Monday, September 3, 2012

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास

‘एमपीएससी’चा राजमार्ग - मुख्य परीक्षा : कृषी परिस्थितीकी आणि हवामानाचा अभ्यास

डॉ.अमर जगताप - सोमवार, २३ एप्रिल २०१२
प्राध्यापक :  द युनिक अॅकॅडमी, पुणे.

jagtapay@gmail.com
alt
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील भूगोलाच्या अभ्यासक्रमात घटक क्र. ३ अंतर्गत ‘भूगोल आणि कृषी’ या घटकाचा समावेश केला आहे. या लेखात आपण ‘कृषी परिस्थितीकी’ (घटक ३.१) आणि हवामान (घटक ३.२) या घटकांच्या स्वरूपाबद्दल आणि अभ्यासक्रमाबाबत चर्चा करणार आहोत. घटक क्र. ३.१ कृषी परिस्थितीकीमध्ये संमिश्र स्वरूपाचे घटक आहेत. यातील कृषी परिस्थितीकीचे मानवाच्या दृष्टिकोनातून महत्त्व हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याकरिता कृषी परिस्थितीकी या शब्दाचा अर्थ समजणे आवश्यक आहे. त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्ती या मुद्दय़ामध्ये देशातील व विशेषत: महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वितरणाचा, वापराचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये मृदा, जल, पशुसंपत्ती, वनसंपत्ती इ. साधन संपत्तीचा अभ्यास अपेक्षित आहे. अभ्यासाचा रोख संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापन व संवर्धनावर असला पाहिजे. त्यासाठी हाती घेण्यात आलेले शासनाचे प्रयत्न विद्यार्थ्यांना माहीत असले पाहिजेत. पुढील मुद्दा पिकांसंदर्भात आहे. देशातील विशेषत: राज्यातील महत्त्वाची पिके, त्यांचे वितरण याचा अभ्यास आवश्यक ठरतो. पिकांवर परिणाम करणारे प्राकृतिक, हवामान आणि सामाजिक पर्यावरणाचे घटक कोणते? याचा सखोल अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा. या घटकाच्या शेवटी पर्यावरणीय प्रदूषण आणि संबंधित आपत्तींचा मानव, पशू, पिके यांवर होणारा विपरित परिणाम नमूद केला आहे. या घटकाच्या अभ्यासाकरिता डॉ. साबळे यांचे ‘कृषी घटक’, सवदी यांच्या ‘भूगोलाची मूलतत्त्वे खंड १’ मधील निवडक प्रकरणांचा अभ्यास उपयुक्त ठरेल. त्याचप्रमाणे कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनी (डायरी) मधील पिकांच्या नव्या जाती, त्यांची वैशिष्टय़े इ. चा अभ्यास उपयुक्त ठरेल.
घटक क्र. ३.२ ‘हवामान’ - हा भूगोलाच्या अभ्यासक्रमातील सर्वात मोठा, सर्वाधिक संकल्पना असलेला आणि आकलनाच्या दृष्टिकोनातून काहीसा गुंतागुंतीचा वाटणारा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या घटकाच्या अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. सामान्यत: या घटकामधील मुद्दे तीन गटात वर्गीकृत करता येतील. गट क्र. १ मध्ये वातावरणाचा आणि त्यातील विविध घटक व प्रक्रियांचा अभ्यास आहे. हे सर्व मुद्दे पूर्णत: संकल्पनात्मक आहेत. त्यांचा अभ्यास करताना पायरी पायरीने एकेक मुद्दा व्यवस्थित समजावून घेऊन; त्याचे नीट आकलन करून पुढील मुद्दा अभ्यासावा. कारण प्रत्येक मुद्दा समजण्यासाठी आधीच्या मुद्दय़ाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या घटकाच्या अभ्यासासाठी सवदी यांच्या ‘भूगोलाची मूलतत्त्वे खंड १’ या पुस्तकातील वातावरणशास्त्राची सर्व प्रकरणे उपयुक्त आहेत. वातावरणाच्या विविध घटकांचे महत्त्व व भूमिका याच्याशी संबंधित पुढील घटक ‘औष्णिक संतुलनाचा’ आहे. औष्णिक संतुलनावर वातावरणाचे तापमान पट्टे हा मुद्दा आधारित आहे. वातावरणीय तापमान पट्टय़ांवर वातावरणीय दाबपट्टय़ांची निर्मिती अवलंबून असते. वातावरणीय दाब पट्टय़ांवर ग्रहीय वाऱ्यांची निर्मिती अवलंबून असते. थोडक्यात आधी नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक मुद्दा आधीच्या मुद्दय़ावर आधारित आहे. त्यामुळे कोणताही मुद्दा अभ्यासातून वगळता येणार नाही. त्यानंतर मान्सून, वायुराशी व सीमा, आर्वत यांचा समावेश होतो. यामध्ये वृष्टी, आद्र्रता या मुद्दय़ांचा समावेश नसला तरी त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. कारण आद्र्रतेचा संबंध वृष्टीशी व वृष्टीचा संबंध नमूद केलेल्या सर्व घटकांशी आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात नमूद न केलेल्या काही घटकांचा अभ्यास आवश्यक आहे.
भारतीय हवामानाशी संबंधित मुद्दे गट क्र. २ मध्ये समाविष्ट करता येतील. परीक्षेच्या दृष्टीने हे मुद्दे सर्वाधिक महत्त्वाचे आहेत. कारण भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था भारतीय मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे भारतीय मान्सूनचा उदय, त्याचे विविध सिद्धांत, त्याचा प्रवास, वितरण याबाबी अभ्यासणे आवश्यक आहे. विशेषत: मान्सूनच्या निर्मितीचे आधुनिक सिद्धांत महत्त्वाचे आहेत. हा सर्व भाग संकल्पनात्मक स्वरूपाचा आहे. त्यातील एल निनो, ला निना, दक्षिणी दोलनाचा सिद्धांत इ. बाबी बारकाईने अभ्यासणे आवश्यक आहे. भारतातील पर्जन्यविषयक समस्या उदा. अवर्षण; पूर यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील पर्जन्याचे वितरण व त्यातील स्थल-कालानुसार विचलन याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. या सर्व घटकांच्या अभ्यासासाठी सवदींच्या ‘भारताचा भूगोल’ या पुस्तकातील भारताचे हवामान हे प्रकरण उपयुक्त ठरते.
हवामान घटकातील जल उपलब्धता व त्याचा पीक पद्धतीशी असलेला संबंध याच्याशी निगडित मुद्दे तिसऱ्या गटात समाविष्ट करता येतील. त्या मुद्दय़ांमध्ये अवर्षण, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम यांचा अभ्यास गरजेचा आहे. यात विविध क्षेत्रासाठीची पाण्याची उपलब्धता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. महाराष्ट्रातील विविध कृषी-हवामान विभाग आणि त्यानुसार आढळणारे पीक प्रारूप अभ्यासावे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार विविध विभागात कोणत्या पीक पद्धती अवलंबल्या जातात व त्यांची वैशिष्टय़े कोणती? त्याचबरोबर अल्पकालीन आणि उच्च पैदासक्षम बियाणांच्या वापराचा परिणाम व स्वरूप अभ्यासावे. या घटकाच्या शेवटी सद्यपरिस्थितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरणारे दोन मुद्दे नमूद केलेले आहेत - सेंद्रीय शेती आणि शाश्वत शेती. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे; विशेषत: चुकीच्या शेती पद्धतीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेता २१ व्या शतकात सेंद्रीय शेती आणि शाश्वत शेती या दोन्ही मुद्दय़ांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या मुद्दय़ांचा अर्थ समजावून घेऊन त्यांचे महत्त्व अभ्यासावे. त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर शासनाने केलेले प्रयत्न अभ्यासावेत. थोडक्यात ३.१ व ३.२ घटकांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी संकल्पना, इतर संकल्पनांशी असणारा संबंध, संबंधित आकडेवारी, समस्या आणि त्यासंदर्भातील शासनाच्या उपाययोजना या घटकांवर भर द्यावा. यातील प्रत्येक बाबींशी संबंधित चालू घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवावे.

No comments: