Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : पूर्वपरीक्षा : प्रत्यक्ष परीक्षा हॉलमधील रणनीती

‘एमपीएससी’चा राजमार्ग : पूर्वपरीक्षा : प्रत्यक्ष परीक्षा हॉलमधील रणनीती

कैलास भालेकर, गुरुवार, २२ मार्च २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.
admin@theuniqueacademy.com 
विद्यार्थी मित्रहो, कोणत्याही परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा तितकाच परीक्षा हॉलमधील आपला ‘परफॉर्मन्स’ही महत्त्वाचा असतो. किंबहुना परीक्षा हॉलमधील दोन तासांत आपण परीक्षेला किती आत्मविश्वासपूर्वक सामोरे जातो ही बाबच निर्णायक ठरते. कारण वस्तुनिष्ठ स्वरूपाची पूर्वपरीक्षा ही जशी माहिती व ज्ञानाची परीक्षा असते तशीच विद्यार्थ्यांच्या मानसिकतेची उलट तपासणी करणारीदेखील चाचणी असते. कित्येकदा चांगला अभ्यास असूनदेखील प्रत्यक्ष परीक्षेत मनोधैर्य खचल्यामुळे अपात्र ठरणारे अनेक विद्यार्थी दिसून येतात. परीक्षेचे भय, अभ्यासाचा ताण, पुढील निकालाविषयी सतत वाटणारी चिंता इ. कारणांमुळे विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचते. म्हणूनच या काळात आपले मनोधैर्य टिकवून ठेवून परीक्षेला प्रभावीरीत्या सामोरे जाणे गरजेचे असते. त्यादृष्टीने परीक्षा हॉलमधील वेळेचे व्यवस्थापन व नियोजन योग्य रीतीने करणे उपयुक्त ठरते.
अलीकडील काळात एमपीएससीने सीरिज पद्धती (A,B,C,D) सुरू केली आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला निर्धारित केलेली सीरिज परीक्षकाने आपल्याला दिली आहे का याची खात्री बाळगा. त्याचप्रमाणे उत्तरपत्रिकेवर जी माहिती विचारली आहे (परीक्षा क्रमांक, सीरिज क्रमांक आणि सही) ती अचूकपणे लिहिली जाईल याची दक्षता घ्यावी. या सर्व तांत्रिक परंतु महत्त्वपूर्ण बाबींत कोणतीही चूक होणार नाही याची खातरजमा करा. कारण परीक्षा संपल्यानंतर उपरोक्त माहिती भरताना झालेली चूक परीक्षा संपल्यानंतर लक्षात आल्यास त्याचा काहीही उपयोग होत नाही हे लक्षात ठेवावे.
आपण यापूर्वी म्हटल्याप्रमाणे आता नकारात्मक गुणपद्धतीमुळे पूर्वपरीक्षेतील २०० प्रश्नांपैकी सर्वच्या सर्व प्रश्नांची उकल करणे गरजेचे नाही. कारण चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला असलेल्या गुणांपैकी १/४ गुण कपात केले जातात. त्यामुळे सर्वच्या सर्व प्रश्न सोडविण्यापेक्षा ‘स्वत:ची तयारी आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप’ याआधारे आपण २०० पैकी किती प्रश्न सोडवायचे हे ठरवावे. त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे अजिबातच माहीत नाहीत असे १५-२० प्रश्न वाचण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा वेळेची बचत करून इतर प्रश्नांची उकल करण्यावर लक्ष केंद्रित करा. दुसरी बाब म्हणजे प्रश्नपत्रिकेत एकून २०० प्रश्न असतात, हे आपल्याला माहितीच आहे.  त्यापैकी ५० प्रश्न हे बुद्धिमापन चाचणीचे असतात हेही आपण जाणता. म्हणजे एकूण प्रश्न २०० आणि वेळ १२० मिनिटे. सर्वसाधारणत:, एकूण २०० प्रश्नांपैकी १८० प्रश्न सोडवायचे म्हटले तरी एका प्रश्नाला केवळ ४० सेकंद इतकाच वेळ मिळतो. म्हणूनच प्रत्येक प्रश्न सोडवताना वेळेच्या बाबतीत सजग असणे आवश्यक ठरते. कोणत्याही प्रश्नाला अनावश्यक वेळ दिला जाणार नाही हे पाहावे. पूर्व परीक्षेचा पेपर सोडविताना लक्षात ठेवावयाची आणखी एक बाब म्हणजे बुद्धिमापन चाचणीला द्यावयाचा वेळ होय. बुद्धिमापन चाचणीचे ५० प्रश्न सोडवण्यासाठी ५० ते ६० मिनिटे द्यावी लागतात. म्हणजे परीक्षेचा अर्धा वेळ यासाठी राखीव ठेवावा लागतो आणि उर्वरित वेळात १५० प्रश्नांची उकल करावी लागते. म्हणजे साधारणत: एका प्रश्नाला २४ सेकंद वेळ मिळतो. यामुळे हे प्रश्न अतिशय जलदरीत्या सोडवणे अत्यावश्यक ठरते. वेळेचे विचित्र वाटणारे हे नियोजन पाळावेच लागते. अर्थात, आपल्या सराव चाचण्यांतूनच आपली रणनीती निर्धारित केलेली असावी. त्यामुळे अतिशय जलद मात्र अचूक व नेमकेपणाने प्रश्न वाचणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अन्यथा वेळेचे गणित कोलमडले असेच समजा.
प्रश्नपत्रिकेचे अर्थात प्रत्येक प्रश्नाचे अचूक वाचन ही कळीची बाब आहे. त्यामुळे प्रश्नांचे वाचन करताना त्यातील शब्द व त्यांचा अर्थ काळजीपूर्वक लक्षात घ्यावा. त्याचप्रमाणे प्रश्नाखाली दिलेले पर्यायदेखील काळजीपूर्वक वाचावेत. म्हणूनच प्रत्येक वेळी किमान एकदा तरी उलटतपासणी करून खातरजमा करावी. अन्यथा प्रश्न व पर्यायाच्या चुकीच्या वाचन-आकलनामुळे संबंधित प्रश्नांचे उत्तर चुकणार हे नक्की! प्रश्नपत्रिकांची उकल करीत असताना लक्षात घ्यावयाची आणखी एक तांत्रिक बाब म्हणजे उत्तरपत्रिकेत उत्तरे छायांकित करताना आपण बरोबर प्रश्नाच्या पुढेच छायांकित करत आहोत याची खात्री करणे होय. अन्यथा मोठी चूक होण्याची शक्यता असते.
प्रश्नपत्रिका सोडवताना बऱ्याचदा सलग ३-४ प्रश्नांची उत्तरे अजिबातच येत नाहीत हे लक्षात येते. त्यामुळे दडपण निर्माण होऊन याचा आपल्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो. असे दिसल्यास त्याचे दडपण न घेता पुढील प्रश्नांकडे वळावे. ही जणू आपल्या मानसिकतेची चाचणी आहे हे कायम लक्षात ठेवावे. विशेषत: बुद्धिमापन चाचणीच्या बाबतीत एखाद्या प्रश्नाची उकल करताना आपण गरजेपेक्षा अधिक वेळ व्यतीत करण्याची शक्यता असते. अशा वेळी तो प्रश्न टाळून पुढे जाणे केव्हाही चांगले. काही प्रश्नांच्या बाबतीत दोन पर्यायांमध्ये गोंधळ वाटतो. अशा वेळी पेन्सिलीद्वारे एखादी खूण करून पुढे जावे. शेवटी वेळ मिळाल्यास अशा प्रश्नांकडे परत येणे शक्य आहे. 
विद्यार्थी मित्रहो, पूर्वपरीक्षेच्या बाबतीत परीक्षा हॉलमधील आपली मानसिक अवस्था आणि आत्मविश्वास या बाबी निर्णायक ठरतात. त्यामुळे दडपणाखाली न येता आपली विचारशक्ती मुक्त ठेवण्याचे कठीण काम करावे लागते. आपल्या बुद्धी व विचारशक्तीवर ताण वा दडपण नसल्यास आपण फार पूर्वीदेखील वाचलेली एखादी माहिती पटकन आठवते आणि प्रश्न सोडवताना त्याचा उपयोग होतो. अन्यथा दडपणामुळे तासाभरापूर्वी वाचलेली माहितीदेखील आठवत नाही. आपल्या आत्मविश्वासावर त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणूनच पूर्वपरीक्षेत कोणतेही दडपण न घेता, केलेल्या तयारीच्या आधारे परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे निर्णायक ठरते, हे कायम लक्षात ठेवा. अर्थात, सातत्यपूर्ण अभ्यास आणि प्रश्नपत्रिकांच्या भरपूर सरावाद्वारेच उच्च मनोधैर्य आणि दृढ आत्मविश्वासाची हमी देता येईल यात शंका नाही.

No comments: