‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : मराठी अनिवार्य निबंधाची तयारी
मंगेश खराटे ,गुरुवार, २९ मार्च २०१२
द युनिक अॅकॅडमी, पुणे.
mangeshkharate@gmail.com
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमानुसार मराठी अनिवार्य या विषयातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध होय. सुमारे ५०० शब्दांत एका विषयावर निबंध लिहिणे अपेक्षित आहे. यास २० ते २५ गुण निर्धारित केले जाण्याची शक्यता आहे. निबंधामध्ये उमेदवाराच्या भाषाविषयक कौशल्याचे दर्शन होते यात शंका नाही. मात्र निबंध म्हणजे निव्वळ शब्दफुलोरा असू नये. निबंधात उमेदवाराचा स्वतंत्रपणे अभ्यास, विचार करण्याची क्षमता, चिकित्सकपणा, खंडनमंडन करण्याची क्षमता, इत्यादी सर्व गुणकौशल्यांचे दर्शन होते. निबंधात उमेदवाराने विचारपूर्वक पद्धतशीरपणे आपले मत मांडावे ही अपेक्षा आहेच. मात्र त्याचबरोबर आपला विचार प्रभावीपणे अभिव्यक्त करण्याची शैलीदेखील असावी. थोडक्यात, आशय व अभिव्यक्ती या दोन्हींचा समतोल म्हणजे निबंध होय.
वस्तुत: निबंध म्हणजे उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबच असते. अनेक उमेदवारांना असे वाटते की, निबंधलेखन म्हणजे अनेक मान्यवरांच्या वक्तव्यांना उद्धृत करणे होय. म्हणून अनेकदा कुणा मोठय़ाच्या चार वाक्यांनी निबंधाची सुरुवात होते. मात्र प्रत्यक्ष निबंधाचा विषय, ते चार उद्धृते व नंतरचा निबंध यात बऱ्याचदा खूपच तफावत जाणवते. निबंध मान्यवरांना उद्धृत करण्यासाठीची जागा नव्हे, तर उमेदवाराने त्याचे विषयासंबंधीचे नियोजनबद्ध, विचारपूर्वक म्हणणे मांडण्याची जागा आहे.
निबंध लिहायचा असतो, याची उमेदवाराने सतत जाण ठेवावी. त्यादृष्टीने त्याने नियमितपणे लिखाणाचा सराव करावा. लेखन सुवाच्य, वाचनीय हस्ताक्षरात असावे. सुरुवातीला लिहिलेले आपणच तपासावे, इतरांकडून तपासून घ्यावे, चुकांचा परामर्श घेत, टप्प्याटप्प्याने त्यात सुधारणा करावी. असे केल्याने शेवटी परीक्षेत लिहिताना लेखनाची गती, शैली, शब्दसंचयातील अर्थपूर्ण अचूकता, विषयाला धरून मुद्देसूदपणा इत्यादी सारे साधत प्रभावीपणे लिहून परीक्षकावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सकारात्मक प्रभाव पाडता येतो. लेखन शब्दमर्यादा सांभाळणारे, विषयाला अनुसरून करणे हे लिखाणाच्या सरावामुळेच शक्य होते.
निबंध या शब्दाचा अर्थ ‘बंध नसलेले लेखन’ असा होतो. मात्र, हे बंध नसणे हरिदासी कीर्तन नसावे. प्रश्नपत्रिकेत शब्दमर्यादा व निवडलेल्या निबंध विषयाचे बंधन असतेच. विषय काळजीपूर्वक वाचावा. लेखन दिलेल्या संपूर्ण विषयावर करायचे आहे, त्यातील एका भागावर नाही याचे भान असावे. विषय असाच निवडावा ज्याबाबत सविस्तरपणे लिहू शकू याची आपल्याला खात्री असेल. विषय निवडल्यावर ‘कच्चे काम’ करण्याच्या उत्तरपत्रिकेतील पानावर विषय विस्तार कसा घडवला जाणार याबाबत एक आराखडा तयार करावा, मुद्दे निश्चित करावेत, निबंधाचा आकार कसा असेल हे ठरवावे अन् नंतरच प्रत्यक्ष लेखन करावे. म्हणजे वेळेचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते.
निबंधलेखनासाठी नेमके, सकस आणि विचारप्रवर्तक वाचनसाहित्य महत्त्वाचे ठरते. वाचन करताना चालू घडामोडींसंबंधी विषयांच्या विविध पैलूंवर विविध माध्यमांमध्ये चालणाऱ्या साधकबाधक चर्चा उमेदवाराने ऐकाव्यात, पाहाव्यात, वाचाव्यात. एखाद्या विषयाला किती बाजू व पैलू असू शकतात हे जाणून घ्यावे. तसेच हे सर्व किती विविध प्रकारे अभिव्यक्त केले जाते हे समजून घ्यावे. राष्ट्रीय वर्तमानपत्रे, रेडिओ, दूरचित्रवाणीतील विविध चॅनेल्स इ. सर्वामधून विविध प्रश्नांकडे विचारवंत, तज्ज्ञ, सामान्यजन इ. कसे पाहतात हे जाणून घेतल्यानेच उमेदवाराचा माहितीसाठा समृद्ध होत जातो. म्हणून प्रत्येक विषय समजावून घेताना; त्या विषयाच्या संज्ञा-संकल्पना, विषयाची सविस्तर, मुद्देसूद माहिती, विषयाचा वर्तमानापर्यंतचा प्रवास, त्याविषयीची मते इ. सर्व बाबी जाणून, समजून घ्याव्यात, त्यासाठी आवश्यक ती माध्यमे धुंडाळावी, टिपणे बनवावीत, लेखन करावे. माहितीसाठा सदैव अद्ययावत असावा. कित्येक उमेदवार कोणत्याही निबंध विषयाला दोनच बाजू असतात असा भ्रम करून घेतात. १९९० नंतरच्या जगाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रश्नांची उत्तरे द्वैती नसतात; तर अनेकांगी असतात याचे भान होणे, कोणत्याही विषयाला २ नव्हे तर अनेक बाजू असतात व आपल्या निबंधलेखनामध्ये त्यातील अनेकांचा ऊहापोह करणे उत्तम. मात्र, निव्वळ खंडनमंडन करू नये, तर सर्व लेखनामधून सदोदित अधोरेखित व्हावे की उमेदवाराला काहीतरी मूलगामी, प्रगल्भ विचार मांडायचा आहे.
शैली व भाषा हे निबंधातील महत्त्वाचे घटक. उमेदवाराची स्वतंत्र लेखनशैली असावी. ती क्लिष्ट, खूप गुंतागुतीची नसावी. कोणताही मुद्दा ठाशीवपणे, सहज सोप्या शब्दांत, मोजक्याच मात्र नेमक्या शब्दांत मांडावा. लेखनशैली अशी असावी की ज्यामुळे आपले मत अरेरावीपणाचे, मग्रुरीचे वाटणार नाही. भाषेची निवड उमेदवाराने काळजीपूर्वक करावी. शब्दसंचय पुरेसा असेल, वाक्यरचना नेमकेपणाने जमेल, लेखनात पुरेसे लालित्य असेल याची काळजी उमेदवाराने घ्यावी. कोणताही निबंध लालित्य व वस्तुनिष्ठतेचा समतोल साधणारा असावा. निव्वळ जोरदार सुरुवात वा आकर्षक शेवट यावरच जोर देऊ नये. लेखनातील दमदारपणा सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहिला पाहिजे. शेवटी, असे म्हणता येईल की सखोल, विचारप्रवण, मात्र चिंतनात्मक वाचन, मुद्देसूद, शब्दमर्यादेत राहून केलेला लेखन सराव जसा महत्त्वाचा तसाच निबंधलेखनासाठी निवडलेल्या विषयाचा कल्पकपणे विचार करून, सर्जकपणे विस्तार करावा. शब्दसंख्येचे भान ठेवत, लेखनात नेमकेपणाची हमी द्यावी.
No comments:
Post a Comment