Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : नव्या मुख्य परीक्षेची रणनीती

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : नव्या मुख्य परीक्षेची रणनीती


तुकाराम जाधव - मंगळवार, २७ मार्च २०१२
संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.

malharpatil@gmail.com
altराज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व गुणपद्धती पाहता आपल्या तयारीला नवी दिशा देणे गरजेचे बनले आहे. जे विद्यार्थी पूर्वीपासूनच राज्यसेवेची तयारी करत आहेत त्यांना आपल्या अभ्यासपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करावे लागणार आहेत आणि जे विद्यार्थी नव्यानेच या परीक्षेकडे वळणार आहेत त्यांना या नव्या अभ्यासपद्धतीला अनुसरु नच तयारीचा आरंभ करावा लागणार आहे.
एकंदर बदलांचा आढावा घेतल्यास त्याला पूरक ठरेल अशा अभ्यासपद्धतीचा स्वीकार करणे केव्हाही श्रेयस्कर ठरेल. त्यादृष्टीने पाहता प्रत्येकाने अभ्यासाचे धोरण ठरवतांना पुढील मुद्दे लक्षात घेणे उपयुक्त ठरेल.
सर्वप्रथम आयोगाने स्वीकारलेला अभ्यासक्रम सखोल व सविस्तरपणे अभ्यासावा. मुख्य परीक्षेतील मराठी व इंग्रजी या भाषा विषयांचा विचार करता नवा अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमावरच आधारित आहे आणि त्याची व्याप्ती मोठी नाही, हे लक्षात येईल. त्यामुळे या भाषा विषयांची चिंता करायची आवश्यकता नाही. खरे आव्हान आहे ते सामान्य अध्ययनाच्या संदर्भात! त्यातही पूर्वीच्या सामान्य अध्ययनाच्या अभ्यासक्रमातील ५० ते ६०% भाग सामान्य अध्ययनाच्या त्या त्या पेपरमध्ये समाविष्ट केलेला आहे. मात्र उर्वरित ३० ते ४०% अभ्यासक्रम हा पूर्णपणे नवा आहे. त्यामुळे इतिहासापासून ते विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंत चारही पेपर्सचा अभ्यासक्रम पाहताना आणि त्याचे विश्लेषण करताना एकूण अभ्यासक्रमाची व्याप्ती किती आहे हे लक्षात घ्यावे लागणार आहे. त्यासाठी निर्धारित अभ्यासक्रम स्वतंत्रपणे स्वयं लिहून काढावा. त्यात एकूण किती प्रकरणे आहेत, त्यातील घटक-उपघटक कोणते आहेत? याचे सूक्ष्म अवलोकन करावे.
दुसरी बाब म्हणजे त्या त्या घटकांतील चालू घडामोडींचा सातत्यपूर्ण अभ्यास. कारण आयोगाने सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरमध्ये चालू घडामोडीवरही प्रश्न विचारले जातील हे जाणीवपूर्वक नोंदवले आहे. थोडक्यात, आयोगाने दिलेला अभ्यासक्रम आणि त्या त्या घटकातील चालू घडामोडी अशा दोन्हींचा सखोल अभ्यास करणे क्रमप्राप्त बनले आहे.
त्याचप्रमाणे अभ्यासक्रमाचे विश्लेषण करताना आपल्या सोईसाठी अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाचे पुढील साधारण वर्गीकरण लक्षात ठेवावे. यानुसार प्रत्येक घटकातील संकल्पनात्मक भाग; आकडेवारी, माहिती असलेला तांत्रिक भाग आणि तिसरा चालू घडामोडींचा भाग होय. संबंधित विषयाचे उपरोक्त पद्धतीने वर्गीकरण करून प्रकरणनिहाय तयारी केल्यास त्या  त्या विषयावर निश्चितपणे प्रभुत्व मिळवता येईल.
अभ्यासक्रमाची व्याप्ती ठरवल्यानंतर स्वाभाविकपणे निर्माण होणारा प्रश्न म्हणजे त्या त्या विषयासाठी काय वाचायचे? वस्तुत: बाजारात उपलब्ध असणारे साहित्य हे अपुरे आहे हे लक्षात घ्यावे. त्यामुळे विचारपूर्वक संदर्भाची यादी मिळवणे महत्त्वाचे आहे. त्या त्या घटकांवर प्रचलित असणारी प्रमाणित संदर्भग्रंथाची यादी पहावी. उदा. इतिहासासाठी बिपन चंद्रा व ग्रोवर-ग्रोवर यांचे पुस्तक; भूगोलासाठी एनसीईआरटी आणि सवदी यांचे पुस्तक; राज्यघटनेसाठी भारतीय राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया खंड १ हे पुस्तक; अर्थव्यवस्थेसाठी मिश्रा व पुरी यांचे पुस्तक इ. त्याचप्रमाणे, द युनिक प्रकाशनाचा ‘महाराष्ट्र वार्षिकी २०१२’ हा संदर्भग्रंथ महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था आणि चालू घडामोडींसाठी उपयुक्त आहे. याखेरीज मराठी वर्तमानपत्रे; लोकराज्य, योजना ही मासिके आणि परिवर्तनाचा वाटसरु  हे पाक्षिक नियमितपणे वाचावे. या संदर्भपुस्तकांच्या आधारे अभ्यासक्रमातील संकल्पना, माहिती व चालू घडामोडी या तिन्ही आयामांना लक्षात घेऊन सविस्तर नोट्स तयार कराव्यात. अर्थात नोट्स बनवतांना प्रत्येक घटकाचे आकलन करण्यावर जोर द्यावा. पहिल्या वाचनाच्या वेळी संकल्पनात्मक भाग कोणता; आकडेवारी, माहितीचा भाग कोणता, हे अधोरेखित करावे. आणि त्या त्या घटकासंबंधी घडणाऱ्या चालू घडामोडींचीही सविस्तर नोंद ठेवावी. थोडक्यात, सर्वसमावेशक अभ्यासपद्धतीवर भर देऊनच आपल्या तयारीची पायाभरणी करावी.
मुख्य परीक्षेतील प्रत्येक विषयाचे वाचन, त्यावरील नोट्सची तयारी केल्यास उजळणीचेही वेळापत्रक तयार करावे. अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यात केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरु पाच्या प्रश्नांचा सराव करण्यावर भर द्यावा. नव्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांचे संकलन सद्य:स्थितीत उपलब्ध नसले तरी पूर्व परीक्षेतील अभ्यासपद्धतीचा अवलंब करून प्रारंभी स्वत:च नमुना प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न करावा. अशारीतीने अभ्यासक्रमाची व्याप्ती निर्धारित करणे, योग्य संदर्भाची निवड आणि सर्वसमावेशक अभ्यास या धोरणाचा अवलंब करून नव्या परीक्षेला सामोरे जाता येईल.

No comments: