा आहे? कोणता घटक पूर्णत: नवीन आहे? यांसारख्या महत्त्वाच्या बाबी अधोरेखित करता येतात. या आधारे प्रत्येक घटकासाठी द्यावयाच्या वेळेचे योग्य नियोजन करता येते.
अभ्यास आणि वेळेचे नियोजन करताना प्रथमत: प्रत्येक घटकासाठी वाचावी लागणारी संदर्भपुस्तके माहीत असणे आवश्यक ठरते. कारण प्रत्येक घटकासाठी नेमका किती वेळ द्यायचा हे संदर्भपुस्तकांच्या यादीवरूनच ठरवता येते. साधारणत: दररोजचा, आठवडय़ाचा आणि नंतर महिन्याचा विचार करून उपलब्ध वेळेची अचूक आखणी करावी आणि अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकासाठी आणि त्यातील प्रत्येक उपघटकासाठी वेळ निश्चित करावी. काही वेळा कमी महत्त्वाच्या घटकासाठीदेखील बरीच संदर्भपुस्तके वाचावी लागतात. त्यासाठी तुलनात्मकदृष्टय़ा अधिक वेळ खर्ची करावा लागतो हे लक्षात घ्यावे.
पूर्वपरीक्षेच्या नियोजनासंदर्भातील प्राथमिक बाब म्हणून प्रत्येकाने हे लक्षात ठेवावे, की कोणत्याही नवख्या विद्यार्थ्यांला पूर्वपरीक्षेची तयारी करण्यासाठी साधारणत: साडेतीन ते चार महिन्यांचा कालावधी अत्यावश्यक ठरतो. या कालावधीत सहावी ते दहावी इयत्तेची इतिहास, भूगोल, विज्ञान, नागरिकशात्र, गणिताची क्रमिक पुस्तके, अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकावर वाचावयाची प्रमाणित संदर्भपुस्तके, वर्तमानपत्रे आणि मासिके या बाबींचे सविस्तर व सखोल वाचन करायचे आहे हे लक्षात ठेवावे. स्वाभाविकच पूर्वपरीक्षेपूर्वी प्रत्येक वाचनसाहित्याची किमान दोन वेळा उजळणी होईल याची खात्री बाळगावी. थोडक्यात, पूर्वपरीक्षेसाठी राखीव ठेवलेला चार महिन्यांचा कालावधी तीन टप्प्यांमध्ये विभागणी गरजेचे ठरते. यातील पहिल्या टप्प्याला म्हणजेच प्रथम वाचनाला अधिक वेळ लागणार. त्यानंतरच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांना म्हणजेच उजळण्यांना स्वाभाविकच कमी वेळ लागणार हे लक्षात घ्यावे. यातील पहिल्या टप्प्यात प्रत्येक घटकावरील संदर्भसाहित्य सखोल आणि सविस्तरपणे वाचण्यावर भर द्यावा. त्यातील मूलभूत संकल्पना, विचार, सिद्धान्त, समकालीन घडामोडी, आकडेवारी इ. सर्व आयामांना लक्षात घेण्यासाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे ठरते. म्हणूनच अनावश्यक घाई न करता प्रत्येक घटक समजून घेण्यावर या टप्प्यात भर द्यावा. त्यानंतर येणाऱ्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात महत्त्वाच्या आणि नेमक्या भागाचीच उजळणी करण्यावर लक्ष केंद्रित करावे. त्यादृष्टीने प्रत्येक घटकाच्या उजळणीचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करावे.
प्रत्येक घटकावरील संदर्भसाहित्य वाचताना त्यातील आकडेवारी, समकालीन घडामोडी, विसरू शकतील अशा काही तांत्रिक बाबी एकत्रित करून त्यांची पुन:पुन्हा उजळणी करण्यासाठी दिवसातील काही वेळ राखून ठेवावा. तसेच या बाबींची गटचर्चा करूनदेखील त्या लक्षात ठेवता येऊ शकतील. त्याचबरोबर गटचर्चा केल्याने प्रचलित घडामोडी, आकडेवारी, संस्था, काही विशिष्ट घटना या संदर्भातील माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. अर्थात, हे करीत असताना वेळेच्या काटेकोर नियोजनाचे पालन करणे गरजेचे आहे आणि वेळेचा अपव्यय होणार नाही याबाबतीत दक्ष राहणे आवश्यक ठरते.
आपल्या दैनंदिन वेळापत्रकात चालू घडामोडींच्या तयारीसाठी विशिष्ट वेळ राखीव ठेवणे अगत्याचे ठरते. या घटकाच्या तयारीसाठी किमान दोन वर्तमानपत्रे आणि काही मासिकांचे नियमित वाचन उपयुक्त ठरते. परंतु हे वाचन स्पर्धा परीक्षेतील अभ्यासक्रम डोळय़ांसमोर ठेवून केले पाहिजे. त्यासाठी दररोज साधारणत: दीड ते दोन तास वेळ राखून ठेवावा. वृत्तपत्रे, नियतकालिके यांचे वाचन करीत असतानाच त्यामधून उपयुक्त आणि महत्त्वाच्या माहितीचे संकलन नोट्सच्या स्वरूपात केल्यामुळे उजळणीसाठी या नोट्स खूपच उपयुक्त ठरतात. अभ्यास व वेळेच्या दैनंदिन चौकटीत बुद्धिमापन चाचणी हा घटकही महत्त्वाचा ठरतो. या घटकाचा सराव दररोज करणे आवश्यक असते. कारण सरावाद्वारेच या घटकावर प्रभुत्व मिळविता येते. या घटकावर दोनशे प्रश्नांपकी पन्नास प्रश्न विचारले जातात हे आपण जाणताच. बुद्धिमापन चाचणी हा घटक स्कोअिरग असून सरावाद्वारे या घटकामध्ये ४५पेक्षा अधिक गुण मिळविणे शक्य होते. त्याचबरोबर नियमित सरावाच्या साहाय्याने बुद्धिमापन घटकाचे प्रश्न सोडविण्यासाठी लागणारा कालावधी आणि अचूकता यामध्ये सुधारणा करणे शक्य होते. साधारणत: दररोज दीड ते दोन तास बुद्धिमापन चाचणीचा सराव गरजेचा ठरतो. अर्थातच, वेळोवेळी या घटकाचे सराव चाचणीद्वारा मूल्यमापन करणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच पूर्वपरीक्षेसाठी सराव चाचण्यादेखील महत्त्वाच्या आहेत. वस्तुत: एखाद्या घटकाचा अभ्यास झाल्यानंतर समांतरपणे त्यावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या सरावावर भर द्यावा. प्रारंभी घटकनिहाय, संमिश्र आणि संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर सर्वसमावेशक सराव चाचण्या द्याव्यात. सराव चाचण्यांची पद्धतशीररीत्या उकल केल्यास आपल्या तयारीची पातळी अचूकपणे ओळखता येते आणि त्यातून समोर आलेल्या उणिवांवर प्रभावीपणे मात करणे शक्य होते. म्हणूनच आपल्या वेळापत्रकात सरावचाचण्यांना विशिष्ट वेळ राखीव ठेवणे अत्यावश्यक ठरते. अशा रीतीने नियोजनबद्ध अभ्यास आणि निर्धारित नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करून पूर्वपरीक्षेचे शिखर यशस्वीरीत्या पार करता येईल!
No comments:
Post a Comment