शशिकांत बोराळकर,शनिवार, १० मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com
भारतीय समाजात कृषीचे स्थान अजूनही मध्यवर्ती आहे. कारण आजही सुमारे ५५ ते ६० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. म्हणून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग समजला जातो. कृषीचे हे महत्त्व ओळखूनच एमपीएससीने पूर्व परीक्षेत ‘कृषी घटकाचा’ एक स्वतंत्र घटक म्हणून ३० गुणांसाठी समावेश केला आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेतील अर्थव्यवस्था आणि भूगोल या पेपर्समध्येही कृषीसंबंधी प्रकरणाचा समावेश केला आहे. त्यामुळे पूर्व व मुख्य अशा दोन्ही परीक्षांसाठी या घटकाची तयारी आवश्यक ठरते.प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांना कृषीचे सर्वसामान्य ज्ञान असावे अशा पद्धतीने अभ्यासक्रमाची आखणी केलेली आहे. त्यामध्ये खालील मुद्यांचा समावेश होतो. (१) जमिनीचा वापर व प्रमुख पिके (२) जलसिंचनाची कामे व पद्धती. (३) पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय. (४) फलोत्पादन. (५) वनविकास आणि वनोत्पादने. (६) मत्स्यव्यवसाय. (७) कृषिअर्थशास्त्र. या प्रमुख विभागांत समाविष्ट केलेल्या घटक-उपघटकांची चर्चा करणे अत्यावश्यक ठरते. या चर्चेच्या आधारेच अभ्यासाची व्याप्ती आणि अभ्यासपद्धती या दोन्हींचे निर्धारण करता येते.
* जमिनीचा वापर व पिके- या घटकात जमिनीच्या वापराचे प्रकार, माती, तिचे भौतिक व रासायनिक गुणधर्म, तसेच त्याचा पिकांच्या वाढीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रमुख पिके, त्यांचे उत्पादन, विविध जाती, वापरली जाणारी सेंद्रिय व रासायनिक खते या घटकांचा अभ्यास करणे अपेक्षित असते. पिकांच्या बाबतीत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा रोख हा प्रामुख्याने नव्याने शोधलेल्या जातीवर असतो. एखाद्या जातीच्या वैशिष्टय़ांबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर त्या पिकाचे दरहेक्टरी उत्पादन, उत्पादनाखालील क्षेत्र, कोणत्या भागात उत्पादन घेतले जाते अशा प्रकारचेही प्रश्न विचारले जातात.
* जलसिंचन- यात जलसिंचनाचे प्रकार, त्यांचे फायदे व तोटे, विशिष्ट पद्धत कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे, त्याचबरोबर जलसिंचनासंबंधीचे महत्त्वाचे आयोग, त्यांचे निर्णय, जलतंटे, जलसिंचनासंबंधी अभ्यास करणाऱ्या संस्था यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
’ पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय- या घटकात प्रामुख्याने भारतातील व महाराष्ट्रातील पशूचे प्रमाण, त्यांची संख्या, उत्पादन यांचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर पशूंच्या देशी व विदेशी जाती, त्यांची वैशिष्टय़े, दुधाचे उत्पादन, त्यांचा उपयोग यावरही प्रश्न विचारले जातात. याव्यतिरिक्त कुक्कुटपालन, वराहपालन, ससेपालन हाही भाग महत्त्वाचा ठरतो. यात प्रामुख्याने आकडेवारीवर आधारित प्रश्न विचारले जातात. उदा. २००५-०६ साली महाराष्ट्रात अंडय़ांचे एकूण उत्पादन किती होते? हा प्रश्न.
अलीकडील प्रश्नपत्रिकांत जनावरांच्या पालनपोषणाविषयीही प्रश्न विचारलेले दिसून येतात. त्यांना किती खाद्य द्यावे, त्यांचे आजार, लसीकरण, घ्यावयाची काळजी याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त झाले आहे. याव्यतिरिक्त आपणास दुग्धव्यवसायाचा विकास करण्यासाठी शासनाने उचललेल्या उपायांचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. उदा., श्वेतक्रांतीची सुरुवात, कृत्रिम गर्भधारणा केंद्र, विविध योजना इ. घटक मध्यवर्ती ठरतात.
* फलोत्पादन- इतर घटकांप्रमाणे यात महाराष्ट्रातील फळपिके, त्यांच्या लागवडीखालील क्षेत्र, त्यांचे उत्पादन, त्यांची वैशिष्टय़े, कोणत्या वातावरणात, विभागात येतात, फळझाडांचे उगमस्थान, त्यांचे आजार, नवीन जाती व त्यांची वैशिष्टय़े, कोणी शोधल्या, यावर प्रश्न विचारले जातात. याबरोबरच भाजीपाला, त्यांचे उत्पादन यावरही प्रश्न विचारले जातात. स्वाभाविकच या सर्व बाबींची नेमकी व अद्ययावत माहिती संकलित करणे महत्त्वाचे ठरते.
* वनविकास- यात प्रामुख्याने भारतातील तसेच महाराष्ट्रातील वनांचे प्रकार, त्याखालील क्षेत्र, त्यासाठी आवश्यक असणारे पर्जन्य यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त वनविषयक धोरण, वेगवेगळय़ा पंचवार्षिक योजनेतील उद्दिष्टे, वनांचा अभ्यास करणाऱ्या संस्था, शासनाने उचललेली पावले, वेगवेगळय़ा योजना, पुरस्कार या अनुषंगाने अभ्यास करावा. त्याचबरोबर मानवाला वनापासून होणारा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा, झाडांची वैशिष्टय़े, नष्ट होणाऱ्या प्रजाती, त्याविषयक समस्या यांचाही अभ्यास करावा लागतो.
* मत्स्यव्यवसाय- या घटकात माशांच्या जाती, त्यांचे प्रमाण व ठिकाण, त्यांना पकडण्यासाठी वापरली जाणारी जाळी, माशांचे एकूण उत्पादन, भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर मत्स्यउत्पादन व निर्यातीतील क्रमांक, तसेच महाराष्ट्रातील माशांचे उत्पादन, राष्ट्रीय उत्पादनातील क्रमांक यावर प्रश्न असतात. त्याचबरोबर मासे साठविण्याच्या पद्धती, सरकारी योजना यांचादेखील अभ्यास करावयास हवा.
* कृषीअर्थव्यवस्था- कृषिव्यवस्थापन, कोणत्या प्रकारे शेती करावी याविषयी सिद्धान्त मांडले आहेत. यात अंतर्भूत सर्व घटकांची तयारी करण्यावर भर द्यावा.
एकंदर, उपरोक्त भागात दिलेली विविध प्रकरणे आणि त्यावर आधारित प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन आपल्या अभ्यासाचे धोरण ठरवावे. प्रकरणनिहाय स्वतंत्र कोष्टके तयार करून त्यात संबंधित प्रकरणांविषयीची माहिती समाविष्ट करावी. ही माहिती जितक्या सुलभपणे मांडता येईल तेवढी मांडण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी प्रसंगी तक्त्यांचा वापर करावा. यासंदर्भात लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे या क्षेत्रात घडणाऱ्या चालू घडामोडी होय. कृषी क्षेत्रातील संशोधन, नव्या जाती-प्रजातींचा शोध, विविध उत्पादनांतील चढउतार, त्यासंदर्भातील समस्या, शासनाच्या उपाययोजना इ. महत्त्वपूर्ण घटकांबाबत अद्ययावत माहिती असणे अत्यावश्यक ठरते. त्यासाठी वर्तमानपत्रे, लोकराज्य, योजना, यांसारखी मासिके, शासनाचे विविध अहवाल अशा संदर्भसाहित्याचा नियमित वापर अत्यावश्यक ठरतो. या संदर्भसाहित्यातून विविध घटकांसंबंधी बरीच आकडेवारी संकलित करावी लागते. ही आकडेवारी डायरीचा फॉर्म अवलंबून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच आपल्या अभ्यासाच्या उजळणीचे वेळापत्रक तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आपण तयार केलेल्या प्रत्येक माहितीची किमान तीन वेळा उजळणी होईल याची खबरदारी घ्यावी.
कृषी घटकाचा केलेला अभ्यास अचूक, नेमका व पुरेसा आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी त्यावरील वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी प्रश्नांचा भरपूर सराव करावा. सराव करताना आढळलेल्या चुका लक्षात घेऊन त्यावर वेळीच मात करावी. बऱ्याचदा सोडवलेल्या प्रश्नांतूनदेखील नवी माहिती प्राप्त होते. सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांतील अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचे अधोरेखन करून त्याचीदेखील उजळणी होईल याची खबरदारी घ्यावी.
कृषी घटकाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राचा दरवर्षी प्रकाशित होणारा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्र वार्षिकी व एमपीएससी मार्गदर्शिका (युनिक प्रकाशन), कृषिव्यवस्था (पंचम प्रकाशन), कृषिशास्त्र (साबळे), कृषी घटक (दिवसे) या संदर्भपुस्तकांचा वापर करावा. कृषीसंबंधी नवे संशोधन, नव्या जाती-प्रजातींचा शोध याविषयक माहितीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे दरवर्षी प्रकाशित कली जाणारी कृषी डायरी महत्त्वाचा दस्तऐवज ठरते. उपरोक्त संदर्भाचा वापर करून प्रारंभी सर्वसमावेशक आणि नंतर मायक्रोनोट्स तयार कराव्यात. अत्यंत महत्त्वाची तसेच आकडेवारीवर आधारित माहितीच मायक्रोनोट्सच्या स्वरूपात तयार करावी. त्यामुळे संबंधित माहितीची वारंवार उजळणी करणे सुलभ होईल. अशारीतीने कृषीसंबंधी पारंपरिक माहिती आणि त्यात घडणाऱ्या चालू घडामोडी या दोन्ही बाबींवर प्रभुत्व मिळवून यात अधिकाधिक गुणांची कमाई करता येईल आणि आपला मुख्य परीक्षेचा मार्ग प्रशस्त करता येईल.
No comments:
Post a Comment