Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी (अनिवार्य)ची तयारी

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी (अनिवार्य)ची तयारी

मंगेश खराटे ,बुधवार, २८ मार्च २०१२
द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

mangeshkharate@gmail.com
altमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (राज्यसेवा) मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमात मराठी व इंग्रजी हे दोन भाषा विषय वर्णनात्मक स्वरूपाचे असणार आहेत. नव्या अभ्यासक्रमानुसार सामान्य अध्ययनाचे चारही पेपर्स बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. केवळ मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे विषय वर्णनात्मक पद्धतीने लिहावयाचे आहेत. त्यामुळे गुण मिळविण्याची सर्वोत्तम संधी या दृष्टिकोनातून मराठीकडे पाहावे. अर्थात मराठी विषयात चांगले गुण हवे असतील तर वाचन, चिंतन, लिखाण, स्वयंशिस्त या वृत्ती अंगी बाणवाव्या लागतील.
त्यामुळे मराठी ही मातृभाषा असली तरी तिला गृहीत धरता कामा नये. सर्वप्रथम आयोगाने दिलेला नवा अभ्यासक्रम बारकाईने पाहावा. त्यातील सर्व प्रकरणांचे बारकाईने अवलोकन करावे. त्याचप्रमाणे मराठी विषयासंबंधी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात. दुसरी बाब म्हणजे मराठीचा दर्जा मुळात उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा असल्याने इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिका पाहून घ्याव्यात. त्याआधारे प्रश्नांचे साधारण स्वरूप लक्षात घेता येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मराठी अनिवार्य विषयाच्या मागील प्रश्नपत्रिकादेखील मार्गदर्शक ठरतील.
आयोगाने मराठी विषयासंबंधी स्पष्टपणे नमूद केलेली पुढील सूचना कायमस्वरूपी लक्षात ठेवावी. ती अशी- ‘प्रश्नपत्रिकेचा उद्देश उमेदवाराचे भाषिक ज्ञान, अभिव्यक्ती, आकलनक्षमता, लेखन व संवादकौशल्याच्या जाणिवांचा स्तर पडताळणे असा आहे.’ मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात आयोगाने निबंध (शब्दमर्यादा ५००पर्यंत); पत्रलेखन, अहवाललेखन, संवादकौशल्य; इंग्रजी आणि मराठी भाषेतील आकलनशक्ती तपासणारे प्रश्न-उताऱ्यावरील प्रश्न, भाषांतर आणि व्याकरण (शब्दांच्या जाती, वाक्प्रचार, काळ, वाक्यप्रकार आणि पारिभाषिक शब्द या घटकांचा अंतर्भाव केला आहे. त्यामुळे मराठीची तयारी करताना यातील प्रत्येक घटकाला योग्य वेळ दिला जाईल याची खातरजमा करावी. त्यासाठी दर्जेदार व सकस वाचनाची सवय, सातत्यपूर्ण लेखनसराव आणि चाचण्यांचा भरपूर सराव या पद्धतीवर जोर द्यावा. केवळ सरावाद्वारेच या विषयात चांगले गुण प्राप्त करता येतात हे लक्षात ठेवावे. 
निबंध हा घटक विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती व लेखनशैली तपासण्यासाठी समाविष्ट केलेला आहे. प्रश्नपत्रिकेत विचारले जाणारे निबंध वैचारिक, वर्णनात्मक, कल्पनापर, आत्मकथनपर आणि समकालीन ज्वलंत विषयावर आधारित असतील. आपल्याला ज्या विषयात रस आणि गती आहे असा विषय निवडून त्यावर वेगवेगळय़ा प्रकारचे निबंध लिहून पाहावेत. आपण लिहिलेले निबंध एखाद्या तज्ज्ञाकडून तपासून घ्यावेत. त्यात विषयाला अनुसरून निबंध लिहिला आहे का? विषयाच्या सर्व आयामांना न्याय दिला आहे का? आपल्या विचारात स्पष्टता आहे का? आपण घेतलेल्या भूमिकेच्या समर्थनार्थ योग्य युक्तिवाद, माहिती आणि आकडेवारी पुरविली आहे का? यापासून ते साधी, परंतु प्रभावी भाषाशैली अशा सर्व बाबी लक्षात घ्याव्यात. एखादा मुद्दा पटवून देण्यासाठी किंवा दोनचार ओळींमध्ये खूप काही सांगण्यासाठी एखाद्या समर्पक ‘कोटेशन’चा वापर करावा. मराठी साहित्यात अशा सुविचाराची, सुभाषिताची कमतरता नाही. निबंध हा उमेदवाराच्या मुक्तचिंतनाला वाव असणारा विषय आहे. पण या मुक्तचिंतनाला व्याकरणाच्या नियमाचे बंधन असायला हवे. थोडक्यात आशय व अभिव्यक्ती या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्यावे.
निबंध या लेखन-प्रकाराशिवाय पत्रव्यवहार, अर्ज, अहवाल लेखन/वृत्तान्त लेखन, प्रसारमाध्यमांसाठी अहवाल तयार करणे, औपचारिक भाषणे आणि संवादकौशल्य असे व्यावहारिक मराठीचे इतर घटक असतात. उपरोक्त घटक नेहमीच्या व्यवहारातील घटक होत. इथे अभिव्यक्तीबरोबर तंत्रही योग्य असणे आवश्यक आहे. पत्रांचे व अर्जाचे विविध प्रकार, विविध स्वरूपाचे वृत्तान्त लेखन व अहवाललेखन, औपचारिक भाषण आणि संवादकौशल्य या अभ्यासक्रमात नमूद केलेल्या उपघटकांवर विविध स्वरूपाचे वाचन आणि नियमित सरावाद्वारे प्रभुत्व मिळवता येते.
त्याचप्रमाणे आकलन हा महत्त्वपूर्ण घटकही समाविष्ट केला आहे. त्यामध्ये इंग्रजी उताऱ्याचे सुबोध मराठीत भाषांतर, सारांशलेखन, उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे असा मामला आहे. इंग्रजी भाषेच्या आकलनावर आधारित प्रश्नांची अचूक उत्तरे सोडविण्यासाठी इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान महत्त्वपूर्ण ठरते. यात शब्दार्थ, वाक्यरचना, काळ आणि व्याकरण या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी एखाद्या इंग्रजी वर्तमानपत्राचे नियमित वाचन आणि व्याकरणाचा सातत्यपूर्ण अभ्यास अत्यावश्यक ठरतो. 
व्याकरण हा अभ्यासक्रमातील शेवटचा घटक म्हणजे पैकीच्या पैकी गुण प्राप्त करून देणारा घटक होय. यात शब्दांच्या जाती, वाक्प्रचार व म्हणी, काळ, वाक्यप्रकार, पारिभाषिक शब्द या उपघटकांचा समावेश होतो. सुरुवातीपासूनच प्रत्येक उपघटकाची व्यवस्थित तयारी करून त्यावरील नमुना प्रश्नांचा सराव करावा. या विषयाच्या तयारीसाठी संदर्भपुस्तके म्हणून सुगम मराठी व्याकरण व लेखन मो. रा. वाळिंबे; व्यावहारिक मराठी-काळे, मुंडे; इ. दहावी-बारावीची मराठी अभ्यासक्रमातील पुस्तके आणि मराठी वर्तमानपत्र व नियतकालिके इ.चा वापर करावा. थोडक्यात विविधांगी वाचन, चिंतन-मनन आणि लेखनाचा भरपूर सराव या आधारे अनिवार्य मराठी विषयात ८० ते ८५ गुण सहज प्राप्त करता येऊ शकतात. 

No comments: