Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी व्याकरणाची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी व्याकरणाची तयारी


मंगेश खराटे - सोमवार, २ एप्रिल २०१२
द युनिक अॅकॅडमी, पुणे.

mangeshkharate@gmail.com
alt
मराठी व्याकरणात शब्दांच्या जाती (शब्दांच्या जाती ओळखणे), वाक्यप्रकार (मिश्र, संयुक्त, साधे/केवल), काळ (वर्तमान, भूत, भविष्य), वाक्प्रचार व म्हणी, परिभाषिक शब्द (इंग्रजी परिभाषिक शब्दांना मराठी पर्यायी शब्द येणे) या घटकांचा समावेश होतो. यातील शब्दांच्या जाती या घटकाची तयारी करताना शब्दांच्या एकूण आठ जाती, त्यांचा अर्थ, परस्परांपासून असलेले भिन्नत्व, त्या त्या शब्दजातींची उदाहरणे आणि त्यांचा वाक्यातील प्रयोग या बाबींचे आकलन महत्त्वपूर्ण ठरते. ही तयारी सुलभ व्हावी यासाठी व्याकरणावरील पुस्तकाचा आधार घेऊन शब्दांच्या जातींचे कोष्टक तयार करावे आणि त्यात संपूर्ण माहिती भरावी. त्या त्या शब्दजातींचे उपप्रकार आणि त्यांची उदाहरणे लक्षात ठेवावीत. यासंदर्भात काही उदाहरणे लक्षात घेता येतात. शौर्य (भाववाचक नाम), राष्ट्र (सामान्य नाम), ज्याने (संबंधी सर्वनाम), हा (दर्शक सर्वनाम), पुणेरी (नामसाधित विशेषण), खाववते (शक्य क्रियापद), क्षणोक्षणी (कालवाचक क्रियाविशेषण अव्यय),अथवा (विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय), बापरे (आश्चर्यदर्शक केवलप्रयोगी अव्यय).
वाक्यप्रकार हा मराठी व्याकरणातील आणखी एक महत्त्वाचा घटक. प्रश्नपत्रिकेत एखादे वाक्य देऊन त्याचे विशिष्ट वाक्यप्रकारात रूपांतर करावे अशा आशयाचा प्रश्न विचारला जातो. उदा., ‘आम्हांला नेण्यासाठी जहाज आले. आम्ही वाचलो.’ (संयुक्त वाक्य करा.) याचे ‘आम्हांला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही वाचलो.’, असे संयुक्त वाक्य होईल. संयुक्त वाक्यात प्रधानसूचक उभयान्वयी अव्ययाने वाक्ये जोडलेली असतात. त्याचप्रमाणे ‘देशासाठी अवश्य त्याग करायला हवा.’ (प्रश्नार्थी वाक्य करा). ‘देशासाठी त्याग करायला नको का?’ असे होईल. मागील प्रश्नपत्रिकांचे पद्धतशीर अवलोकन करून वाक्याचे विविध प्रकार, त्यांची वैशिष्टय़, एखाद्या वाक्याचे दुसऱ्या प्रकारात रूपांतर करताना होणारे बदल इ. घटकांची माहिती असणे उपयुक्त ठरते. त्यासाठी वाक्य रूपांतरणाची उदाहरणे सोडविण्यावर भर द्यावा. 
काळ ओळखा हा व्याकरणातील पुढील प्रश्न. या घटकाच्या तयारीसाठी सातवी ते दहावी इयत्तेच्या मराठी पाठय़पुस्तकांचे बारकाईने वाचन करावे. मराठी व्याकरणावरील पुस्तकांचा अभ्यास करून काळ, प्रकार, उपप्रकार यांचा सर्वसमावेशक तक्ता तयार करावा. त्याचबरोबर एकच वाक्य विविध काळात रूपांतरित करून त्याचे नेमके आकलन करावे. यामुळे एखाद्या वाक्यात काळानुरूप करावयाचे बदल लक्षात घेता येतात. अर्थात यासाठी विपुल सरावाची गरज असते यात शंका नाही.
उदा., ‘सुरेश गीत गात असे.’ (अपूर्ण भविष्यकाळ करा.) येथे सुरेश गीत गात असेल हे उत्तर येईल. त्याचप्रमाणे ‘चिमणीने घरटे बांधले होते.’ (साधा वर्तमानकाळ करा.) चिमणी घरटे बांधते, असे वाक्य होईल. त्याचप्रमाणे ‘तेव्हा तू कोठे गेलास?’ (पूर्ण भूतकाळ करा.) या वाक्याचे ‘तेव्हा तू कोठे गेला होतास?’ असे वाक्य होईल.
व्याकरणातील आणखी एक प्रश्न म्हणजे वाक्प्रचाराचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा हा होय. उदा., मारुतीचे शेपूट-लांबत जाणारी बाब. या प्रश्नात प्रथमत वाक्प्रचाराचा अर्थ सांगावा लागतो आणि त्याचा वाक्यात प्रयोग करावा लागतो. उपरोक्त वाक्प्रचाराचा पुढीलप्रमाणे वाक्यात उपयोग करता येईल. ‘स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची यादी मारुतीच्या शेपटीप्रमाणे आहे, संपता संपत नाही.
वाक्प्रचाराबरोबरच म्हणींचा अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करा. असा ही प्रश्न समाविष्ट होतो. 
उदा., म्हण : काकडीची चोरी फाशीची शिक्षा.
अर्थ : छोटय़ा/क्षुल्लक कारणाचे भयंकर परिणाम होणे.
वाक्यात उपयोग : ‘रामू एक दिवस गैरहजर राहिला म्हणून मालकाने त्याला कामावरूनच काढून टाकले. काकडीची चोरी न फाशीची शिक्षा म्हणतात ते काही खोटे नाही.’ 
वाक्प्रचार आणि म्हणी यांचा अर्थ आणि वाक्यातील उपयोग या बाबींना प्रत्येक अर्धा गुण असतो. सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी वापरले जाणारे गाईड आणि मागील लेखात नमूद केलेली संदर्भपुस्तके यांच्या आधारे अधिकाधिक वाक्प्रचार आणि म्हणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि जाणीवपूर्वक त्याचा वाक्यात उपयोग करण्याची सवय विकसित करावी. शालेय क्रमिक पुस्तकांवर भर दिल्यास वाक्प्रचार, म्हणी अवघड जाणार नाहीत. त्यासाठी दहावी, अकरावी, बारावी महाराष्ट्र बोर्डची पुस्तके, सुगम मराठी व्याकरण व लेखन-मो. रा. वाळिंबे,  मराठी व्याकरण- चंद्रहास जोशी, व्यावहारिक मराठी- काळे, पुंडे या संदर्भपुस्तकांबरोबरच आपले चौफेर वाचनही महत्त्वाचे आहे. अशा रीतीने व्याकरणाची तयारी करण्यासाठी निर्धारित संदर्भपुस्तकांच्या आधारे प्रत्येक घटकाचा अर्थ, प्रकार, उदाहरणे आणि त्यांचे भाषिक उपयोजन या बाबी लक्षात घ्याव्यात. वाचन, आकलनाबरोबरच विविध घटकांचा नियमित सराव ही बाबही तेवढीच महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवावे. अशा रीतीने वाचन आणि नियमित सरावाच्या आधारे व्याकरणासाठी निर्धारित केलेल्या गुणांपैकी अधिकाधिक गुण प्राप्त करता येतील.

No comments: