Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा - ‘सामान्य अध्ययन पेपर ४’ अभ्यासाची तयारी - ५



कैलास भालेकर - मंगळवार, २९ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

kailasbhalekar@gmail.com

‘कृषी’ भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून भारताच्या अर्थव्यवस्थेत    ‘कृषी’चे स्थान महत्त्वाचे आहे. ‘कृषी’ क्षेत्राचे रोजगारनिर्मितीविषयक महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नातील स्थान, निर्यातीतील वाटा, कृषिपूरक उद्योगांचे महत्त्व, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व, अन्नधान्य स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व या सर्व घटकांच्या आधारे ‘कृषी’ क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व अभ्यासता येते.



भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धी दरातील कृषी क्षेत्राचा प्रभाव अभ्यासणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व बाबींचा अभ्यास योग्य आकडेवारीसह करण्याची गरज असून, त्यासाठी अचूक आणि अधिकृत संदर्भ अभ्यासता येतो.
कृषी क्षेत्रातील अल्प उत्पादकतेच्या कारणांचे नेमके आकलन करून त्यासंदर्भातील शासनाच्या विविध धोरणांची, कार्यक्रमांची माहिती मिळविणे फायद्याचे ठरते. कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या सुधारणांची अद्ययावत माहिती मिळविणेदेखील त्यादृष्टीने आवश्यक आहे. जमीन सुधारणांसंदर्भातील विविध टप्प्यांचे आकलन हा या घटकातील महत्त्वाचा भाग आहे.
भूमी उपयोजनांमध्ये अलीकडील कालावधीत महत्त्वाचे बदल होत असून, अनुकूल भूमी उपयोजनांसंदर्भातील शासकीय धोरणासंदर्भातील अचूक माहिती हा घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. भूमी संधारण आणि जलसंधारण कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. भूमिसंधारण आणि जलसंधारणाचे असलेले नेमके महत्त्व काय आहे आणि सध्या हे संधारण का महत्त्वाचे ठरले आहे याचे आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, भूमिसंधारण आणि जलसंधारण या संदर्भातील शासनाच्या विविध कार्यक्रमांची नेमकी माहिती आवश्यक आहे. भूमिसंधारणाच्या आणि जलसंधारणाच्या पद्धतींची आणि प्रकारांची माहिती नेमक्या स्वरूपात मिळविणे लाभदायक ठरेल. भूमिसंधारण आणि जलसंधारण या संदर्भातील स्वयंसेवी संस्थांचे कार्य आणि त्यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण पद्धतींची माहिती मिळविणे गरजेचे आहे. या माहितीचे संकलन नेमक्या नोट्सच्या साहाय्याने केल्यास तयारीतील नेमकेपणा वाढविणे शक्य होते.
कोरडवाह शेतीचे स्वरूप आणि महत्त्व यांचे आकलन आवश्यक असून, कोरडवाह शेती विकासासंदर्भातील महत्त्वाच्या टप्प्यांची नेमकी माहिती मिळविणे उपयुक्त ठरेल. जलसिंचनाचे महत्त्व, जलसिंचनाच्या विविध पद्धती आणि विविध जलसिंचनाचे प्रमाण यांचे वस्तुनिष्ठ आकलन या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जलसिंचनासंदर्भातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील शासकीय कार्यक्रमांची सद्य:स्थितीतील माहिती संकलित करणे फायदेशीर ठरेल. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवालाचा संदर्भ त्यादृष्टीने महत्त्वाचा ठरतो. तसेच कृषी अर्थशास्त्रातील घटकांच्या तयारीसाठी  कठऊकअठ एउडठडट : ऊअळळअ, रवठऊअफअट आणि कठऊकअठ एउडठडट : टकरफअ,ढवफक हे संदर्भग्रंथ उपयुक्त ठरतील. कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणासंदर्भातील विविध टप्प्यांचे आकलन आवश्यक असून त्यासंदर्भातील अलीकडील महत्त्वपूर्ण संशोधनांची माहिती उपयुक्त ठरेल. तसेच भारतीय कृषी संशोधन परिषद, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद यांची भूमिका अभ्यासणे गरजेचे ठरते.
‘कृषी पतपुरवठा’ हा घटक  कृषी अर्थशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कृषी पतपुरवठा रचनेचे नेमके स्वरूप अभ्यासणे आवश्यक असून त्या रचनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विविध कृषी पतपुरवठा संस्थांची माहिती हा या घटकाच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या कृषी पतपुरवठा संस्थांच्या कार्यपद्धतीचे नेमके आकलनदेखील या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. नाबार्ड, भूविकास बँका यांची रचना, कार्यपद्धती आणि या संस्थांचे सद्य:स्थितीतील महत्त्वाचे कार्यक्रम यांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. कृषी उत्पादनांच्या किमतीसंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण घटकांची माहिती मिळविणे आवश्यक ठरते. कृषी उत्पादनांच्या किंमतपातळीवर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याचे नेमके आकलन आवश्यक असून, कृषी किमतीसंदर्भातील शासनाच्या कार्यक्रमांचे आकलन त्यादृष्टीने उपयुक्त ठरते. किमान आधारभूत किमती व किमान आधारभूत किमतीविषयक शिफारस करणाऱ्या यंत्रणा, या यंत्रणांची कार्यपद्धती, किमान आधारभूत किमती ठरविण्याची आवश्यकता या बाबींची माहिती कृषी घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरते. त्यासंदर्भातील अनुदानविषयक तरतुदींचे आकलनदेखील आवश्यक ठरते. भारतातील कृषी विपणनाची रचना, कृषी विपणनासंदर्भातील समस्या आणि कृषी विपणन सुधारणा या घटकांचे आकलन परीक्षाभिमुख तयारीसाठी लाभदायक ठरेल. त्यासंदर्भातील कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांच्या वस्तुनिष्ठ माहितीचे आकलन उपयुक्त ठरते.
‘अन्न आणि पोषण’ हा भारताच्या संदर्भातील महत्त्वाचा घटक असून, भारताच्या अन्न उत्पादनासंदर्भातील आणि वापरासंदर्भातील विविध महत्त्वाच्या प्रवाहांचा वेध घेणे त्यासाठी आवश्यक ठरते. पहिली हरितक्रांती आणि सद्य:स्थितीतील दुसरी हरितक्रांती यांमधील महत्त्वाच्या टप्प्यांचा अभ्यास या घटकाच्या तयारीतील आवश्यक आहे. भारताची अन्नस्वयंपूर्णता आणि अन्नसुरक्षा यांचे संकल्पनात्मक आकलन आणि त्यासंदर्भातील शासनाच्या महत्त्वाच्या कार्यक्रमांची अचूक माहिती उपयुक्त ठरते. प्रस्तावित अन्नसुरक्षा कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती मिळविणेदेखील या घटकाच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. भारताच्या अन्नधान्याची साठवणूकविषयक आणि अधिप्राप्तीविषयक समस्यांचे अचूक आकलनदेखील या घटकाच्या तयारीसाठी आवश्यक ठरेल. समतोल आहार आणि अन्नघटकांची पोषकमूल्ये यांची नेमकी माहिती मिळविणे गरजेचे असून, भारतातील पोषणविषयक समस्या आणि त्यांचे परिणाम यांचे आकलन हा या घटकाच्या तयारीतील महत्त्वपूर्ण भाग ठरतो. तसेच त्यासंदर्भातील शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, कामासाठी धान्य, मध्यान्ह भोजन कार्यक्रम यासारख्या उपाययोजनांची अचूक माहिती अद्ययावत संदर्भासह संकलित करणे त्यादृष्टीने महत्त्वाचे ठरते.
‘कृषी अर्थशास्त्र’ घटकाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी संदर्भग्रंथांबरोबरच सद्य:स्थितीतील उपयोजित संदर्भाचे आकलन करणे लाभदायक ठरेल.

No comments: