Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा - राजमार्ग - मुख्य परीक्षा :भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाची रणनीती

‘एमपीएससी’चा - राजमार्ग - मुख्य परीक्षा :भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाची रणनीती


शरद पाटील ,गुरुवार, १२ एप्रिल २०१२
प्राध्यापक , ‘द युनिक अ‍ॅकॅडमी’, पुणे.

sharadpatil11@gmail.com
alt
आजच्या लेखात आपण १८५७ ते १९४७ पर्यंतच्या भारताच्या इतिहासातील राष्ट्रवादाचा उदय  व विकास, जमातवादाचा विकास, राष्ट्रीय सभेला समांतर आदिवासी, शेतकरी आंदोलने, कामगार व डावी चळवळ, संस्थानातील प्रजापरिषदा व त्यांची आंदोलने इ. प्रमुख घडामोडींचा विचार करणार आहोत. त्याशिवाय या काळात झालेल्या घटनात्मक सुधारणांविषयीदेखील जाणून घेणार आहोत. थोडक्यात, इतिहासाच्या अभ्यासक्रमात दिलेल्या पाचव्या व सहाव्या घटकाच्या अभ्यास धोरणाविषयी चर्चा करणार आहोत. अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे जावे म्हणून हा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे वर्गीकृत करून घ्यावा.
(अ)    राष्ट्रवादाचा विकास-  १८५७चा उठाव, राष्ट्रीय सभेची स्थापना, मवाळ, जहाल कालखंड, बंगालची फाळणी, होमरूल चळवळ, लखनौ करार, गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या चळवळी, आझाद िहद सेना इ. प्रमुख घडामोडी.
(ब)    राष्ट्रीय सभेस समांतर चळवळी-  १८५७ नंतरचे आदिवासी, शेतकरी उठाव, कामगार चळवळ, िहदू-मुस्लिम धर्माधतेचा विकास, युनियनिस्ट पार्टी, कृषक प्रजा पक्ष, आंबेडकरांची अस्पृश्यता उद्धाराची चळवळ व दृष्टिकोन, राष्ट्रीय लढय़ातील क्रांतिकारक चळवळ, डावी चळवळ आणि संस्थानातील चळवळी यांचा समावेश होतो. 
(क)    १८५७ नंतरच्या घटनात्मक सुधारणा-  या अंतर्गत १८५८चा कायदा, मोर्ले-िमटो कायदा १९०९, माँटेग्यू-चेम्सफर्ड कायदा १९१९, १९३५चा भारत सरकार कायदा आणि १९४७चा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा हे प्रमुख कायदे समाविष्ट होतात.
भारताच्या इतिहासात हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड मानला गेल्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी याची सतत जाणीव ठेवावी. या कालखंडाचा विचार करता अनेक घडामोडी, व्यक्ती, संस्था, परस्परविरोधी मते असणारे विविध प्रवाह अभ्यासावे लागणार आहेत. थोडी गुंतागुंत असणारा हा अभ्यासाचा कालखंड आहे. उपरोक्त वर्गीकरणात दिलेल्या प्रत्येक गटातील एक-दोन मुद्दे घेऊन या घटकाची तयारी कशी करायची याचा विचार करता येतो. उदा., पहिल्या भागात १८५७चा उठाव हा एक महत्त्वाचा उपघटक आहे. त्याची तयारी करताना या उठावाची विविध कारणे, प्रत्यक्ष उठावातील घडामोडी, उठावाचा प्रसार व त्याचे स्वरूप, उठाव अपयशी ठरण्यामागील कारणे, उठावाचे परिणाम विशेषत: ब्रिटिश शासकीय-प्रशासकीय धोरणात करण्यात आलेले बदल या बाबी महत्त्वपूर्ण मानाव्यात. त्याचप्रमाणे या उठावाशी संबंधित व्यक्ती, ठिकाणे, उठावाला सहायक ठरलेले काही कायदे, उठावाबाबत केलेले लेखन, उठावाबाबत इतिहासकारांची मतमतांतरे आणि १८५७चा उठाव व महाराष्ट्राचा संदर्भ या प्रमुख बाबी लक्षात घ्याव्या लागतील.
आपण तयार केलेल्या दुसऱ्या भागात शेतकरी चळवळ हा महत्त्वाचा उपघटक आहे. १८५७ ते १९४५ या काळात भारतातील विविध प्रदेशांत शेतकरी उठाव व चळवळींचा विकास झालेला दिसून येतो. ब्रिटिश सत्तेमुळे झालेली परिवर्तने, शेतकऱ्यांचे शोषण याचा परिपाक म्हणजे हे उठाव व आंदोलने होत. या आंदोलनांचे प्रदेश, त्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, आंदोलनामागची कारणे, आंदोलनाबाबत राष्ट्रीय सभा व प्रमुख नेत्यांची भूमिका, या आंदोलनाबाबत केले गेलेले लेखन, यानंतर शेतकऱ्यांना संघटित करण्याचे झालेले प्रयत्न-संघटना, या संघटनांशी संबंधित नेते या सर्व आयामांची तयारी करावी लागणार आहे.
तिसऱ्या भागात ब्रिटिशकालीन भारतात झालेल्या राजकीय सुधारणांचा समावेश केलेला आहे. या सुधारणांचा विचार करताना सर्वात महत्त्वाचा भर या कायद्यांतर्गत केल्या गेलेल्या तरतुदीवर असला पाहिजे. त्यानंतर या राजकीय सुधारणांच्या काळात असणारे भारतमंत्री, भारताचे व्हाइसरॉय, भारतातील राष्ट्रीय सभेशी निगडित नेतृत्वाने या कायद्यांबाबत केलेली विधाने, विश्लेषण आणि या कायद्यांची वैशिष्टय़े इ. बाबींचा सर्वसमावेशकपणे अभ्यास करावा. या प्रकरणात समाविष्ट होणाऱ्या विविध कायद्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास प्रभावीरीत्या तयारी करता येऊ शकते.
प्रस्तुत तीन घटकांचा अभ्यास करताना अनेक घटना, ठिकाणे, दिनांक, व्यक्ती, संस्था-संघटना, नियतकालिके, वृत्तपत्रे, ग्रंथ यांचा संदर्भ वारंवार येणार आहे. उदा., राष्ट्रीय सभेची महत्त्वाची अधिवेशने, त्यांचे अध्यक्ष, त्या ठिकाणी संमत केलेले विविध ठराव इ. अथवा राष्ट्रीय चळवळीशी संबंधित विविध नेते, त्यांनी राष्ट्रीय जागृतीसाठी सुरू केलेल्या संस्था, वृत्तपत्रे इ. त्यामुळे या कालखंडातील घटकांची तयारी काळजीपूर्वक करावी लागेल. म्हणूनच सविस्तर वाचन आणि त्या आधारे पद्धतशीर नोट्स तयार करून अभ्यास करण्यावर भर द्यावा.
उपरोक्त नमूद केलेल्या प्रकरणांच्या तयारीसाठी एनसीईआरटीचे आधुनिक भारतावरील पुस्तक, ग्रोवर-ग्रोवर आणि बेल्हेकर लिखित आधुनिक भारताच्या इतिहासावरील पुस्तके आणि बिपनचंद्र व सहकाऱ्यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ या ग्रंथाचा आधार घ्यावा. यातील ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हा ग्रंथ विश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. स्वाभाविकच विश्लेषणात्मक स्वरूपाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी हा संदर्भ अत्यंत उपयुक्त ठरेल हे लक्षात ठेवावे. भारतीय स्वातंत्र्यलढा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात अभ्यासण्यासाठी महाराष्ट्र वार्षिकीतील आधुनिक काळातील महाराष्ट्र हा विभाग उपयुक्त ठरतो. यात १८५७चा उठाव व महाराष्ट्र, समाज-धर्म सुधारणा व महाराष्ट्र, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित समूहाच्या चळवळी आणि महाराष्ट्र, राष्ट्रवाद व महाराष्ट्र, ब्रिटिशप्रणीत सुधारणांस महाराष्ट्री प्रदेशाने दिलेला प्रतिसाद, गांधीयुग आणि महाराष्ट्र आणि स्वातंत्र्यलढय़ातील महाराष्ट्राचे योगदान हे उपघटक अंतर्भूत केलेले आहेत. या सर्व प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करून नोट्स तयार कराव्यात. तक्ते, कोष्टके आणि छोटय़ा डायऱ्यांचा आधार घेऊन संकलित केलेल्या माहितीचे सूत्रबद्ध व सुलभ वर्गीकरण करावे आणि संकलित केलेल्या माहितीची वारंवार उजळणी होईल याची दक्षता घ्यावी. आजच्या लेखात एवढेच.. उद्या भेटू उर्वरित घटकांच्या तयारीचा विचार करण्यासाठी..!

No comments: