Monday, September 3, 2012

'एमपीएससी'चा राजमार्ग : स्पर्धात्मक वेगळेपण

'एमपीएससी'चा राजमार्ग : स्पर्धात्मक वेगळेपण


तुकाराम जाधव , 
संचालक, द युनिक अकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com

altaltएमपीएससी परीक्षेचा विचार करताना प्रारंभी ‘तिचे स्पर्धात्मक स्वरूप म्हणजे नेमके काय?’ या बाबीचा सखोल विचार करणे अत्यावश्यक ठरते. त्याशिवाय या परीक्षेविषयी पसरलेल्या सर्वसामान्य गरसमजुतीचाही बारकाईने ऊहापोह करणे महत्त्वाचे ठरते. राज्यप्रशासनातील सनदी सेवा पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध करत असतो. जाहीरातीत नमूद केलेली एकूण पदसंख्या आणि त्यात समाविष्ट विविध श्रेणीतील पदे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरतात.
कारण अंतिमत: या परीक्षेत जाहिरातीत नमूद केलेल्या या पदसंख्येइतकेच विद्यार्थी पात्र ठरविले जातात. त्यामुळेच ही परीक्षा शब्दश: स्पर्धात्मक स्वरूपाची ठरते. तिच्या विशिष्ट स्वरूपाच्या या स्पर्धात्मकतेमुळेच ती इतर बी.ए.-एम.ए.; बी.कॉम-एम.कॉम.; बी.एस्सी.-एम.एस्सी.; अभियांत्रिकी, वैद्यकीय परीक्षा इ. सारख्या रूढ परीक्षांपेक्षा वेगळी ठरते. या संदर्भात या परीक्षेविषयी विद्यार्थिवर्गात उमटणाऱ्या दोन प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया पुरेशा बोलक्या असतात. त्यातील एक म्हणजे कित्येक विद्यार्थ्यांना असे वाटते की, या परीक्षेत यश मिळवण्यासाठी असामान्य बुद्धिमत्ता व अपार कष्टाची आवश्यकता असते. आपल्यासारख्या सामान्य बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांला या परीक्षा ‘झेपणाऱ्या’ नाहीत. त्यामुळे या परीक्षांचा विचार न केलेलाच बरा! दुसऱ्या बाजूला या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांतील काही विद्यार्थ्यांकडून व्यक्त होणारी दुसरी प्रतिक्रिया काहीशी स्वतला श्रेष्ठ मानणारी असते. ‘मी एमपीएससी ची तयारी करत आहे, म्हणजे काहीतरी असामान्य करत आहे. त्यामुळे मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ अशा आशयाची प्रतिक्रिया होय. वस्तुत: या दोन्ही प्रतिक्रिया एमपीएससी परीक्षेला अतिरंजित स्वरूपात पाहणाऱ्या म्हणून अवास्तव ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच एका बाजूला या परीक्षेचे वेगळेपण लक्षात घेताना त्याविषयक पसरलेल्या गरसमजांचाही परामर्ष घेणे अत्यावश्यक ठरते.
ल्ल एमपीएससीची परीक्षा इतर रूढ परीक्षांचा विचार करता पुढीलप्रमाणे भिन्न ठरते. प्रस्तुत भिन्नत्व अथवा वेगळेपणातच या परीक्षेचे स्पर्धात्मक  स्वरूप दडले आहे. जितक्या लवकर आणि गांभीर्याने हे निराळेपण आपण लक्षात घेऊ त्यावरच या परीक्षेच्या तयारीची नेमकी दिशा अवलंबून राहील. पहिले वेगळेपण म्हणजे यात पात्र (यशस्वी) होण्यासाठी आवश्यक गुण अथवा गुणाची टक्केवारी होय. इतर कोणत्याही रूढ परीक्षेत पात्र होण्यासाठी ३५% अथवा फारतर ४०% एवढी गुणमर्यादा निर्धारित केलेली असते. एमपीएससीच्या बाबतीत मात्र पात्रतेसाठी असा पूर्वनिर्धारित गुणमर्यादेचा निकष आढळत नाही. त्या-त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदसंख्येला विचारात घेऊनच परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट विद्यार्थी पात्र ठरविले जातात. उदाहरणार्थ एखाद्या वर्षी आयोगाने ५०० पदे भरण्याचे जाहीर केल्यास त्या वर्षी पूर्वपरीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपकी अंतिमत: भरावयाच्या ५०० पदांच्या साधारण १२ पट म्हणजे ६००० विद्यार्थी पूर्वपरीक्षेत पात्र ठरविले जातात. म्हणजेच ६००० विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते. पुढे मुख्य परीक्षा दिलेल्या या ६००० विद्यार्थ्यांपकी त्या वर्षी भरती करावयाच्या पदसंख्येच्या ३ पट म्हणजे १५०० विद्यार्थी या टप्प्यात पात्र ठरवले जातील आणि त्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित केले जाते. शेवटी मुलाखत दिलेल्या १५०० विद्यार्थ्यांपकी ५०० विद्यार्थ्यांची पात्र उमेदवार म्हणून निवड होईल. थोडक्यात त्या वर्षी आयोगाद्वारे भरल्या जाणाऱ्या पदसंख्येला मध्यवर्ती स्थान असते. म्हणूनच त्या पात्र विद्यार्थ्यांच्या ‘मॅजिक फिगर’ मध्ये येण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला इतरांशी स्पर्धा करून त्यांना मागे सारावे लागते. अर्थात त्यासाठी स्वतला सिद्ध करावे लागते. कारण आपल्यात अपेक्षित सुधारणा करूनच या स्पध्रेत इतरांना मागे टाकणे शक्य होते. म्हणूनच ही परीक्षा एकीकडे इतरांशी तर दुसरीकडे स्वतशीच अविरतपणे चालणारी स्पर्धा (परीक्षा) ठरते. आणि हेच या परीक्षेचे मूलभूत वेगळेपण आहे.
ल्ल एमपीएससी ची परीक्षा एकंदर तीन टप्प्यांत आयोजित केली जाते, हे या परीक्षेचे दुसरे वेगळेपण होय. यात वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्वपरीक्षा व मुख्यपरीक्षा (यापूर्वी, म्हणजे २०१२ पूर्वी, राज्यसेवा मुख्यपरीक्षा ही विश्लेषणात्मक व लघुत्तरी-दीघरेत्तरी प्रश्नांची असायची) आणि तोंडी स्वरूपाची मुलाखत असे तीन टप्पे आढळतात. अशा निरनिराळ्या स्वरूपाचे भिन्न टप्पे हे या परीक्षेचे खास वैशिष्टय़ मानता येते. त्या-त्या टप्प्याला अनुसरूनच विद्यार्थ्यांला आपल्या तयारीची आखणी करावी लागते.
ल्ल पूर्व, मुख्य आणि मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी) यातील मुलाखतीचा तिसरा टप्पा हे या परीक्षेचे आणखी एक भिन्नत्व ठरते. वस्तुत: आयोगाने यास ‘व्यक्तिमत्त्व चाचणी’ असे नामाभिधान वापरले आहे. उमेदवार प्रशासकीय जबाबदारी पेलण्यासाठी समर्थ आहे किंवा नाही याची तपासणी म्हणजे व्यक्तिमत्त्व चाचणी होय. अर्थात यात अधिकाधिक गुण प्राप्त व्हावेत यासाठी समग्र तयारीवर भर देणे गरजेचे ठरते.
परीक्षेच्या प्रत्येक टप्प्याची तयारी करण्यासाठी आयोगाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमाचे स्वरूप व व्याप्ती हे या परीक्षेचे पुढील वेगळेपण लक्षात आणून देते. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत ‘सामान्य क्षमता चाचणी’ या एकाच पेपरमध्ये एकूण सहा घटकांचा सविस्तर अभ्यासक्रम नमूद केलेला आहे. या वर्षीपासून (२०१२) राज्यसेवा मुख्य परीक्षेत अनिवार्य मराठी, इंग्रजी या भाषा पेपरसह इतिहास-भूगोल, राज्यघटना, मानव संसाधन विकास व मानवी हक्क आणि अर्थव्यवस्था-विज्ञान तंत्रज्ञान हे सामान्य अध्ययनाचे सविस्तर चार पेपर्स समाविष्ट केले आहेत. शेवटी मुलाखतीसाठी औपचारिकपणे अभ्यासक्रम निर्धारित केलेला नसला तरी व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक पाश्र्वभूमी, अभ्यासबाह्य़ बाबींतील रस, पदविषयक माहिती आणि चालू घडामोडी अशा घटकांवर मुलाखतीत प्रश्न विचारले जातात. स्वाभाविकच विविध अभ्यास शाखांशी संबंधित असलेला व्यापक अभ्यासक्रम हे नजरेत भरणारे एक निराळेपण ठरते.अभ्यासक्रमात नमूद केलेल्या घटकांसंबंधी चालू घडामोडींचा अभ्यास हे या परीक्षेचे शेवटचे वेगळेपण मानता येते. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत स्वतंत्रपणे चालू घडामोडीवर प्रश्न विचारले जातात. त्याखेरीज कला, वाणिज्य, अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडीविषयी देखील प्रश्न विचारले जातात. मुख्य परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी आयोगाने अशी एक स्पष्ट सूचनाच नमूद केली आहे की ‘अभ्यासक्रमात नमूद केलेल्या मुद्याविषयी विद्यार्थ्यांनी समकालीन व अद्ययावत माहितीशी अवगत असावे. याचा अर्थ मुख्यपरीक्षेतही अनेक प्रश्न त्या-त्या घटकात घडलेल्या चालू घटना-घडामोंडीविषयी असणार हे नक्की! शेवटी मुलाखतीतही घटकराज्य, राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडीविषयी काही प्रश्न विचारले जातात. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या या चालू घडामोडींची तयारी करण्यासाठी वर्तमानपत्रे, नियतकालिके आणि वार्षकिींचे नियमित व सखोल वाचन अत्यावश्यक ठरते. उपरोक्त वेगळेपणा लक्षात आल्यास त्या दृष्टीने आपली अभ्यासनीती ठरवणे सुलभ जाते आणि त्यात नेमकेपणाची हमी देणेही सहजसाध्य बनते.
एकंदर पाहता राज्यसेवा म्हणजे एमपीएससी परीक्षा ही शब्दश: स्पर्धात्मक स्वरूपाची असल्याने ती इतर परीक्षांपेक्षा महत्त्वपूर्ण अर्थाने भिन्न ठरते. असंख्य विद्यार्थी या परीक्षा देतात. स्वाभाविकच या स्पध्रेत सहभागी होऊन आपल्याला अपेक्षित पद मिळावे यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते यात शंका नाही. त्याचबरोबर या परीक्षेविषयी पसरलेले अनेक गरसमज मनात ठेवून त्याविषयी न्यूनगंड बाळगणे अहिताचेच आहे. कारण क्षमता असूनही आपण या न्यूनगंडामुळेच या परीक्षेपासून दूर राहण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच या गरसमजांना वेळीच बाजूला सारून कोणत्याही पूर्वग्रह विरहित मनाने या परीक्षांचा विचार करावा. या परीक्षेचे वेगळेपण व नेमके स्वरूप लक्षात घेऊन याविषयी निर्णय घ्यावा आणि परीक्षेची तयारी सुरू करावी. मग पुढे काय? .. पाहू या पुढील लेखात..!

परीक्षाविषयक गैरसमज
दुसऱ्या बाजूला या परीक्षेविषयी आढळणाऱ्या अनेक गरसमजांचाही परामर्ष घेऊन त्यांचे निराकारण करणे महत्त्वाचे ठरते. यासंदर्भातील एक गरसमज म्हणजे यात यश मिळवण्यासाठी असामान्य बुद्धीमत्तेची गरज लागते हा होय. वेगळ्या भाषेत ज्यांनी १० वी, १२ वी व पदवीशिक्षणात गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे असेच विद्यार्थी यात टिकू शकतात असा एक व्यापक स्तरावर आढळणारा गरसमज आहे. वस्तुत: या परीक्षेत दरवर्षी यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी तपासल्यास हे लक्षात येते की, त्यातील अत्यल्प विद्यार्थीच गुणवत्ता यादीत आलेले असतात. उर्वरित विद्यार्थी सर्वसाधारण शैक्षणिक पाश्र्वभूमी असणारेच दिसतात. तथापि, याचा अर्थ १०, १२ वी आणि पदवीशिक्षण कसेही केले तरी चालेल असे नाही. राज्यसेवा परीक्षेचा स्वतंत्र अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक पाश्र्वभूमी एकाअर्थी गरलागूच ठरते असे लक्षात येते. म्हणूनच पदवीशिक्षण पूर्ण केलेला प्रत्येक विद्यार्थी या परीक्षेचा विचार करू शकतो आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास त्यात यश प्राप्त करू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.  एमपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी शहरी भागातच शिक्षण झालेले असले पाहिजे, त्यातही प्रथितयश महाविद्यालयांत ते पूर्ण झालेले असावे असे बऱ्याच विद्यार्थी-पालकांना वाटत असते. शहरी, निमशहरी भागात अनेक सुविधा उपलब्ध असतात आणि मार्गदर्शन उपलब्ध असते हे जरी मान्य केले तरी ग्रामीण भागातून येणारा विद्यार्थी यात यश प्राप्त करू शकत नाही असे नाही. खरे पाहता आज एमपीएससी परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांत ग्रामीण, निमशहरी पाश्र्वभूमी असलेल्या मुलां-मुलींचीच संख्या लक्षणीय असते हे लक्षात येते. चिकाटी, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर कोणताही विद्यार्थी यात नेत्रदीपक यश मिळवू शकतो, यात शंका नाही.
अस्खलित अर्थात ‘फाड फाड’ इंग्रजी बोलता-लिहिता आल्याशिवाय या परीक्षेत यशस्वी होता येत नाही असाही एक अपसमज आढळतो. राज्यसेवेचे एकंदर स्वरूप पाहता मुख्यपरीक्षेत समाविष्ट असलेल्या अनिवार्य इंग्रजी पेपरखेरीज दुसऱ्या कोणत्याही पेपरमध्ये इंग्रजी भाषेचा प्रश्न निर्माण होत नाही. थोडक्यात इतर अभ्यासक्रमाच्या संदर्भात आणि त्यावर आधारित प्रश्नपत्रिकांत इंग्रजीचे सर्वसाधारण अथवा विशेषीकृत ज्ञान अत्यावश्यक ठरत नाही. त्यामुळे इंग्रजीविषयीची कित्येक विद्यार्थी-पालकांच्या मनात आढळणारी अनाठायी भीती बाजूला सारणे अगत्याचे ठरते. तथापि आपण एकविसाव्या आणि जागतिकीकरणाच्या युगात राहात असल्यामुळे किमान वाचता-लिहिता येण्यासाठी आवश्यक इंग्रजीचे ज्ञान आपल्याकडे असेल याची प्रत्येकाने खात्री बाळगावी.त्याचप्रमाणे मुलाखतीत मुलाखत मंडळ काहीही प्रश्न विचारते. जणू ते आपल्याला सापळ्यात पकडायलाच बसलेले असते. त्यातील सदस्य कोणतेही आणि कशाही स्वरूपाचे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांला भंडावून सोडतात इ. मुलाखतीविषयी अशा एक ना अनेक गरसमजुती आढळतात. वास्तविक पाहता मुलाखत मंडळाला याची जाणीव असते की मुलाखतीस पात्र ठरलेला उमेदवार पूर्व व मुख्य परीक्षेचे दोन महत्त्वाचे अडथळे पार करून आलेला आहे. म्हणजेच त्याने /तिने आपली त्यासंदर्भातील पात्रता सिद्ध केलेली आहे हे लक्षात घेऊनच मुलाखत मंडळ त्या उमेदवाराची मुलाखत घेत असते. उमेदवारावर दडपण येणार नाही अशा पद्धतीनेच उमेदवाराच्या क्षमता व गुणवैशिष्टय़ांची खातरजमा करावी असे निर्देशही  मुलाखत-मंडळाला दिलेले असतात. त्यामुळे मुलाखतीविषयक सर्व गरसमजांना बाजूला सारून उपरोक्त भागात नमूद केलेल्या घटकांची तयारी केल्यास मुलाखतीला आत्मविश्वासपूर्वक सामोरे जाता येईल आणि त्यात चांगले गुण प्राप्त करता येतील हे लक्षात घ्यावे. शेवटी लाचलुचपत दिल्याशिवाय अधिकाऱ्याचे पद मिळत नाही असेही अनेकांना वाटते. एमपीएससीच्या इतिहासात अशी काही प्रकरणे उघडकीस आली आहेत यात शंका नाही. मात्र अलीकडील काळात ही बाब मागे पडली आहे. त्यामुळेच आज अíथकदृष्टय़ा दुर्बल असलेले अनेक विद्यार्थी विविध अधिकारपदावर रूढ होताना दिसत आहेत.

No comments: