Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : पर्यावरणीय भूगोल व सुदूर संवेदन

‘एमपीएससी’चा राजमार्ग : मुख्य परीक्षा : पर्यावरणीय भूगोल व सुदूर संवेदन

डॉ.अमर जगताप, शुक्रवार, २० एप्रिल २०१२
प्राध्यापक, द युनिक अ‍ॅकॅडमी, पुणे.

jagtapay@gmail.com
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोलाच्या अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा आणि चालू घडामोडींच्या दृष्टीनेही मध्यवर्ती असलेला घटक म्हणजे ‘पर्यावरण भूगोल’ होय. आजच्या लेखात पर्यावरण भूगोल आणि दूरसंवेदन  या दोन घटकांच्या अभ्यासाविषयी चर्चा करणार आहोत. अभ्यासक्रमातील घटक क्र. २.४ मध्ये ‘पर्यावरण भूगोल’ समाविष्ट करण्यात आला आहे. यात आयोगाने संकल्पना, उपयोजन आणि चालू घडामोडी यांचा सुरेख मेळ साधला आहे. त्यानुसारच विद्यार्थानी रणनीती आखली पाहिजे. पर्यावरणाचा अभ्यास करताना सर्वप्रथम त्यासंबंधीची मूलभूत माहिती गोळा करणे आवश्यक आहे. पर्यावरण, परिस्थितीकी व परिसंस्था या संज्ञांचा अर्थ अभ्यासला पाहिजे. त्यानंतर परिसंस्थेतील अन्नसाखळी, अन्नजाळे, घटक द्रव्यांचे चक्रीकरण, ऊर्जा प्रवाह यासंबंधीचा सखोल अभ्यास करावा. या अभ्यासाकरिता महाराष्ट्र बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातील पर्यावरण विषयाची पुस्तके साध्या, सोप्या मराठी भाषेमध्ये संपूर्ण माहिती देतात. त्यानंतर मानवाच्या हस्तक्षेपाचा पर्यावरणावर झालेला दुष्परिणाम लक्षात घ्यावा. यात पर्यावरणीय ऱ्हासाची समस्या, स्वरूप आणि तिची कारणे इ. वर लक्ष केंद्रित करावे. 
सद्य:स्थितीत पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात व वेगात ऱ्हास होत आहे. त्याचे स्वरु पदेखील विविध प्रकारचे आहे. त्यामुळे त्यावरील उपाययोजनांचे स्वरु पदेखील व्यापक व गुंतागुंतीचे आहे. पर्यावरणीय ऱ्हासात आयोगाने प्रदूषण, जागतिक तापमान वाढ, हरितगृह परिणाम, निर्वनीकरण, जैव-विविधतेचा ऱ्हास या मुद्दय़ांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांना या मुद्यांसह पर्यावरणीय ऱ्हासाशी संबंधित इतर घटक उदा. ओझोनच्या थराचा क्षय, वाळवंटीकरण, पाणथळ भूमींचा ऱ्हास या व इतर घटकांचा देखील अभ्यास करणे अनिवार्य ठरते. हा अभ्यास करताना त्या समस्येचे मूळ स्वरु प शास्त्रीयदृष्टय़ा अभ्यासावे. त्यातील सर्व बारकावे, मुद्दे समजल्याशिवाय पुढे जाऊ नये; कारण या बारकाव्यांवर प्रश्न येण्याची अधिक शक्यता असते. त्याबाबत काही अडचणी आल्यास योग्य मार्गदर्शकाकडून त्यांचे निराकरण करावे. उदा. हरितगृह परिणाम. हरितगृह परिणाम म्हणजे काय? हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमान वाढ हा दुष्परिणाम कसा निर्माण होतो?  वातावरणाचे तापमान सूर्याकडून येणाऱ्या किरणांमुळे का वाढत नाही? हरित गृह परिणाम ही एक नैसर्गिक, साधारण व आवश्यक प्रक्रिया कशी आहे? लघु लहरी व दीर्घ लहरी काय असतात? अशा बारीक सारीक मुद्दय़ांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक ठरते. 
जागतिक पातळीवर पर्यावरणाच्या ऱ्हासाची व्याप्ती वाढल्यानंतर मानवाने पर्यावरण संवर्धनसाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यांची माहिती आवश्यक आहे. विशेषत: जागतिक पातळीवरील  माँट्रीयल करार, क्योटो करार; वसुंधरा, कोपनहेगन, जोहान्सबर्ग परिषद इ. चा सखोल अभ्यास गरजेचा ठरतो. पर्यावरणासंबंधी विविध कराराची कारणे, त्यातील तरतुदी, त्याबाबतचे जागतिक पातळीवरील विवाद, त्यामधील संभाव्य बदल, यांचा समावेश होतो. उदा. क्योटो करार, त्यातील कार्बन क्रेडिटची संकल्पना, क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम, बास्केट अ‍ॅप्रोच यांचा अर्थ काय आहे? हवामान बदलासंबंधी आय.पी.सी.सी. काय आहे? थोडक्यात, पर्यावरणीय ऱ्हासासंबंधी सर्व पैलूंचा चालू घडोमोडीसह अभ्यास करणे अपेक्षित आहे. भारतातील वाढते नागरीकरण, त्यातून उद्भवणारा सांडपाणी, घन कचरा विल्हेवाटीचा प्रश्न; वाहतुकीची समस्या व प्रदूषण हे घटक पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील बनले आहेत. त्याचप्रमाणे सागर किनारपट्टी प्रदेशांचा विकास घडत असतांना किनारी प्रदेशातील जैव विविधतेचा होणारा ऱ्हास व सागरी प्रदूषण पर्यावरणाच्या दृष्टीने कळीचे मुद्दे ठरले आहेत. त्यामुळे त्या प्रदेशातील मानवी हस्तक्षेप नियंत्रित करण्यासाठी योजण्यात आलेल्या सी.आर.झेड.-१ व २ धोरणाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. थोडक्यात, पर्यावरणाशी संबंधी सर्व घटक, कायदे व धोरणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.  
आयोगाने नव्या अभ्यासक्रमामध्ये ‘‘दूर संवेदन’’ हा नवा घटक समाविष्ट केला आहे. हा घटक पूर्णपणे तांत्रिक स्वरु पाचा आहे. अर्थात या तांत्रिक पैलूंबरोबरच दूर संवेदनाचा उपयोजनात्मक पैलूदेखील समाविष्ट केला आहे. दूर संवेदन हे तंत्रज्ञान कृत्रिम उपग्रहांतील प्रगतीमुळे विकसित झाले आहे. भारताच्या इस्रो संस्थेने सोडलेल्या आय.आर.एस. श्रेणीच्या उपग्रहांमध्ये या तंत्राचा उपयोग मोठय़ा प्रमाणात केला आहे. अलीकडील काळात सोडलेल्या व भविष्यात सोडल्या जाणाऱ्या उपग्रहांची संपूर्ण तांत्रिक व उपयोजनात्मक माहिती संकलित करणे आवश्यक आहे. तांत्रिक माहितीमध्ये दूरसंवेदी उपग्रहावरील संवेदक, त्यांचे प्रकार, त्यावरील विविध श्रेणी (बँड) यांचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. या तांत्रिक घटकांचा अभ्यास करताना विद्यार्थानी कटाक्षाने पाठांतर टाळावे, उलट त्या तांत्रिक बाबी योग्य मार्गदर्शकाकडून समजावून घेऊन त्यांचा अभ्यास करावा. या अभ्यासामध्ये प्रा. कार्लेकर यांचे पुस्तक बहमोल ठरते. या पुस्तकामध्ये दूरसंवेदन घटकाचे सर्व पैलू साध्या, सोप्या भाषेत, आकृत्यांसह स्पष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रा. कार्लेकर यांचे ‘दूरसंवेदन’ हे पुस्तक निश्चित वापरावे. दूरसंवेदन या घटकाचा अभ्यास करताना भारतीय उपग्रहांचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रात होतो, त्या दूरसंवेदी उपग्रहांशी संबंधित सरकारी संस्था व त्यांची मुख्यालये, त्यांची ठिकाणे व राज्ये; तेथून अवकाश प्रक्षेपित केलेले उपग्रह इ. माहीत असणे आवश्यक आहे. या घटकामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (जी.आय.एस.) व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (जी.पी.एस.) या दोन घटकांचाही  समावेश केला आहे. २१ व्या शतकात या घटकांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या प्रणाली नक्की काय आहेत? त्यांची उपयुक्तता काय आहे? भारताची जी.पी.एस. तंत्रज्ञानात किती प्रगती झाली आहे? भारतीय जी.पी.एस. प्रणालीचे नाव काय? इतर राष्ट्रांच्या जी.पी.एस. प्रणालींची नावे कोणती? इत्यादी बाबींसंबंधी अचूक माहिती संकलित करणे महत्त्वाचे ठरते. थोडक्यात, या घटकामध्ये विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून चालू घडामोडींच्या अनुषंगाने अभ्यास करणे आवश्यक आहे.

No comments: