‘एमपीएससी’चा राजमार्ग : पूर्वपरीक्षा : चालू घडामोडींची व्याप्ती
तुकाराम जाधव, सोमवार, १९ मार्च २०१२
संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com
चालू घडामोडी हा ३० गुणांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये स्वतंत्रपणे समाविष्ट केलेला महत्त्वाचा घटक आहे. वास्तविक पाहता या स्वतंत्र घटकाबरोबरच राज्यसेवा पूर्व परीक्षेतील कला शाखा, वाणिज्य-अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान-तंत्रज्ञान या घटकांतदेखील चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे एकूण २०० प्रश्नांपैकी जवळ जवळ ४०-५० प्रश्न चालू घडामोडींवर आधारित असतात हे लक्षात येते. म्हणूनच हा घटक राज्यसेवा पूर्व परीक्षेतील मध्यवर्ती घटक ठरतो. चालू घडामोडींसंबंधी प्रश्नांचा विचार केल्यास साधारणत: पुढील तीन प्रकार अधोरेखित करता येतात. (१) स्वतंत्र चालू घडामोडींचा विभाग (३० गुण), (२) कला, वाणिज्य-अर्थव्यवस्था, कृषी आणि विज्ञान-तंत्रज्ञान या घटकांतील चालू घडामोडी, (३) सामान्यज्ञानासंबंधीच्या चालू घडामोडी. आयोगाच्या गेल्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर असे दिसते, की चालू घडामोडींविषयक प्रश्न विशिष्ट घटकांना लक्षात ठेवून विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या घटकांना समोर ठेवून चालू घडामोडींचा अभ्यास करावा.
चालू घडामोडींचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे याचे विद्यार्थ्यांनी भान ठेवले पाहिजे. कारण राज्यसेवा पूर्व, मुख्य व मुलाखत या तीनही टप्प्यांत चालू घडामोडी हा घटक गुण मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच या घटकाची नियमित तयारी करण्यावर भर हवा. केवळ परीक्षेच्या वेळी एखाददुसऱ्या बाजारू पुस्तकावर अवलंबून न राहता प्रारंभापासूनच प्रमाणित संदर्भाचा वापर करून सर्वसमावेशक तयारी करण्यावर भर द्यावा. तरच चालू घडामोडी हा घटक विद्यार्थ्यांच्या अंतिम यशाला सहायक ठरू शकतो. चालू घडामोडींची तयारी करताना मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे अभ्यासाची एक चौकट विकसित करावी. महत्त्वाच्या निवडणुका, नियुक्त्या, बडतर्फी, निधन. विविध पुरस्कार, सन्मान, पारितोषिके, गाजलेली पुस्तके, लेखक-लेखिका. विविध क्रीडास्पर्धा, त्यांचे निकाल, त्यासाठी दिले जाणारे सन्मान. चर्चेतील प्रकल्प, स्थळ वा ठिकाण. नैसर्गिक अपत्ती, प्रभावित क्षेत्र वा ठिकाण. आर्थिक क्षेत्रातील घडामोडी. साहित्य-सांस्कृतिक (नाटक, चित्रपट, संगीत इ.) क्षेत्रातील घडमोडी, राजकीय क्षेत्रातील घटना, विविध कारणांसाठी नेमलेले आयोग, समित्या, त्यांचे अहवाल व शिफारशी. आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण घडमोडी (राष्ट्रप्रमुखांनी इतर देशांना दिलेल्या भेटी, इतर राष्ट्रप्रमुखांच्या भारतभेटी, आंतरराष्ट्रीय संस्था व संघटनांच्या परिषदा, विविध करार, कळीचे मुद्दे व त्यासंबंधी भारताची भूमिका, काही देशांत घडलेल्या उलथापालथी इ.) अशा महत्त्वपूर्ण घटकांविषयीची सर्वसमावेशक व अद्ययावत माहिती नियमितपणे संकलित करावी. अभ्यास सुलभ व्हावा यासाठी प्रत्येक घटकाचे दोन प्रकारे वर्गीकरण करावे. एक म्हणजे- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, क्रीडाविषयक, पुरस्कार सन्मान असे प्रमुख विभाग करावेत. दुसरे म्हणजे- प्रत्येक विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि राज्यीय असे तीन स्तर निर्माण करावेत.
गेल्या १० वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केले असता चालू घडामोडींसंदर्भात तक्त्यात दिलेल्या १०घटकांना समोर ठेवूनच प्रश्न विचारलेले दिसून येतात. म्हणूनच विद्यार्थ्यांनी या घटकांना मध्यवर्ती मानून चालू घडामोडींची तयारी करावी. त्यासाठी आपल्या नोंदवहीचेदेखील १० विभाग करून त्या त्या विभागांतर्गत राज्यीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना-घडामोडींची अचूक नोंद ठेवावी. महत्त्वाचे म्हणजे या घटकाचा अभ्यास पहिल्या दिवसापासूनच सुरू होईल याची काळजी घ्यावी. चालू घडामोडी घटकाच्या तयारीसाठी नेमके कोणते संदर्भसाहित्य वापरायचे याविषयी नेहमीच संभ्रम आढळतो. त्यादृष्टीने मराठीतील दोन वर्तमानपत्रे. लोकराज्य, योजना ही मासिके, परिवर्तनाचा वाटसरू हे पाक्षिक आणि महाराष्ट्र वार्षिकीतील वर्षभरातील घटनांचा आढावा हे प्रकरण या संदर्भसाहित्याचा अवलंब करावा. प्रत्येक संदर्भ वापरताना मागील प्रश्नपत्रिकांत विचारलेले प्रश्न व त्यांचे स्वरूप कायम स्मरणात ठेवावे. संदर्भसाहित्यातील घटना अचूक व नेमकेपणाने नोंदविली जाईल याची खबरदारी घ्यावी. आपला अभ्यास पुरेसा व परीक्षाभिमुख व्हावा यासाठी प्रत्येक घटकाची सर्वागीण माहिती उपलब्ध होईल हे पाहावे. उदा., जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने लोकपाल संस्थेचा उदय, लोकपाल विधेयक, जनलोकपालाची संकल्पना, पारित झालेले विधेयक, लोकायुक्ताची संस्था, या संस्थेचे अस्तित्व असलेली राज्य, लोकपाल विधेयकातील लोकायुक्तासंबंधी तरतुदीवरून झालेला वाद, चर्चेतील लोकायुक्त, भ्रष्टाचाराची समस्या, त्यासाठीची उपलब्ध यंत्रणा, त्यातील उणिवा, त्यावर मात करण्यासाठी पुढे आलेल्या उपाययोजना व प्रस्ताव अशी सर्वागीण माहिती संकलित करण्यावर भर द्यावा. त्यामुळे एखाद्या घटकावर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आल्यास त्याचे उत्तर देणे शक्य होते. म्हणूनच या घटकाची हंगामी तयारी न करता सुरुवातीपासूनच तयारी करावी हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे. त्याचप्रमाणे विविध संदर्भसाहित्यातून संकलित केलेल्या चालू घडामोडींची नियमितपणे उजळणी होईल याची खातरजमा करावी. त्यादृष्टीने एक आठवडा, पंधरा दिवस, महिना अशा पद्धतीने उजळणीचे वेळापत्रक तयार करावे. तसेच चालू घडामोडींवर आधारित प्रश्नांचा सराव करण्यावर भर द्यावा. त्यामुळे आपली तयारी पुरेशी आहे अथवा नाही हे लक्षात येते. त्याशिवाय विविध स्वरूपाची माहिती स्मरणात ठेवणे सुलभ बनते. अशा रीतीने नियमित व सातत्यपूर्ण तयारी, माहितीचे सर्वसमावेशक संकलन, त्यातील अचूकता व अद्ययावततेची हमी, नियोजित उजळणी आणि प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव या अभ्यास धोरणाच्या आधारे चालू घडामोडींची प्रभावी तयारी करता येईल.
(१) राजकीय आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(२) आर्थिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(३) सामाजिक व सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(४) विज्ञान तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(५) क्रीडाक्षेत्र आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(६) पुरस्कार, सन्मान आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(७) पुस्तके व लेखक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(८) महत्त्वाच्या व्यक्ती : निवडणूक, नियुक्ती, बडतर्फी, निधन. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(९) महत्त्वाचे दिवस आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
(१०) सामान्य ज्ञान आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य.
No comments:
Post a Comment