कैलास भालेकर, शनिवार, १२ मे २०१२
प्राध्यापक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
kailasbhalekar@gmail.com
मानव साधनसंपत्तीचा विकास राष्ट्रविकासाच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे. लोकसांख्यिकी लाभांशाचा योग्य लाभ होण्याच्या दृष्टीने मानव साधनसंपत्तीच्या विकासाचे योग्य नियोजन गरजेचे आहे. त्याद्वारे मानव साधनसंपत्तीचा विकास योग्य दिशेने होऊ शकेल. अर्थातच, मानव साधनसंपत्तीच्या विकासासाठी संस्थात्मक यंत्रणा खूपच महत्त्वपूर्ण आहे.
भारतामध्ये मानव साधनसंपत्तीच्या विकासामध्ये कार्यरत असणाऱ्या संस्थांचा समावेश या घटकांतर्गत करण्यात आला आहे. एन.सी.ई.आर.टी., एन.आय.ई.पी.ए., यू.जी.सी. (विद्यापीठ अनुदान आयोग), मुक्त विद्यापीठे, ए.आय.सी.टी.ई. (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद), औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एन.सी.व्ही.टी. (राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण परिषद), आय.एम.सी. (भारतीय वैद्यकीय परिषद) या महत्त्वपूर्ण संस्थांचा समावेश या घटकांतर्गत करण्यात आला आहे.
या सर्व संस्थांची स्थापना, रचना आणि कार्यपद्धती यांची नेमकी माहिती मिळविणे हा या घटकाच्या अभ्यासातील महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच, या संस्थांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण धोरणांचा आणि आराखडय़ांचा परामर्श घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. या सर्व बाबींची तयारी अधिक सखोलपणे करण्याबरोबरच सद्य:स्थितीच्या संदर्भासह केल्यास अधिक उपयुक्त ठरते. या संस्थांची माहिती मिळविण्याच्या दृष्टीने मानव साधनसंपत्ती विकास मंत्रालयाची वेबसाईट आणि या संस्थांच्या वेबसाईट्स खूपच उपयुक्त ठरतात. अर्थातच, वेबसाईटवरील माहितीचे परीक्षाभिमुख संकलन विद्यार्थ्यांनी नोट्समध्ये केल्यास अभ्यासासाठी खूपच उपयुक्त ठरते, त्यामुळे अभ्यासाचे काटेकोर नियोजन शक्य होईल. भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल, राष्ट्रीय नमुना पाहणी संस्था (NSSO) अहवालाचे नेमके अवलोकन करून त्यातील महत्त्वाच्या माहितीचा परामर्श घेणे उपयुक्त ठरेल. तसेच वृत्तपत्रे आणि मासिके यांमधूनदेखील या घटकांच्या माहितीचे संकलन करणे शक्य होते.
भारताच्या मानव साधनसंपत्तीशी निगडित विविध समस्यांचे देखील विविध अचूक संदर्भासह अवलोकन करणे आवश्यक आहे. परीक्षेचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप लक्षात घेऊन या सर्व समस्यांचे अवलोकन केल्यास अभ्यासाची परिणामकारकता आणि अचूकता वाढविणे शक्य होते. मानव साधनसंपत्तीच्या विकासामध्ये सहभागी असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि त्यांची कार्यपद्धती अभ्यासणेदेखील महत्त्वाचे असून, या स्वयंसेवी संस्थांचे वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या अहवालातील परीक्षाभिमुख माहितीचे संकलनदेखील महत्त्वाचे ठरते. अर्थातच, या माहितीचे महत्त्व आणि अधिकृतता याचा विचार करणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
शासनाच्या रोजगारनिर्मिती संदर्भातील विविध धोरणांची अचूक माहिती मिळविणे आवश्यक आहे. रोजगारनिर्मिती संदर्भातील धोरणांच्या टप्प्यांचा अभ्यास करताना, सद्य:स्थितीतील रोजगारनिर्मिती कार्यक्रमांवर अधिक भर देणे उपयुक्त ठरते. उदा., महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGS). महाराष्ट्र शासनाच्या रोजगारनिर्मितीविषयक कार्यक्रमांचा नेमका आढावादेखील महत्त्वाचा असून या कार्यक्रमांतील महत्त्वाचे टप्पे आणि या योजनांचे मूल्यमापन याची तयारीदेखील आवश्यक ठरते. शासनाच्या अहवालाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या यासंदर्भातील आकडेवारीचे अवलोकन करून त्यातील महत्त्वाच्या आकडेवारीचा समावेश विद्यार्थ्यांनी आपल्या नोट्समध्ये केल्यास अधिक नेमकेपणाने अभ्यास करणे शक्य होईल.
बेरोजगारीच्या प्रकारांची आणि त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण संकल्पनांची तयारीदेखील आवश्यक आहे. उदा., छुपी बेरोजगारी, खुली बेरोजगारी, रचनात्मक बेरोजगारी, सुशिक्षित बेरोजगारी, अर्ध बेरोजगारी यांसारख्या संकल्पनांचे नेमके आकलन या घटकाच्या तयारीतील महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थव्यवस्थेवरील संदर्भपुस्तकांचा अभ्यास त्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
बेरोजगारीविषयक नेमण्यात आलेल्या महत्त्वाच्या समित्या, या समित्यांच्या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष यांचे अवलोकनदेखील उपयुक्त ठरते. बेरोजगारीची समस्या सोडवण्यासंदर्भातील पंचवार्षिक योजनांतील महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचा अभ्यासदेखील तितकाच आवश्यक आहे. योजना आयोगाद्वारे त्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीचा आणि मूल्यमापनाचा अभ्यासदेखील महत्त्वाचा आहे. विशेषत: अकराव्या पंचवार्षिक योजनेचा आणि बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या आराखडय़ाचा संदर्भ घेतल्यास अधिक उपयुक्त ठरेल.
अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांतील रोजगारनिर्मितीच्या प्रवाहांचा वेध घेणेदेखील महत्त्वाचे आहे. कृषी, निर्मिती आणि सेवा क्षेत्रातील रोजगारनिर्मितीविषयक प्रवाह आणि कल अभ्यासणे आवश्यक आहे. उदा., सेवा क्षेत्रातील रोजगारनिर्मितीत सद्य:स्थितीतील बदलासंदर्भातील मनुष्यबळाचे नियोजनासारख्या बाबींसाठी शासनाद्वारे केलेल्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आणि महत्त्वाच्या धोरणांचा अभ्यासदेखील महत्त्वाचा ठरतो. रोजगारनिर्मितीचा शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, कौशल्ये, प्रशिक्षण, अनुभव यांच्याशी असलेल्या सहसंबंधाचा अभ्यासदेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. भारताच्या मानव साधनसंपत्तीच्या विकासातील समस्यांचा रोजगारनिर्मितीवर पडणारा प्रभाव अभ्यासणे आवश्यक आहे.
रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण विकास यांचा सहसंबंध अभ्यासणेदेखील आवश्यक असून, ग्रामीण भागातील रोजगारविषयक समस्यांचे आणि त्यासंदर्भातील शासनांच्या कार्यक्रमाचे आणि धोरणांचे आकलन त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. उदा., भारत निर्माण योजना, या योजनांची सद्य:स्थितीतील आकडेवारीची नेमकेपणाने माहिती मिळविणे महत्त्वाचे ठरते. मानव साधनसंपत्तीच्या विकास या घटकाची तयारी करताना शासकीय धोरणे, कार्यक्रम आणि सद्य:स्थितीतील महत्त्वाचे प्रवाह यावर अधिक भर देणे महत्त्वाचे ठरते.
No comments:
Post a Comment