Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा :महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

शरद पाटील ,शनिवार, १४ एप्रिल २०१२
प्राध्यापक ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’, पुणे.

sharadpatil11@gmail.com
आजच्या लेखात इतिहासाच्या अभ्यासक्रमातील ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा’ या शेवटच्या घटकाची तयारी कशी करायची याचा विचार करणार आहोत. वस्तुत: जुन्या अभ्यासक्रमात असणारा हा घटक नवीन अभ्यासक्रमातही कायम ठेवलेला आहे. जुन्या अभ्यासक्रमात या घटकावर विचारलेले प्रश्न थेट व साध्या स्वरूपाचे होते. प्रश्नांची संख्याही मर्यादित होती. हे प्रश्न प्रामुख्याने मराठी साहित्य, महाराष्ट्रातील सण, स्थापत्य, चित्रपट, चित्रकला या घटकांवर विचारण्यात आले होते. उदा., वि. वा. शिरवाडकर यांच्या नाटकांची नावे लिहा, दलित साहित्याची वैशिष्टय़े सांगा इ. नवी परीक्षा पद्धती वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्यामुळे या घटकाचा आता आणखी काळजीपूर्वक अभ्यास करावा लागेल.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा या घटकातील साहित्य, नाटय़, संगीत, चित्रपट क्षेत्राचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी याविषयक पारंपरिक माहिती अभ्यासावीच, पण त्यासोबत या क्षेत्रात घडणाऱ्या नव्या घडामोडी, घटना यावरही लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके यांचा वापर करावा.
प्रायोगिक कला या उपघटकाचा विचार करताना नृत्य, नाटक, संगीत, चित्रपट यांची जशी तयारी अपेक्षित आहे तसेच लोकजीवनाचा अविभाज्य भाग असणाऱ्या तमाशा, भारूड या लोककलांसह-महाराष्ट्रातील लावणी, कोळी नृत्य यांसारख्या लोकनृत्यांचा अभ्यासही करावा लागेल. नृत्य, नाटक, संगीत, चित्रपटांचा विचार करताना या कलाक्षेत्रातील आणि कलेशी संबंधित विविध व्यक्ती, त्यांचे योगदान, नृत्य, संगीत या क्षेत्रात असणारे प्रवाह, घराणी, त्यांची वैशिष्टय़े, काळानुरूप त्यामध्ये होत गेलेले बदल या प्रमुख बाबी लक्षात घ्याव्यात; तर लोककला व लोकनृत्यांचा विचार करतेवेळी या कलांचा उगम; नृत्ये कधी, कोणत्या प्रसंगी, अथवा कोणत्या सणाच्या वेळी साजरी केली जातात? त्यांची वैशिष्टय़े कोणती? या कलांमध्ये भर घालणाऱ्या व्यक्ती कोणत्या? यांचा अभ्यास करावा. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले काही ग्रंथ, प्रभाकर मांडे, शरद व्यवहारे यांचे लोकसाहित्यविषयक निवडक ग्रंथ या घटकाच्या तयारीस उपयुक्त आहेत.
महाराष्ट्रातील दृश्यकला या घटकांतर्गत स्थापत्यकला, चित्रकला, शिल्पकला यांचा समावेश होतो. प्रारंभी प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत या कलाप्रकारांचा झालेला विकास विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा. सातवाहन, चालुक्य, वाकाटक, शिलाहार, यादव, बहामनी, मराठा इ. राजवटींच्या काळात महाराष्ट्रात स्थापत्य व शिल्पकलेच्या प्रकारांत महत्त्वाची भर पडली. गुहा, मंदिर, स्तुप, चैत्य, वाडे या प्रकारच्या वास्तूंची निर्मिती या काळात झाली. वाकाटक काळात चित्रकलेत महत्त्वाची भर घातली गेली. काळानुरूप या कलाप्रकारात बदल झाले. विशिष्ट कलाप्रकार विकसित झालेली ठिकाणे कोणती? कोणत्या शासकांच्या काळात त्यांची निर्मिती झाली? या कलाप्रकारांची वैशिष्टय़े कोणती? या कलाप्रकारांत आढळणाऱ्या विविध शैली कोणत्या? काळाच्या ओघात त्यात कोणते बदल झाले? इ. प्रमुख आयामांवर भर द्यावा.
महाराष्ट्रात साजरे केले जाणारे सण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारशातील महत्त्वाचा घटक होत. लोकमनाची अभिव्यक्ती, आनंदनिर्मिती जसा या सणांचा उद्देश असतो त्या सोबतच याद्वारे परंपरांचे, मूल्यांचे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत वहन होत असते. प्राचीनकाळापासून आपणास महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांचा संदर्भ विविध ग्रंथात दिसून येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मुस्लिम व अन्य संस्कृतीचाही महत्त्वाचा वाटा आहे. भाषा, वेशभूषा, अन्न, धर्म व धार्मिक व्यवहार या घटकांबरोबरच सणसमारंभ यावरही तो प्रभाव जाणवतो. महाराष्ट्रातील प्रमुख धर्म-िहदू, इस्लाम, पारसी, शीख, ख्रिश्चन असे धर्मागणिक सणांचे वर्गीकरण करून आपण या सणांची माहिती जमा केली तर तयारीसाठी त्याचा फायदा होईल. सणांची माहिती जमा करताना सण कोणत्या महिन्यात? का साजरे होतात? सणांच्या उगमविषयक कथा व मिथके कोणती? सणांचे महत्त्व काय? अशी तयारीची दिशा ठरवावी. प्रत्येक सणांच्या काळात विविध वृत्तपत्रांच्या पुरवण्यामध्ये सणांविषयी माहिती सांगणारे अभ्यासकांचे लेख या तयारीसाठी सहायक ठरतील.
मराठी साहित्य, मराठी साहित्यातील विविध प्रवाह हा एक महत्त्वाचा उपघटक अभ्यासक्रमात आहे. यात प्राचीन ते अर्वाचीन काळातील महत्त्वाचे साहित्य; आधुनिक काळातील  साहित्यप्रकार (कादंबरी, नाटक, कथा, कविता) आणि भक्ती, दलित, स्त्रीवादी, ग्रामीण, नागरी असे साहित्य प्रवाह यांचा अभ्यास करावयाचा आहे. या घटकाची तयारी करताना विविध कालखंडातील लेखक, लेखिका, त्यांची ग्रंथसंपदा, त्यांच्या लेखनाची वैशिष्टय़े लक्षात घ्यावीत. वर उल्लेखलेल्या विविध प्रवाहांचाही त्याचप्रकारे विचार करून माहितीचे संकलन करावे. जे साहित्यिक पुरस्कार, विविध सन्मान, विविध संमेलनांचे अध्यक्षपद, नवीन लेखन, निधन, वादविवाद यामुळे चर्चेत येतात, त्यांचा विशेषत्वाने अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते. वृत्तपत्रांच्या वाचनाबरोबरच ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’ मार्फत प्रकाशित ‘महाराष्ट्र वार्षिकी’ या संदर्भग्रंथातील महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती, साहित्य, चित्रपट आणि शिल्पकार या प्रकरणांचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. विविध संदर्भाचा वापर करताना आपल्या तयारीची चौकट निश्चित करून समावेशकपणे नोट्सची निर्मिती करावी.

No comments: