‘एमपीएससी’चा राजमार्ग: मुख्य परीक्षा: मुलाखतीस सामोरे जाताना..
तुकाराम जाधव, शुक्रवार, ८ जून २०१२
संचालक, द युनिक अॅकॅडमी, पुणे.
malharpatil@gmail.com
मुलाखतीची संकल्पना आणि मुलाखतीची तयारी करताना विचारात घ्याव्या लागणाऱ्या बाबी पाहिल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीस कशाप्रकारे सामोरे जावे, याबाबतची चर्चा आजच्या लेखामध्ये करू या.
साधारणपणे उमेदवाराने पुढील बाबी विचारात घेऊन मुलाखतीस प्रत्यक्षपणे सामोरे जाणे अधिक लाभदायक ठरेल.
(१) पहिली गोष्ट म्हणजे तुमचा पोशाख. कारण त्यावरून तुमची आवड-निवड, आचार-विचार समजत असतात. तेव्हा पोशाख हा साधा मात्र नीटनेटका असावा, स्वच्छ, इस्त्री केलेला व स्वतस शोभून दिसणारा असावा. मुलांनी शक्यतो शर्ट-पँट व टाय तर मुलींनी सलवार-कमीज अथवा साडी घालावी. आपण कोणत्याही समारंभास जात नाही याचे भान ठेवून सौंदर्यप्रसाधनांचा कमीत कमी वापर करावा.
(२) दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणतीही धावपळ होऊ नये म्हणून नियोजित वेळेआधी नियोजित जागेवर पोहोचणे. मुलाखतपत्रात वेळ दिलेली असते तेव्हा तत्पूर्वी तुम्ही तेथे हजर राहा.
(३) जेव्हा तुम्ही मुलाखत कक्षात पोहोचाल, तेव्हा कितीही काळजी, चिंता वाटत असली, तरी आपल्या भावनांवर ताबा ठेवा, शांत राहण्याचा प्रयत्न करा व सर्वाना अभिवादन करा. जेव्हा तुम्हाला बसण्यास सूचित करण्यात येईल तेव्हा बसा. कारण तुमची मुलाखत काही उभी राहून घेतली जाणार नाही, तेव्हा शांत राहा.
(४) तुम्ही शांत राहण्यासोबतच आत्मविश्वासानेही बोलले पाहिजे. मुलाखत मंडळ तुम्हाला काही बाहेर काढण्यासाठी नव्हे तर तुमची निवड करण्यासाठी तेथे बसलेले असते. जर तुम्ही आत्मविश्वासाने उत्तरे देत असाल तर त्याचा नक्कीच अनुकूल प्रभाव पडत असतो.
(५) तुमच्या आत्मविश्वासाबरोबर नम्रपणाही दिसून येणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही नजरेत नजर घालून उत्तरे द्याल, तेव्हा तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. त्याचप्रमाणे तुमच्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून देखील तुमचा नम्रपणा जोखता येतो.
(६) मुलाखत मंडळाच्या सदस्यांचा आदर राखा. त्यांच्या अनुभवाचा मान राखा व उलट उत्तरे देऊ नका. अथवा उलट प्रश्न विचारू नका, शिवाय संलग्न अथवा अतिशयोक्त उत्तरे देऊ नका. जर माहिती नसेल, तर तसे स्पष्ट सांगा, मात्र चुकीची माहिती देऊ नका. अन्यथा त्याचा नकारात्मक परिणाम संपूर्ण मुलाखती दरम्यान दिसून येऊ शकतो.
(७) तुमच्या उत्तरासोबत तुमचा आवाजही तितकाच महत्त्वाचा असतो. आवाजात चढ-उतार अथवा चिरकेपणा नसावा. शक्यतो एकाच आवाजात बोला. जास्त चढा आवाज अथवा जास्त मिळमिळीत आवाज योग्य ठरणार नाही.
प्रत्यक्ष मुलाखती दरम्यान ..
मुलाखतीसाठी उमेदवाराने आपले व्यक्तिमत्त्व परिचयपत्र (Bio-Data) सात प्रतीत सादर करावे लागते. मुलाखतीदरम्यान मुलाखतकर्त्यांजवळ या प्रती असतात. त्याआधारे मुलाखतीचा प्रारंभ Bio-data मधील आपल्या वैयक्तिक माहितीवर आधारित प्रश्नांनी होतो. साधारणत: अध्यक्ष आपणास आपले नाव, गाव व भौगोलिक माहिती विचारून मुलाखतीदरम्यानचा उमेदवारावरील ताण दूर करण्याचा प्रयत्न करतात. कोणी कितीही तयारी केली वा सहजपणे मुलाखतीला सामोरे जायचे म्हटले, तरी जीवनाच्या ध्येयानिकट पोचल्यानंतर अपयशाच्या भीतीने नकळत ताण जाणवतो. परंतु अध्यक्षांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देता आली या विश्वासातून हा तणाव निवळण्यास सुरुवात होते व नंतर चालू होते ती केवळ चर्चा ! ही चर्चा जेव्हा मनमोकळ्या वातावरणात पार पडल्याचे समाधान उमेदवार व मुलाखतकत्रे दोहोंना मिळते, तेव्हा निश्चितच आपण आपल्या ध्येयाजवळ पोचल्याचे संकेत प्राप्त होतात. अर्थात त्यासाठी मुलाखतीचा कालावधी हा गौण मुद्दा ठरतो. मुलाखत जास्त वेळ चालली म्हणजे सकारात्मक बाब किंवा थोडा वेळ चालली म्हणजे नकारात्मक सूर बाळगणे चुकीचे ठरते. दुर्दैवाने आणखी एक गरसमज उमेदवारांमध्ये दिसतो तो म्हणजे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर येणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळावे अशी अपेक्षा मुलाखतकर्त्यांत नसते. यानुसार प्रश्नाचे उत्तर माहीत नाही, यातून उमेदवाराचा प्रामाणिक स्वभाव समजतो, आपले अज्ञान लपविण्यासाठी वेळ मारून नेणाऱ्या वृत्तीचा अभाव माहीत होतो. सलग काही प्रश्नांची उत्तरे देता न आली तरी त्याचा विशेष फरक पडत नाही, हे मला स्वत: माझ्या मुलाखतीतून अनुभवता आले.
मुलाखतीदरम्यान आपल्या हजरजबाबीपणाची चुणूक मुलाखतमंडळाला दाखवावी. यासाठी वातावरण खेळकर असावे, एखाद्या प्रश्नावर स्वतंत्र विचार करून उत्तर देण्याचे चातुर्य हवे. अर्थात हे सारे नेमक्या व प्रभावी शब्दांत व्यक्त व्हावे. आपले उत्तर कायद्याच्या वा नियमांच्या चौकटीत असावे. आपल्या उत्तराने कोणतेही आक्षेपार्ह वा प्रक्षोभित वातावरण निर्माण होऊ न देण्याची काळजी घ्यावी.
मुलाखत म्हणजे हत्ती गेला नि शेपूट राहिले. पण हे शेपूटच आपल्या साऱ्या परिश्रमांवर शिक्कामोर्तब करणारे ठरते. वरील प्रदीर्घ चच्रेतून आपणांशी संवाद साधताना मुलाखतीचे तंत्र उमजले असेल अशी आशा आहे. थोडक्यात काय, तर मुलाखत म्हणजे खेळकर वातावरणात मनमोकळेपणाने तुमची ओळख मुलाखतकर्त्यांना करून देत अधिकारपदासाठी आपली योग्यता पटवून देणे होय. आत्मविश्वासाने सामोरे जात परिश्रम व ज्ञानाच्या कसोटीवर आपण पात्र ठरावे, यासाठी शुभेच्छा. ‘विजयी भव!’
No comments:
Post a Comment